दूध आटवून उत्कृष्ठ पेढा निर्मिती केली जाते.
दूध आटवून उत्कृष्ठ पेढा निर्मिती केली जाते.  
यशोगाथा

कणसे यांच्या उत्कृष्ठ पेढ्यांचा कृष्णा ब्रॅंड

रमेश वत्रे 

पुणे जिल्ह्यात वाखारी (ता. दौंड) येथे स्वतःची एक गुंठेही जागा नसताना राजेंद्र कणसे यांनी १६ वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावरील जागेत दुग्धव्यवसाय व पेढा निर्मितीस सुरवात केली. अत्यंत चिकाटीने गुणवत्तापूर्ण उत्पादनात सातत्य ठेवले. आज ग्राहकांमध्ये आपल्या कृष्णा या पेढ्याचा ब्रॅंड त्यांनी यशस्वी केला आहे. दररोज सुमारे ८० किलो पेढ्यांच्या विक्रीतून १५ ते १६ हजार रुपयांच्या उलाढालीपर्यंत व्यवसायाचे स्वरूप विस्तारले आहे.   राजेंद्र अनंत कणसे हे मूळचे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील धोलवड गावचे. पाण्याभावी तेथील शेती तोट्यात गेली. ती विकावी लागली. पुढे ओतूर येथे साडेआठ एकर शेती त्यांनी घेतली. उदरनिर्वाहाचा प्रश्‍न काही मार्गी लागत नव्हता. अशातच १९९९ मध्ये वरवंड परिसरात एका फिटरला रोजंदारीवर ठेऊन भाडेतत्त्वावरील जागेत दुचाकीचे गॅरेज सुरू केले. मात्र त्यात मन रमेना. नव्या व्यवसायाच्या शोधात असतानाच एका नातेवाइकांनी पेढे बनविण्याचा व्यवसाय सुचविला.  पेढे निर्मितीत पाऊल  कणसे यांनी पेढे निर्मितीच्या अंगाने साऱ्या शक्यता तपासल्या. त्यात जिद्दीने उतरण्याचेही ठरवले. पण जवळ भांडवल नव्हते. मग दूध, कढई आदी घटक उधारी किंवा भाडेतत्त्वावर घेतले. खिशात असलेल्या ३०० रुपयांत वजन काटा विकत घेतला. एवढ्यावरच व्यवसाय सुरू केला. गुणवत्ता, योग्य दर, जनसंपर्क, प्रामाणिकपणा, व्यवसायातील सातत्य यांच्या जोरावर त्यांनी सोळा वर्षांत आपल्य पेढ्यांचा ब्रॅंड तयार केला. ग्राहकांमध्ये विश्‍वास तयार केला.  व्यवसायाविषयी सविस्तर 

  • कणसे यांचा हा व्यवसाय बाराही महिने चालतो. चौफुला केडगाव येथून वाखारी तीन किलोमीटरवरच आहे. याच वाखारीत अलका शेळके यांचे दोन एकर क्षेत्र त्यांनी भाडेतत्वावर घेतली आहे. येथेच घर, गोठा आहे. सुमारे १६ गायींचे संगोपन ते करतात. त्यांचे दररोज ७० लिटरपर्यंत दुधाचे संकलन होते. 
  • दररोज सुमारे ८० किलो पेढ्यांची निर्मिती होते. काही प्रमाणात खवाही तयार होतो. त्यासाठी सुमारे ३०० लिटर दुधाची गरज भासते. उर्वरित दूध दोन शेतकऱ्यांकडून घेतले जाते. हे शेतकरी आठ वर्षांपासून पुरवठा करतात. त्यांना प्रति लिटर २५ रुपये दर दिला जातो. 
  • स्वच्छतापूर्ण वातावरणात दर्जेदार दुधापासून पेढा व सोबत पेढाही तयार होतो. त्यासाठी लाकडी इंधन व कढई यांचा वापर होतो. चुलीवर कढईत दूध आटवून केलेल्या पेढ्यांची चव काही औरच असल्याचे कणसे सांगतात. त्यामुळेच ग्राहकांकडून अधिकाधिक मागणी असते. 
  • पेढ्यात कोणतेही रासायनिक घटक वापरण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांची चव नैसर्गिक असते. 
  • त्यांचा टिकाऊपणाही सहा ते सात दिवसांचा आहे. 
  • सध्या ग्राहकांमध्ये साखर खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हे ओळखून कमी साखर व नियमित साखर अशा दोन प्रकारचे पेढे उपलब्ध केले आहेत. 
  • पेढे व खव्याचा दर किलोला २२० रुपये ठेवला आहे. 
  • सुमारे पाच व्यक्तींना या व्यवसायातून रोजगार दिला आहे. 
  • विक्रीचे कौशल्य  व्यवसाय करीत असताना ग्राहकांचे उभारलेले नेटवर्क हीच कणसे यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे जागेवरच म्हणजे घरूनच सुमारे ५० ते ६० टक्के विक्री होते. उर्वरित विक्री तालुक्यातील हॅाटेल्स, स्नॅक्स सेंटर यांना होते. खाऊच्या पानाच्या दुकानांमध्येही काही ग्राहकांना पानाबरोबर पेढा लागतो. ग्राहकांची ही नस ओळखून तेथेही काही ठिकाणी पेढा उपलब्ध केला जातो.  एकूण विक्रीतून दररोज सुमारे १५ ते १७ हजार रुपयांचे एकूण उत्पन्न मिळते. अर्थात जनावरांचे संगोपन, मजुरी व अन्य खर्चही भरपूर असतो. मात्र सातत्य ठेवले तर व्यवसायातून चांगला नफा मिळतो असे  कणसे सांगतात.  परदेशात पोचला पेढा  केडगाव भागातील एक भारतीय कुटूंब इस्त्रायल येथे राहते. ते प्रसंगी गावीही येतात. पुन्हा त्या देशात जाण्याची वेळ येते त्यावेळी आपल्याकडूनच आवर्जून पेढा नेल्याचे कणसे यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी केडगाव येथील पंडीता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये कॅनडा येथील प्रयोगशील शेतकरी बॅाब रॅामसन आले होते. तेथे त्यांच्या खाण्यात हा पेढा आला. स्थानिकांनी कणसे यांच्या व्यवसायाविषयी माहिती दिल्यानंतर ते कणसे यांच्याकडे आले. पेढ्याची गुणवत्ता व बनविण्याची पारंपरिक पद्धत पाहून त्यांनी कणसे यांचे कौतुक करत त्यांना चक्क कॅनडाला येण्याचे निमंत्रण दिले.  व्यवसायाविषयी मार्गदर्शन  अनेकजण आपल्या व्यवसायाची गुपिते इतरांना सांगत नाहीत. मात्र कणसे आपल्याकडे आलेल्या शेतकऱ्यांना, युवकांना पेढा निर्मितीबाबत सविस्तर मार्गदर्शन करतात. त्यांना स्पर्धेची भीती वाटत नाही. त्याबाबत ते म्हणतात, की जग फार मोठे आहे. जे आपल्याकडे आहे ते इतरांना दिले तर तोटा काहीच होत नाही.  उच्चशिक्षित मुले  कणसे यांचा मुलगा इंजिनियर असून तो कंपनीत नोकरी करतो. मुलगीदेखील गणित विषयात एमएस्सी झाली आहे. दुग्धप्रक्रिया व्यवसायातूनच त्यांची शिक्षणे केल्याचा कणसे यांना अभिमान आहे. 

    संपर्क- राजेंद्र कणसे - ९८६०६३४३१३ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

    Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

    Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

    Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

    Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

    SCROLL FOR NEXT