Gawde Family Agrowon
यशोगाथा

Flour Manufacturing Industry : पीठ निर्मिती उद्योगातून बसविली आर्थिक घडी

Article by Eknath Pawar : रानबाबुंळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील माधवी संतोष गावडे आणि आकांक्षा संदीप गावडे यांनी गृहउद्योगांच्या माध्यमातून वीस प्रकारची पिठे आणि प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती करीत कुटुंबाची आर्थिक घडी पूर्वपदावर आणली आहे. यामुळे शेती विकासाला चालना मिळाली आहे.

एकनाथ पवार

Success Story of Farmer : रानबाबुंळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) गावशिवारात खरीप हंगामात भात, नाचणी लागवड असते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळ्यामध्ये कुळीथ, वाल, भाजीपाला लागवड असते. या गावातील कावलेवाडीमधील गावडे कुटुंबाचा पाच एकर शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. संतोष गावडे हे एक उत्तम शेतकरी आहेत. शेती करताना त्यांनी सहकारी मित्रासोबत भागीदारीत एक व्यवसाय सुरू केला.

या व्यवसायाकरिता लागणारे लाखो रुपयांचे कर्ज त्यांनी आपल्या स्वतःच्या नावावर घेतले होते. हा व्यवसाय सुरू झाला परंतु दोन वर्षांतच सहकाऱ्यांकडून गावडे यांची फसवणूक झाली. संपूर्ण व्यवसाय कोलमडल्यामुळे गावडे कर्जबाजारी झाले. शेतीवरच कुटुंबाची मदार असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणातील कर्ज भरायचे कसे, असा प्रश्न सतत या कुटुंबासमोर उभा राहिला.

बँकेकडून सतत कर्ज हप्ता भरण्याचा तगादा होता. काही दिवस बँकेने सहकार्य केले, परंतु त्यानंतर बँक वसुलीबाबत आक्रमक होऊ लागली. घरावर जप्ती आणणार असल्याचे सांगितल्याने संपूर्ण कुटुंब अस्वस्थ झाले. गावडे यांच्याकडे बँकेचे कर्ज भरण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. अशा कठीण प्रसंगात माधवीताई पुढे आल्या.

त्यांनी आपले सर्व दागिने संतोष गावडे यांच्याकडे दिले. दागिने पुन्हा बनविता येतील, परंतु बँकेचे सर्व कर्ज भरून मोकळे होऊया असे ठरले. या वेळी माधवीताईंना आई, भाऊ, भावजय यांची चांगली साथ मिळाली. गावडे कुटुंबाने थकित सर्व कर्ज भरले.

कर्जफेडीमुळे कुटुंबाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली होती. परंतु कुटुंबातील सर्व जण एकमेकांना पाठबळ देत होते. याचवेळी बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन २००७ मध्ये माधवीताई आणि त्यांच्या जाऊ आकांक्षा आणि सासू सुनीता या तिघींनी कुळीथ पीठ तयार करण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला परिसरातील शेतकऱ्यांकडून पाच किलो कुळीथ खरेदी केले. पारंपरिक पद्धतीने कुळीथ पीठ तयार केले. याची विक्री स्थानिक बाजारपेठेत करून गृह उद्योगाची सुरुवात झाली.

प्रक्रिया व्यवसायाला गती :

स्थानिक बाजारपेठेमध्ये कुळीथ पीठ विक्रीसाठी जाऊ लागल्यानंतर ग्राहकांकडून विविध पिठांची मागणी होऊ लागली. त्यानुसार गावडे कुटुंबीय पीठ निर्मिती करू लागले. स्थानिक पातळीवर किरकोळ स्वरूपात पिठाची विक्री होत होती. परंतु त्यातून उलाढाल वाढत नव्हती. त्यामुळे माधवीताईंचे पती संतोष हे पिठाचे नमुने घेऊन मुंबईला गेले. मुंबईत अनेक ठिकाणी ते फिरले. परंतु अपेक्षित प्रतिसाद त्यांना मिळत नव्हता.

अनेक व्यापाऱ्यांनी तर बाजारपेठेपेक्षा आपल्या मालाची किंमत अधिक असल्याचे सांगितले. मात्र गावडे यांनी आपल्या पिठाची चव बघा असा आग्रह धरीत अनेकांना फ्री सॅम्पल दिले. ज्यांनी पिठाची चव बघितली त्यांनी कुळीथ पिठाची मागणी नोंदविली. मुंबईतील दोन मित्रांनी गावडे यांना लालबाग आणि दादरमधील ओळखीच्या दुकानदारांकडे नेले.

