रेसीड्यू फ्री डाळिंबाची बाग
रेसीड्यू फ्री डाळिंबाची बाग  
यशोगाथा

स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीचाच ध्यास

Abhijeet Dake

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील गुलाबराव आत्माराम पाटील यांनी सुमारे २२ वर्षे बाएफ या स्वयंसेवी संस्थेत देशभर विविध ठिकाणी नोकरी केली. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपल्या घरच्या शेतीचा विकास सुरू केला. अत्यंत उत्साही, तांत्रिक ज्ञानाचा अनुभव व प्रत्येक गोष्टीत झोकून देण्याची वृत्ती यामुळे स्वतःच्या फळबाग शेतीबरोबर परिसरातील शेतकऱ्यांची शेतीही प्रयोगशील करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे.   गुलाबराव पाटील हे आटपाडी (जि. सांगली) येथील रहिवासी. पूर्वीपासूनच हा भाग दुष्काळी. वडील आत्माराम शेतीच करायचे. त्यांना मोठे शिवाजीराव, गुलाबराव आणि बाजीराव अशी तीन मुले आणि दोन मुली. वडिलोपार्जित शेती केवळ सातेसात एकर. ती कोरडवाहू. पाण्याची टंचाई पाचवीलाच पुजलेली. त्यामुळे बाजरी, हरभरा अशी पिके घेतली जायची. बाकी फारसं काही पिकायचं नाही. पण, कमी पाण्यात प्रगतीशील शेती करण्याची जिद्द वडिलांची होती. काळ बदलत होता. पण कुटुंबाची आर्थिक सुधारणा होत नव्हती. मुलांनी शिकून मोठं व्हावं अशी वडिलीांची इच्छा होती. आईचं छत्र हरपलं नववीत असतानाच गुलाबराव यांच्या आईचं छत्र हरपलं. पैशांची चणचण कमी होत नव्हती. मग बंधू शिवाजी यांनी शाळा सोडून उदरनिर्वाहाचा मार्ग शोधण्यास सुरवात केली. गुलाबरावांना मात्र शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ते इयत्ता १० वीमध्ये पहिले आले. गुलाबराव सांगतात की त्या वेळी माझ्या वडिलांच्या आनंदाला पाराच उरला नाही. सोबत वडिलांबरोबर शेतात काम करणं सुरूच होतं. डाळिंबाच्या उत्पन्नातून शिक्षण परिसरात डाळिंब उत्पादक शेतकरी होते. दरम्यानच्या काळात रोजगार हमी योजनेतून डाळिंबाची लागवड करण्याविषयी माहिती मिळाली. सन १९९२ च्या दरम्यान त्यातून लागवड झाली. त्यातील उत्पन्नातून शिक्षण पूर्ण केले. डाळिंबाला शाश्वत पाणी हवं होतं. मग शेतात विहीर घेण्याचा निर्णय घेतला. सन १९९०-९१ मध्ये काम सुरू केलं. सारं कुटुंब विहीर खोदण्यासाठी राबत होतं. विहिराला पाणी लागलं. सर्वांना आनंद झाला. बंधूंचे छत्रही हरपले पुढे पाण्याची कमतरता भासू लागली. जुन्या विहिरीतून गाळ काढणेही सुरू होते. अचानक काम सुरू असताना संबंधित यंत्राचा काही भाग तुटून अपघात झाला. त्यात शिवाजीराव यांचे निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हे सांगताना गुलाबरावांचे डोळे आजही पाणावतात. कृषी शिक्षण आणि नोकरी सन १९९१ मध्ये गुलाबरावांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापाठीतून बी. एस्सी (फॉरेस्ट्री) चे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर पुणे येथील बायफ संस्थेमध्ये ते नोकरीत रुजू झाले. शेती विकास, पशूधन विकास, आरोग्य, महिला संघटन, याबाबत शेतकऱ्यांत जागृती करण्याचे ते काम होते. नंदुरबार, धुळे या आदिवासी भागात फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल पॅकिंगद्वारे विक्री असे अनुभव मिळाले. तत्कालीन राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांनीही काही ठिकाणी भेटी दिल्या. त्या भागातील शेतकऱ्यांचे स्थलांतर शेती विकासानंतर थांबले हे कामांचे यश असल्याचे गुलाबराव सांगतात. नोकरीनंतर गावची शेती सुमारे २२ वर्षे राज्यात व परराज्यांत नोकरीचा अनुभव घेतला. उत्तर प्रदेशचे संस्थेचे मुख्य म्हणूनही (अलाहाबाद) त्यांनी जबाबदारी पार पाडली. सन २००२ मध्ये गावी परतण्याचा व शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी खूप मोठा दुष्काळ पडला होता. पिण्याचं पाणी मिळणं मुश्कील झालं. कसबसं डाळिंब जगवलं. आत्ताच नोकरी सोडून गावी आलो तर काहीच हाती लागणार नाही या हेतूने निर्णय रद्द केला. सन २०१२ मध्ये रोगराईमुळे डाळिंब बाग काढून टाकली. सन २०१४ ला मात्र स्वेच्छानिवृत्ती घेत गुलाबरावांनी शेतीला सुरवात केली. शेतीचा विकास नोकरीत वनविकास, फलोत्पादन, पशुधन आदी प्रकल्प हाताळल्याने फळबाग लागवड नवी नव्हती. गावी आल्यानंतर पगारातून शिल्लक राहिलेल्या रकमेतून १० एकर शेती विकत घेतली. ती विकसित केली. दरम्यानच्या काळात टेंभू उपसा सिंचन योजनचे पाणी आले होते. त्यामुळे शाश्वत पाण्याची सोय झाली. मग डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला. माळरान जमीन असल्याने पाणी कमीच पडणार होते. मग गाळाची माती आणून शेतात टाकली. मातीचा वापर रोपांजवळ अधिक केला. त्यामुळे कायम वाफसा राहिला. शहरात नको, गावातच राहू मुलगा श्रेयश नाशिक येथे ‘एॅग्री बिझनेस मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला आहे. सांगली शहरात राहूया असा आग्रह त्याने धरला होता. मात्र तेथे राहून शेती पाहणे व त्यात प्रगती करणे शक्य होणार नाही हे समजावून दिले. त्यानंतर मात्र श्रेयसला त्याचे महत्त्व पटले. आपण गावातच राहूया असे सांगणारा श्रेयस परिसरात उत्पादित झालेल्या शेतमाल निर्यातीसाठी पुढाकार घेणार आहे. प्रयोगशील वृत्ती रेसीड्यू फ्री डाळिंब - गुलाबराव हे अभ्यासपूर्ण व्यक्‍तिमत्व आहे. शेतात नवे प्रयोग अन्य शेतकऱ्यांकडून शिकण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यांची सहा एकर डाळिंब बाग आहे. मागील वर्षी त्यांनी एकूण क्षेत्रातून ३५ टन उत्पाादन घेतले. रेसीड्यू फ्री माल पिकवण्यावर भर होता. त्यामुळेच ५० टक्के मालाची निर्यात केली. त्याला सरासरी ९२ रूपये प्रतिकिलो दरही मिळाला. युरोपला व्यापाऱ्यांमार्फत १८ टन निर्यात साधली. त्याला १०२ रुपये दर मिळाला. द्राक्ष लागवड- आटपाडी तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र फार कमी. पण आपण हा प्रयोग करायचा हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून तासगाव, तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, पै-पाहुण्यांकडून माहिती घेतली. त्यातून चार एकरांवर द्राक्ष बाग उभारली. आज दोन्ही पिकांत प्रयोगशील वृत्ती जपत त्यांच्या शेतीची वाटचाल सुरू आहे. शेतीची काही वैशिष्ट्ये

  • सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचेल असे कॅनोपीचे व्यवस्थापन
  • उसाचे पाचट वाळवा तालुक्यातून आणून त्याचे आच्छादन
  • झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर
  • सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा प्रयत्न
  • संपर्क- गुलाबराव पाटील-८८०५६९०६००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT