Onion Harvesting Machine
Onion Harvesting Machine Agrowon
यशोगाथा

Onion Harvesting Machine : कांदापात कापणीचे स्वयंचलित यंत्र विकसित

मुकुंद पिंगळे

Kandapat Kapani : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालय व श्री. एच.एच.जे. बी. तंत्रनिकेतन विद्यालय कार्यरत आहे.

तंत्रनिकेतनच्या पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात विद्यार्थ्यांना प्रकल्प तयार करावा लागतो. त्यानुसार ‘मेकॅनिकल’ शाखेच्या विद्यार्थ्यांनी कांदा पिकातील तंत्रज्ञानावर ‘फोकस’ केला. त्याचे कारण जिल्ह्यातील कसमादे भाग रब्बी व उन्हाळी कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. मात्र येथे मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात भासते. कांदा लागवड यंत्र उपलब्ध झाले आहे.

मात्र काढणी व पात कापणीसाठी यांत्रिकीकरण झालेले ऐकिवात नव्हते. पारंपरिक पद्धतीने रब्बी व उन्हाळी कांद्याची पात कापणी विळ्याच्या साह्याने केली जाते. मात्र मजुरांच्या माध्यमातून हे काम अधिक श्रमाचे, वेळखाऊ व आर्थिकदृष्ट्या खर्चिक असते.

अनेकदा विळा लागून इजा होण्याचा धोका असतो. या बाजू अभ्यासून विद्यार्थ्यांनी उन्हाळी कांद्यासाठी उपयोगी ठरू शकणारे नावीन्यपूर्ण स्वयंचलित पात कापणी यंत्र विकसित करण्यास सुरुवात केली.

...अशी झाली यंत्रनिर्मिती

सागर ऐशी, पंकज पवार, दुर्गेश भामरे व लोकेश देवरे हे चौघे विद्यार्थी कळवण, सटाणा व देवळा तालुक्यांतील आहेत. शेतकरी कुटुंबातच ते वाढले असल्याने त्यांना कांदा शेतीतील समस्या जवळून माहीत होत्या. यंत्रनिर्मितीसाठी हा महत्त्वाचा घटक होता. तांत्रिक ज्ञानासह विविध शोधनिबंधांचा अभ्यास केला. वापरण्यास सोपे, मर्यादित खर्च व उपयुक्तता या बाबींना प्राधान्य दिले.

प्राध्यापक किशोर सोनवणे यांनी प्रकल्प मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारली. कांदा पात यंत्र तयार झाले. पण त्यात काही त्रुटी होत्या. मग योग्य अंतरावर कापणी, पात व कांदा विलगीकरण यात काही बदल घडविले. अखेर बुद्धी कौशल्य, संशोधकवृत्ती, अथक प्रयत्नांतून स्वयंचलित पद्धतीचे कांदा पात कापणी (ओनियन लीफ कटर) यंत्र विकसित करण्यात यश आले.

कळवण तालुक्यात त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. मजुरी, वेळ व खर्चात बचत शक्य असल्याचे निष्कर्ष त्यातून पुढे आला. या निर्मितीसाठी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे, विभागप्रमुख डी. व्ही. लोहार, प्रकल्प समन्वयक डॉ. जी. डी. शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहून यंत्राची कार्यप्रणाली समजून घेतली आहे. नावीन्यपूर्ण यंत्र असल्याने त्याचे पेटंट मिळविण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

यंत्राची रचना व कार्यप्रणाली

-दोन मिलिमीटर जाडी व ३ बाय १.५ इंच आकाराच्या एमएस पाइपवर आधारित आर्क वेल्डिंगच्या साह्याने सांगाडा निर्मिती

-सांगाडा वाहतुकीसाठी मागील बाजूस १४ इंच आकाराच्या परिघाच्या दोन चाकांची जोडणी. पुढील भागात आधारासाठी बोल्टच्या आधारे स्टँड.

-शेतातून पातीसाहित काढणी केलेले कांदे यंत्राच्या मागील भागात वरील बाजूस हॉपरमध्ये टाकले जातात. एक मिमी शीट मेटलद्वारे हॉपरची निर्मिती. त्याची एकावेळी क्रेटभर पातीसहित कांदे टाकण्याची क्षमता.

-हे कांदे यंत्राद्वारे पुढे जाण्यासाठी ‘कन्व्हेअर’ सिस्टीम. त्यासाठी जीआय शीटचा वापर.

-या यंत्रणेतून पुढे आलेले कांदे कापणीसाठी पातीसहित जाण्यासाठी वर्तुळाकार स्लॉटेड रोटर रचना. त्यात एकूण २८ ओळी. प्रत्येक ओळीत ९ स्लॉट्‍स. असे एकूण २५२ चौकोनी स्लॉट्‍स.

-या यंत्रणेद्वारे कांदा स्लॉटमध्ये तर पात वर उभी असते. रोटर फिरल्यानंतर पात ‘कटर’च्या संपर्कात येऊन योग्य अंतरावर कांद्याच्या मानेजवळ कापली जाते. हार्ड मेटल स्टीलचा कटर वापरला आहे.

-पुढील प्रक्रियेत कांदा व पात विलग होते. पात बाजूला, तर दुसऱ्या ट्रेद्वारे कापला गेलेला कांदा संकलित करण्याच्या भांड्यात जाऊन पडतो.

-‘कन्व्हेअर’ आणि रोटरच्या गतीवर नियंत्रण व सुसंगतता ठेवण्यासाठी गिअर बॉक्स व वेगवेगळ्या आकाराच्या पुलीचा वापर.

-यंत्र वापरासाठी सिंगल फेज वीजपुरवठा व देखभाल आवश्यक.

-हे यंत्र ६२ हजार रुपयांत तयार झाले. मात्र त्याची निर्मिती व मजुरी असा खर्च धरल्यास ही किंमत ९० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. आगामी काळात ट्रॅक्टरचा शाफ्ट व सौरऊर्जेच्या माध्यमातून यंत्राचा वापर करण्याचे प्रयत्न.

यंत्राचे फायदे

- तासाला १० क्विंटल प्रक्रिया करण्याची यंत्राची क्षमता. त्यामुळे वेळ, मजुरी व खर्चात बचत.

-चाके असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे शक्य.

-मानवी हाताळणी सुलभ व सुरक्षित

-पर्यावरण पूरक- प्रदूषण विरहित

संशोधनाचा झाला गौरव

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आयोजित राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत या कांदा पात कापणी यंत्रनिर्मितीसाठी एक लाखांचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. आगामी काळात व्यावसायिक बाजू अभ्यासून उत्पादन व विक्रीचा मानस आहे.

संपर्क : किशोर सोनवणे (प्रकल्प मार्गदर्शक) ९५११६११९४७

सागर येशी (प्रकल्प समूह प्रमुख विद्यार्थी) ९२८४१६०५९६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT