गावातील रस्ते काॅंक्रीटीकरण व रोपलागवड कार्यक्रम
गावातील रस्ते काॅंक्रीटीकरण व रोपलागवड कार्यक्रम  
यशोगाथा

दुष्काळी भागातील ‘श्रीमंत’ साकूर 

मनोज कापडे

आसपास सर्वत्र दुष्काळी परिसर असताना सुशिक्षित व दूरदृष्टी असलेली सरपंच व्यक्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाला वेगळी दृष्टी कशी देऊ शकते याचा प्रत्यय नगर जिल्ह्यातील साकूर गावाला भेट दिल्यानंतर येतो. विविध उपक्रम व विकासकामांच्या माध्यमातून नेतेमंडळींसह साकूरच्या ग्रामस्थांनीही  खांद्याला खांदा लावून आपलेही योगदान दिले. आज या गावाने जिल्ह्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.  नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार, राळेगणसिद्धी या गावांप्रमाणेच साकूर देखील आदर्श गावाकडे दमदार वाटचाल करते आहे. शंकरराव पाटील- खेमनर  गावचे सरपंच आहेत. विशेष म्हणजे एमएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेतल्यानंतर महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञपदी नियुक्ती झालेल्या शंकररावांनी गावासाठी नोकरी सोडली. चोवीस तास झपाटल्यासारखे काम करीत शंकररावांनी गावाचे नंदनवन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांनीही गावच्या प्रगतीसाठी तेवढ्याच उत्साहाने योगदान दिले आहे. गावात ग्रामसचिवालय, तलाठी कार्यालय, महसूल मंडळ कार्यालय, बसस्थानक, व्यापारी संकुल, सांस्कृतिक भवन, निसर्गपूरक स्मशानभूमी, पाणीपुरवठा प्रकल्प, जलशुध्दीकरण केंद्र, ग्रामीण रुग्णालय, ग्रामदैवत मंदिर, शाळा-महाविद्यालय, आठवडे बाजार, सौर विद्युत प्रकल्प, आपले सेवा केंद्र अशी विविध विकासकामे झाली आहेत. चकित करणारी बाब म्हणजे या कामांतूनच ग्रामपंचायतीची आजमितीला ५० कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता तयार झाली आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे असून सर्व प्रकारचे दाखले देण्यासाठी ग्रामपंचायतीने आपले सेवा केंद्र सुरू केले आहे.  नेते आणि गावकरी परस्परपूरक  नेते व गावकरी वर्गाने परस्परपूरक भूमिका ठेवल्यावर गाव कसे आकार घेते हे साकूरला फेरफटका मारल्यावर दिसते. सरपंच, ग्रामस्थ यांच्याबरोबरच बाळासाहेब थोरात यांच्यासारखा संयमी नेतादेखील साकूरसारख्या छोट्या गावाच्या विकासात बारकाईने लक्ष घालतो ही बाब उल्लेखनीय आहे.  गावकरी देखील जातपात, धर्मभेद, राजकीय भांडणे या बाबींना थारा देत नाहीत. वाद, तंटे झालेच तर  पोलिस स्टेशन, कोर्टकचेऱ्यांपर्यंत प्रकरणे न जाता आपापसातच मिटवली जातात. सरपंचांच्या शब्दाला किंमत देत न्यायालयातून देखील दावे मागे घेण्याच्या घटना घडल्या आहेत. वेळेवर कर भरण्याचे प्रमाणही चांगले आहे. ग्रामपंचायतीत जाऊन हिशेब विचारणे किंवा माहितीचा अधिकार वापरून माहिती मिळवण्यात देखील गावकरी आघाडीवर आहेत.  पर्यावरणपूरक स्मशानभूमी  जातीय व धार्मिक सलोखा ही साकूरची वेगळी ओळख आहे. गावाच्या एका टोकाला असलेल्या मोकळ्या जागेची नोंद पूर्वी ‘कब्रस्तान’ म्हणून झाली होती. बाजूला मंदिरेही होती. त्यातून पुढे धार्मिक तेढ तयार झाली. मात्र १९९५ मध्ये हा मुद्दा आमदार बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत गेला. त्यांनी या जागेवर शैक्षणिक संस्था उभारण्याचा तोडगा काढला. गावानेही तो स्वीकारला. तेव्हापासून आजपर्यंत गावात धार्मिक वाद झालेला नाही. अंत्यसस्कारासाठी पर्यावरणपूरक अशी तयार केलेली जागा ही साकूरची अजून एक खासियत. स्मशानभूमीला बागेचे रूप दिले आहे. मोठी झाडे, रंगीबेरंगी फुले, सिमेंटचे घाट, पाण्याची सोय, सुरेख बांधणीचे मंदिर अशी देखणी स्मशानभूमी तयार केली गेली. गावकरी तेथे संध्याकाळी फिरण्यास जातात.  सौर प्रकल्पामुळे गाळेधारकांना चोवीस तास वीज   वीजखर्च कमी करण्यासाठी साकूर ग्रामपंचायतीने ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे. त्यासाठी ३८ लाख रुपये खर्च करण्यात आले. गावात तयार झालेली वीज गावात वापरली जाते. जादा वीज शासनाला विकली जाते. त्यामुळे गावाला उत्पन्नाचे नवे साधन लाभले आहे. गावात एकूण २०० युनिट सौर वीज तयार होते. ती ग्रामपंचायतीच्या अडीचशे गाळेधारकांना चोवीस तास पुरविली जाते. त्यामुळे व्यवसायांना उभारी मिळते आहे. एरवी प्रति युनिट सहा रुपये दराची वीज गाळेधारकांना विकत घ्यावी लागत होती. मात्र सौर वीज केवळ ३.३५ रुपयांत ग्रामपंचायत देत असल्याने गावातील व्यावसायिकांची बचत झाली.  ग्रामपंचायतीने दिला रोजगार   वीस गाळ्यांसह दोन मजली भव्य ग्रामसचिवालय आहे. यात सरकारी कार्यालये, व्यापारी गाळे यांशिवाय गावातील मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ग्रंथालय उभारण्यात आले आहे. दुष्काळामुळे गावाच्या आसपास बागायती शेती नाही. त्यामुळे आर्थिक उलाढालासाठी व्यापार वाढविण्याचा निर्णय शंकरारावांनी घेतला. त्यातून आत्तापर्यंत गावात ३०० व्यापारी गाळे ग्रामपंचायतीने बांधले. यामुळे गावात रोजगार तयार झाला. ग्रामपंचायतीचे उत्पन्न दोन लाखांवरून ५६ लाख रुपयांवर गेले. ग्रामपंचायतीने फ्लॅट बांधून मालमत्ता तयार केली. त्यापासून भाडेपट्टा सुरू झाला. संगमनेर तालुक्यात आता व्यापारी उलाढाल असलेल्या गावांच्या यादीत साकूर आघाडीवर आहे.  शिक्षणाचे माहेरघर बनले साकूर  राजकारणापेक्षाही शिक्षणाला महत्त्व देण्याचं गावाचं धोरण आहे. यातून सात अंगणवाड्या, सात जिल्हा परिषद शाळा, दोन माध्यमिक शाळा, दोन इंग्लिश माध्यमिक शाळा, एक मोठे आर्टस्-सायन्स-कॉमर्स महाविद्यालय आहे. सर्व शाळा ‘डिजिटल’ आहेत. शाळांचे नियंत्रण ग्रामपंचायतीकडे आहे. प्राथमिक शाळांमध्ये मुलांची सुरक्षितता जपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.  उघड्या गटारींपासून गावाला मुक्ती  गावात ८० टक्के ग्रामस्थ गावठाणात रहातात. गावाला भरपूर पाणी मिळते. त्यामुळे गटारीदेखील वाहतात. मात्र या गटारी बंदिस्त केल्या. सांडपाण्याचे १०० टक्के व्यवस्थापन करण्यासाठी सांडपाणी एका मोठ्या मलवाहिकेत आणून ते वीजपंपाच्या सहायाने खंडोबाच्या डोंगरावर नेण्यात आले आहे. तेथे सांडपाणी शुध्द करून पुन्हा याच डोंगरावरील दीड हजार झाडांना दिले जाते. यामुळे डोंगर हिरवागार झाला आणि गावाला उघड्या गटारींपासून कायमची मुक्ती मिळाली.  कमी पाऊस असूनही मुबलक पाणी  संगमनेरच्या पठारी भागात २५-३० गावांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागतो. साकोरे गावाला १७० ते २०० मिलिमीटर पावसात समाधान मानावे लागते. मात्र ग्रामपंचायतीच्या नियोजनातून गावाला मुबलक पाणी उपलब्ध होते आहे. मुळा नदीचे पाणी सहा किलोमीटरवरून आणले आहे. त्यासाठी एका डोंगरावर जलकुंभ बांधला बांधून गुरुत्व पद्धतीने गावातील दोन जलकुंभात पाणी आणले गेले. पाणी आले, मात्र त्याचा ‘टीडीएस’ जादा होता. त्यावर ‘झेडपी’ सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रति ताशी दोन हजार लिटर क्षमतेचे ‘आरओ वॉटर फिल्टरेशन युनिट’ उभारण्याची संकल्पना मांडली. त्याप्रमाणे शुध्द पाणी विक्रीसाठी ‘वॉटर एटीएम’ ही संकल्पना शंकररावांनी गावकऱ्यांसमोर मांडली. हे पाणी केवळ २० पैसे प्रतिलिटर दराने दिले जाते. योजनेचा लाभ १२०० खातेदार घेत आहेत. गावात कार्यक्रम असल्यास ग्रामपंचायतीकडून टॅंकरद्वारे विकत पाणी दिले जाते. वापराच्या पाण्यासाठी नळपट्टी आकारली जाते. सर्व कर वेळेत भरावे लागतात. अन्यथा दाखले मिळत नाहीत. यामुळे पाणी मुबलक असले तरी त्याची उधळपट्टी होत नाही. वर्षानुवर्षे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या विविध विकारांमधूनही गावकऱ्यांची सुटका झाली आहे.  अशी तयार केली उत्पन्नाची साधने  (प्रतिवर्षी मिळणारे उत्पन्न) 

  • व्यापारी गाळे - १५ लाख रुपये 
  • शुद्ध पाणी विक्री - दीड लाख रु. 
  • बाजारपट्टी - साडेसात लाख रु. 
  • घरपट्टी - १४ लाख रु. 
  •  पाणीपट्टी - १३ लाख रु. 
  • सांस्कृतिक भवन भाडेशुल्क - एक लाख रु. 
  • कार्यक्रमासाठी टॅंकरने पाणी - दोन लाख रु. 
  • कामांसाठी प्रेरणा मिळते  राळेगण सिद्धी गावातील गणपतराव औटी हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मुख्य कार्यकर्ते. औटी यांच्या निधनानंतर अण्णांनी राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. त्यातील पहिला पुरस्कार शंकरराव पाटील यांना देण्यात आला. त्यांचे कौतुक कऱण्यासाठी स्वतः अण्णा हजारे, पोपटराव पवार हजर होते. शंकरराव या अनुषंगाने भावना व्यक्त करताना म्हणाले, की दोन दशकांपासून सुरू असलेल्या ग्रामविकासाच्या प्रयत्नांचे चीज झाल्यासारखे वाटते. पुढील कामांसाठी प्रेरणा मिळाली. आता एक कोटी रुपये खर्च करून मराठी प्राथमिक शाळा बांधणार आहोत. भविष्यात १४ हजार लोकसंख्येला दुष्काळात साडेतीन महिने पाणी पुरवेल असा चार कोटी रुपयांचा तलाव उभारणार आहोत. शेतकऱ्यांसाठी कांदाचाळी, वीस लाख रुपये गुंतवणुकीचे भाजीबाजार शेड आणि मपंचायतीच्या मालकीचे मंगल कार्यालय बांधणार आहोत.  संपर्क - शंकरराव पाटील - खेमनर - ९८२२०९०३७३  सरपंच  संतोष दिगंबर गोडे - ८६०५७४९७९५  ग्रामविकास अधिकारी   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT