शेडमध्ये वाफा पद्धतीने असे गांडूळखत तयार केले जाते.
शेडमध्ये वाफा पद्धतीने असे गांडूळखत तयार केले जाते. 
यशोगाथा

गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’

Sudarshan Sutaar

सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव भांगे या युवा शेतकऱ्याने ‘शुभम’ हा गांडूळखताचा ब्रॅण्ड लोकप्रिय केला आहे. महिन्याला २०० ते २५० टनांपर्यंत निर्मिती करून राज्यासह परराज्यात त्यास बाजारपेठ देण्यापर्यंत त्यांनी यश मिळवले आहे. सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथे महादेव अनिल भांगे यांची शेती आहे. उपळाई हा संपूर्ण ऊसपट्टा म्हणून गणला जातो. उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सीना-माढा बोगदा यासारख्या योजनांमुळे पाण्याची पुरेशी उपलब्धता या भागात आहे. त्यामुळे उसाकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे. केळी, डाळिंब आदी पिकेही होतात. गांडूळखत निर्मिती महादेव यांची वडिलोपार्जित केवळ दोन एकर शेती होती. सन २०१० मध्ये पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नजीकच्या साखर कारखान्यात ते रुजू झाले. पण दीड वर्षांतच नोकरी सोडून शेतीलाच वाहून घ्यायचे त्यांनी ठरवले. त्यावेळी ऊसशेतीच होती. सध्या एकूण आठ एकर शेती असून डाळिंब सहा तर ऊस एक एकर आहे. घरच्या शेतीत गांडूळखताचा वापर व त्याचे वाढते महत्त्व त्यांनी ओळखले. त्याचे व्यवसायात रूपांतर करण्याचे ठरवले. शास्त्रीय व्यवस्थापन, दर्जा व सेवा या बाबींवर भर देत त्यांनी ग्राहक शेतकऱ्यांची संख्या वाढवण्यास सुरवात केली. अनुभव व सातत्य व साऱ्या कुटुंबाची साथ यातून विस्तार करणे शक्य झाले. वडील अनिल, आई आशाबाई, पत्नी कविता, भाऊ शंकर आणि त्यांची पत्नी प्रियांका हे कुटुंबातील सारे सदस्य आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतात. भांगे यांची गांडूळखत निर्मिती

  • १०० बाय ३४ फूट व ७० बाय ४० फूट असे दोन शेडस.
  • दर्जेदार उत्पादनासाठी जमीन सपाट असावी लागते. एका बाजूला किंचित उतार असावा लागतो अशी रचना शेडमध्ये केली.
  • वाफा (बेड) पद्धतीचा वापर. बेडच्या तळाशी प्रथम पालापाचोळ्यांचा थर अंथरला जातो. त्यानंतर अर्धा फूट जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा थर असे किमान चार थर टाकून बेड भरून घेतला जातो.
  • प्रत्येक थरावर पाणी फवारले जाते. त्यामुळे शेणातील उष्णता कमी होते.
  • बेडवर गांडूळे सोडण्यात येतात.
  • उन्हाळ्यामध्ये प्रति बेड (गरजेनुसार) दररोज ४० ते ६० लिटर पाणी, हिवाळ्यात ३५ ते ५० लिटर तर पावसाळ्यात २५ ते ३० लिटर पाणी शिंपडण्यात येते.
  • उन्हाळ्यामध्ये थेट ऊन आणि पावसाळ्यात पाणी पडू नये याची दक्षता घेतात.
  • अंधारात गांडुळखताची कार्यक्षमता वाढते व खत लवकर तयार होतो असा अनुभव आहे.
  • गांडुळांची संख्या वाढत जाईल तसतसे खत तयार होण्याचा कालावधी कमी होतो. प्रतही चांगली मिळते. सुमारे दीड महिन्यानंतर चहापावडरीसारखे रवाळ, काळसर रंगाचे भुसभुशीत खत तयार होते.
  • त्यानंतर पाणी शिंपडणे थांबवण्यात येते.
  • शुभम ब्रॅण्ड - माऊथ पब्लिसिटी’ तसेच व्हॉटस ॲप ग्रूप आदींद्वारे राज्यातील
  • विविध भागांसह गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, बेळगाव आदी भागांपर्यंत गांडुळखताचा शुभम ब्रॅण्ड भांगे यांनी लोकप्रिय केला आहे. प्रति टन दहा हजार रुपये दराने बांधापर्यंत ते पोच केले जाते. अर्थात वाहतुकीच्या अंतरानुसार दरांत बदलही होऊ शकतो. गांडूळ कल्चरची प्रति किलो ४०० रुपये दराने विक्री होते.
  • व्हर्मीवॅाशची निर्मिती गांडुळ खत निर्मितीत वापरलेले मारलेले पाणी आणि गांडुळाचे मूत्र वाहून एका बाजूला येण्यासाठी बेडच्या एका बाजूला पाइप बसवून यंत्रणा तयार केली आहे. या ठिकाणाहून ‘व्हर्मीवॅाश’ संकलित केले जाते. ५० लिटरचा ड्रम प्रति १५०० रुपये दराने त्याचीही विक्री होते. व्यवसायात ८ ते १० कामगार कार्यरत आहेत. त्या माध्यमातून रोजगारनिर्मितीही साधली आहे. डाळिंब, ऊसशेती सन २०१५ मध्ये शेतीतील उत्पन्नावरच सहा एकर शेती घेतली. तीन वर्षांपूर्वी सहा एकर डाळिंब लागवड केली आहे. यंदा तिसरा बहर धरला आहेत. डाळिंबासह उसालाही गांडुळखताचा वापर होतो. दोन्ही पिके कमी खर्चात, सेंद्रिय पद्धतीने करण्याकडे कल आहे. डाळिंबाचे एकरी चार टनांपर्यंत उत्पादन घेतात. यंदा त्यात वाढ अपेक्षित आहे. उसाचे एकरी ७० टनापर्यंत उत्पादन मिळते. रोजगारनिर्मिती, अन्य शेतकऱ्यांना मदत महादेव यांच्याकडे स्वतःचे पशुधन नाही. परिसरातील शेतकऱ्यांकडून महिन्याला ३० ते ४० ट्रॉली शेण त्यांना घ्यावं लागतं. त्यातून शेतकऱ्यांनाही उत्पन्न मिळते. महादेव गांडुळ खतनिर्मितीचे प्रशिक्षण देतात. खतनिर्मिती प्रकल्पही उभारून देतात. १५ ते २० जणांनी गांडूळखत निर्मितीही सुरु केली आहे. महादेव यांचा प्रकल्प पाहण्यासाठी दूरवरून शेतकरी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच कृषी विज्ञान केंद्राकडील तज्ज्ञ आवर्जून येत असतात. संपर्क- महादेव भांगे- ९९७०७८७२५९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

    Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

    Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

    Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

    Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

    SCROLL FOR NEXT