Sitaphal Farming Agrowon
यशोगाथा

Sitaphal Farming : सीताफळ शेतीतून अर्थकारणाला गती!

Sitaphal Production : जालना जिल्ह्यातील वखारी येथील रामप्रसाद दादाभाऊ खैरे यांनी पारंपरिक पिकाऐवजी काटक व कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळ शेतीचा पर्याय निवडला. २०११ मध्ये दोन एकरांपासून सुरू झालेली सीताफळ बाग आता संपूर्ण क्षेत्रात विस्तारली आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : वखारी (जि. जालना) येथील रामप्रसाद दादाभाऊ खैरे हे स्वतः शिक्षक असून, त्यांच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. २०११ पर्यंत अन्य शेतकऱ्यांप्रमाणेच तेही कपाशी, सोयाबीन, तूर पारंपरिक पिके घेत असत. मात्र वाढत चाललेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये मिळणारे एकरी २० ते २५ हजार रुपये उत्पन्न परवडत नव्हते. एकदा त्यांनी पूर्ण शेतीमध्ये कपाशी पीक घेण्याचा धाडसी प्रयोगही करून पाहिला. मात्र उत्पादन आणि उत्पन्नांचे गणित अपेक्षेप्रमाणे आलेच नाही. त्यातून पर्यायी पिकांची शोध सुरू झाला.

चर्चासत्रातून मिळाली सीताफळाची माहिती

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात मासिक चर्चासत्रात कायम सहभागी होतात. त्यातील एका चर्चासत्रामध्ये कविवर्य आणि हाडाचे शेतकरी (स्व.) ना. धों. महानोर आले होते. त्यांनी त्यांच्या सीताफळाचे अर्थकारण समजून सांगितले. महानोर यांच्या सीताफळ बागेला प्रत्यक्ष भेट दिली. आपल्यासारख्या कमी पाणी असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे पीक फायदेशीर ठरू शकते, हे लक्षात आले. पहिल्यांदा एक दोन एकरांवर लागवडीचा विचार केला.

पहिल्यांदा केली दोन एकरांत लागवड

२०११ मध्ये २० बाय १० फुटावर दोन एकरांमध्ये सीताफळ लागवड केली. तीन वर्षांत बाग उत्पादनक्षम झाल्यानंतर एकरी एक लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले. अल्प खर्च आणि कष्टामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नामुळे त्यांनी लागवड वाढविण्याचा विचार केला. २०१७, २०१८ व २०१९ या तीन वर्षांत घर आणि शेततळ्याखालील एक ते दीड एकर क्षेत्र वगळता उर्वरित सर्व क्षेत्रावर सीताफळ लागवड केली. त्यात बालानगर (२ एकर), एनएमके गोल्डन (१२ एकर), सरस्वती-१ व सरस्वती-७ (पाच एकर) या वाणांचा समावेश आहे. या बागेमध्ये वाणाचे गुणधर्म, व अन्य शेतकऱ्यांच्या अनुभवासोबतच स्वतःच्या अनुभवावर आधारित लागवड अंतरही भिन्न ठेवले आहे. (उदा. २० बाय १० फूट, १० बाय ७ फूट, १४ बाय ५ फूट, १४ बाय ६ फूट इ.)

यांत्रिकीकरणातून व्यवस्थापनामुळे खर्चात बचत

पारंपरिक पिके घेत असताना मजुरांची उपलब्धता ही मोठी समस्या होती. मात्र जेव्हापासून ते फळबागेकडे वळले, तेव्हापासून त्यांनी यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. त्यांच्याकडे ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, ट्रॅक्टरचलित ब्रश कटर, टॅक्टरचलित एचटीपी फवारणी यंत्र आहे. मुलगा सतीश हा यंत्रांच्या साह्याने संपूर्ण शेतीचे तण, खत आणि अन्य सर्व व्यवस्थापन पाहतो. एक वेळ छाटणीसाठी लागणारे मजूर वगळता संपूर्ण पीक व्यवस्थापनात मजुराची फारशी गरजच लागत नाही. परिणामी, खर्चात मोठी बचत झाली आहे.

छाटणी, खत आणि पाणी व्यवस्थापन

सीताफळ हे कमी पाण्यात येणारे काटक पीक आहे. सहा महिने बागेला पाणी लागत नाही. पावसाळ्यातच फळे येतात. फक्त पावसाचा आठ दिवसांपेक्षा मोठा खंड पडला तरच सिंचन करावे लागते. त्या काळात मोकळे पाणी देतात. दरवर्षी १५ मे दरम्यान छाटणी केली जाते. १ जूनला झाडांना सिंगल सुपर फॉस्फेट एकरी एक गोणी दिली जाते. त्यानंतर फळे सेट झाली की डीएपी एकरी एक गोणी देतात. फळ पोसायला आले की ठिबकद्वारे ०:५२:३४ आणि ०:०:५० ही खते एकरी तीन किलो प्रमाणे दिले जाते.

...असे करतात तण व्यवस्थापन

पूर्वी वर्षात चार ते पाच वेळा तणनाशकांचा वापर करत असत. त्यातून खर्चात वाढीसोबतच जमीन खराब होण्याची भीती होती. त्यामुळे अलीकडे त्यांनी वर्षातून एकदाच तणनाशकाच्या वापराचा प्रघात सुरू केला आहे. फळतोडणीच्या काळामध्ये अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने वर्षातून एकदाच तणनाशकाचा वापर काळजीपूर्वक केला जातो.

उर्वरित काळात तणांची अपेक्षित वाढ झाली की ट्रॅक्टरवरील ब्रश कटरच्या साह्याने ते कापून टाकले जाते. त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.

एकरी फक्त दहा हजार खर्च

कपाशी. सोयाबीनसारख्या पारंपरिक पिके घेताना खर्चाचे गणित जुळवताना खैरे यांची दमछाक व्हायची. शेतातील तण व्यवस्थापन करता करता नाकी नऊ यायचे. आता सीताफळ बागेचा एकरी खर्च दहा हजारांच्या पुढे फारसा जात नाही. त्या तुलनेमध्ये बागेतून उत्पादन वाढत आहे. तसेच गेल्या तीन वर्षांचे दरही चांगले राहिल्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली असल्याचे खैरे यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांतील उत्पन्न साधारणपणे असे- २०२२ मध्ये सरासरी ४५ रुपये प्रति किलो या प्रमाणे ७ लाख २१ हजार रु. उत्पन्न मिळाले. २०२३ मध्ये सरासरी ३७ रुपये प्रति किलो या प्रमाणे १५ लाख २१ हजार रु. मिळाले. २०२४ मध्ये सरासरी ४२ रुपये प्रति किलो या प्रमाणे ३ लाख ५१ हजार रुपये असे होते.

भाऊही वळला सीताफळाकडे

रामप्रसाद खैरे यांचे अर्थकारण सीताफळ बागेमध्ये मजबूत झालेच, पण त्यांनी आपल्या भावालाही या पिकाचे अर्थकारण पटवून दिले. त्यांचे बंधू दिगंबर दादाभाऊ खैरे यांनीही साडेनऊ एकर क्षेत्रात सीताफळाची लागवड केली आहे.

कुटुंबाचा हातभार मोलाचा...

मुलगा सतीश हा बी. एस्सी. (ॲग्री) झाला असून, संपूर्ण वीस एकर शेतीच्या व्यवस्थापनामध्ये रामप्रसाद खैरे यांना मोठी मदत होते. पत्नी सौ. सुनीता व सूनबाई सौ. स्वाती यांची तोडणी व प्रतवारीमध्ये मोलाची मदत होते. आई शांताबाई यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद सर्वांत महत्त्वाचा ठरतो. ‘ॲग्रोवन’ सुरू झाल्यापासून मी तो वाचत असून, त्यातील महत्त्वाच्या लेखांचे फोल्डर बनवले आहेत. नवनवे तंत्रज्ञान माहिती होण्यासाठी ‘ॲग्रोवन’ वाचनाचा मोठा फायदा होत असल्याचे ते सांगतात.

रामप्रसाद खैरे, ९३०९११२४३७

सतीश खैरे, ९५७९७४४९९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Theft : पोलिस पाटलांच्याच बागेतून डाळिंबांची चोरी

Diwali Bonus : महात्मा फुले दूध डेअरीतर्फे दूध उत्पादकांना प्रतिलिटर २ रुपये बोनस

Soybean Procurement Center : सव्वा लाख हेक्टरवर सोयाबीन, तर खरेदी केंद्रे दोनच

Water Supply : ‘कोकाकोला’चे पाणी बंद करा

Golden Sitafal : गोल्डन सीताफळाकडे ग्राहकांची पाठ

SCROLL FOR NEXT