या दोघांनी एकूण परिस्थिती ऐकून घेतल्यानंतर ५० किलो पिठाची ऑर्डर दिली. या दोन व्यापाऱ्यांनी दिलेल्या पाठबळामुळे गावडे कुटुंबीयांच्या आशा पल्लवित झाल्या. संपूर्ण कुटुंब प्रक्रिया उद्योगात काम करू लागले.

सुरुवातीला गावडे यांच्याकडे पीठ निर्मितीसाठी यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे सर्व काम हाती करावे लागत होते. त्यानंतर दुसऱ्यांच्या गिरणीवरून पीठ तयार करून घेतले जात होते. हळूहळू बाजारपेठेतील मागणी वाढली. मुंबईतही खप वाढू लागला. त्यामुळे गावडे यांना मुंबईतील दोन्ही व्यापाऱ्यांनी पीठनिर्मिती दोन यंत्रे खरेदी करण्यासाठी सहकार्य केले. गावडे कुटुंबाने गुणवत्तेशी तडजोड न करता पीठ उत्पादनाची गती वाढविली. तसेच मागणीनुसार विविध पिठाच्या निर्मितीला सुरुवात केली.

प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी गावडे यांनी घरघंटी तसेच पीठ गिरणी स्वगुंतवणुकीतून खरेदी केली. स्टार्टअप योजनेतून भाजणी यंत्र, ड्रायर, पॅकिंग यंत्रांची खरेदी केली. यासाठी मुंबईतील विजयलक्ष्मी मसाले आणि मनोहर केळकर यांनी आर्थिक सहकार्य केले. या प्रक्रिया उद्योगातून आता दरमहा खर्च वजा जाता ३० ते ४० हजारांची उलाढाल होते. सध्या माधवीताई वीसहून अधिक प्रकारच्या पिठांची निर्मिती करतात. प्रक्रिया उत्पादनाला वेगळी ओळख मिळण्यासाठी ‘बाबाप्रसाद महिला गृहउद्योग' हा ब्रॅण्ड तयार केला आहे.

कुटुंबाची खंबीर साथ :

प्रकिया व्यवसायात कुटुंबातील सर्व व्यक्ती काम करतात. प्रकिया आणि पॅकिंगचे काम महिला करतात. विक्रीचे नियोजन पुरुष मंडळींकडे असते. गरजेनुसार स्थानिक पाच महिलांना काम दिले जाते. माधवी आणि आकांक्षा गावडे यांना सासू सुनीता गावडे, संतोष गावडे, संदीप गावडे आणि राहुल गावडे हे कुटुंबातील सदस्य मदत करतात.

कुटुंबातील सदस्य कृषी विभाग तसेच आत्मा अंतर्गत अभ्यास सहल, प्रशिक्षणामध्ये सहभागी होतात. संतोष गावडे हे पारंपरिक भात आणि कडधान्य पिकांच्या विविध जातींची लागवड आणि संवर्धन करतात. पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन करीत असलेल्या ॲग्रीकार्ट शेतकरी फार्मर कंपनीचे ते अध्यक्ष आहेत.या कंपनीने कुडाळ येथे सीडबँक तयार केली आहे. बियाण्यांची बहुतांशी लागवड गावडे यांच्या प्रक्षेत्रावर केली जाते.

प्रक्रिया उद्योगाची वाटचाल :

व्यवसायामध्ये १७ वर्षांचा अनुभव.
भात, नाचणी, कुळीथ, वाल यांसह विविध पिकांचे उत्पादन.
तीन प्रकारची कुळीथ पीठ, लाल पोहे, हातसडीचे पोहे, डांगर पीठ, घावन पीठ, वडे पीठ, थालीपीठ, मिश्र पीठ (ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी, गहू), नाचणी सत्त्व, मेतकुट, मोदक पीठ आदी वीस उत्पादनांची निर्मिती.पारंपरिक उकडा तांदूळ, नाचणीची विक्री.
१०० ग्रॅम, २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, १ किलो, दोन किलो, पाच किलोमध्ये पॅकिंग.
दर प्रति किलो ः कुळीथ पीठ-१८० ते २१० रुपये, डांगर पीठ-२५० रुपये, मिश्र पीठ -६० रुपये, नाचणी सत्त्व-१२० रुपये, लाल पोहे-८० ते १०० रुपये, घावन पीठ आणि वडे पीठ-८० रुपये.
दरवर्षी १५ टन कुळीथ, १० टन लाल भात, २ टन नाचणी, २ टन उडीदावर प्रकिया.
कुळीथ, लाल भात, नाचणीची स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी. तसेच स्वतःच्या शेतीमध्ये लागवड.
स्थानिक बाजारपेठ तसेच मुंबईमधील दादर, भायखळा, लालबाग, डोंबिवली परिसरात विक्रीचे नियोजन.
मुंबईतील विविध प्रदर्शन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी प्रदर्शनातील स्टॉलवरून विक्री.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT