- नव्या द्राक्षबागेत घेतलेले दर्जेदार भोपळा पीक दाखवताना डावीकडून सुभाष, संजय व दिलीप जाधव.
- नव्या द्राक्षबागेत घेतलेले दर्जेदार भोपळा पीक दाखवताना डावीकडून सुभाष, संजय व दिलीप जाधव. 
यशोगाथा

प्रयोगशील, प्रगतिशील शेतीत रमलेले जाधव कुटुंब

मुकूंद पिंगळे

नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे जाधव यांचे संयुक्त कुटुंब आहे. पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून ३७ वर्षांपूर्वी त्यांनी द्राक्षशेतीला सुरवात केली. त्यातील उत्पन्नातून नवनवीन तंत्रज्ञान रुजविले. कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ, कामकाजाचे उत्तम व्यवस्थापन, सिंचन व पीकपद्धतीत बदल करीत या कुटुंबाने द्राक्षासह भाजीपाला शेतीत ओळख निर्माण केली आहे. बदलत्या काळानुसार प्रयोग करत अर्थकारण उंचावले आहे. नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता. निफाड) हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील राहुल जाधव यांच्या कुटुंबानेही प्रगतिशील अशी ओळख तयार केली आहे. एकेकाळच्या पारंपरिक शेती पद्धतीत त्यांनी सातत्याने सुधारणा घडवत आपल्यातील प्रयोगशीलतेचा प्रत्यय दिला आहे. असा झाला बदल

  • सन १९८२ पर्यंत मका, बाजरी व गहू अशी पारंपरिक पिके
  • त्यानंतर द्राक्ष, १९८५ पासून टोमॅटो, कारली
  • पीकबदलातून आर्थिक स्तर उंचावू लागला, यातूनच शेती विकसित करण्यावर भर
  • त्यानंतर सिमला मिरची, भोपळा या पिकांतूनही आर्थिक उत्पन्न वाढले. आत्मविश्वास निर्माण झाला. नवे तंत्रज्ञान व व्यावसायिक पिकांचा अनुभव पाहता कुटुंबाने शेतीत वेगळे वलय निर्माण केले.
  • अचूक व्यवस्थापनातून दर्जेदार उत्पादनासह किफायतशीर उत्पन्न मिळविणे शक्य झाले.
  • शाश्वत सिंचनव्यवस्था पूर्वी विहीर व कालव्याची व्यवस्था होती. कालांतराने बागायती पिकांचे क्षेत्र वाढल्याने पाण्याची टंचाई भासू लागली. जलस्रोत मर्यादित होते. मग ६० फूट खोल विहीर खोदली. पुढे जलपातळी आणखी कमी झाली. त्यावर मात करण्यासाठी १५ गुंठ्यांत ३० लाख लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. दोन विहिरी होत्या. मात्र प्रवाही पद्धतीने सिंचन होत असल्याने पाण्याचा अपव्यय व्हायचा. त्यासाठी संपूर्ण १० एकरांत पाइपलाइन उभारली. सर्वत्र सूक्ष्मसिंचन केले आहे. यांत्रिकीकरणातून मनुष्यबळ गरज केली कमी शेतीतील उत्पन्नातून काही रक्कम शिलकीला ठेवत यांत्रिकीकरण केले. सध्या तीन ट्रॅक्टर्स, तीन आधुनिक फवारणी यंत्र व विविध अवजारे आहेत, त्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी होऊन मजुरी खर्चात मोठी बचत झाली. आर्थिक बचतीसह कामाला गती मिळाली.  द्राक्ष शेतीत ओळख सन १९८३ मध्ये एक एकर द्राक्षबाग होती. आज हे क्षेत्र आठ एकरांवर आहे. थॉमसन, मामा जम्बो, शरद सीडलेस हे वाण आहेत. एकरी सुमारे साडे १२ टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यातील सुमारे ७० टक्के निर्यातक्षम असते. स्थानिक कंपनीमार्फत युरोपला निर्यात होते. शेडनेट व ढोबळी मिरची प्रयोग द्राक्ष शेतीतील अडचणी पाहता २००८ मध्ये पंचक्रोशीत ढोबळी मिरचीचा पहिला प्रयोग जाधव यांनी केला, त्यासाठी आठ वर्षे जुनी द्राक्षबाग काढली. ३८ गुंठे क्षेत्रावर अल्प खर्चात त्यासाठी शेडनेट उभारले. सन २०१७ पर्यंत त्यात उत्पादन घेतले. तांत्रिक कारणे व मजुरी समस्येमुळे हा प्रयोग थांबवला. दुधी भोपळ्याचा प्रयोग ऑक्टोबर २०१७ मध्ये नवा प्रयोग म्हणून ३० गुंठ्यांत दुधी भोपळा घेतला. अनुभव नसल्याने किफायतशीर उत्पादन व उत्पन्न मिळविण्यात अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करण्यासाठी अभ्यास करून पिकाविषयी अधिक तांत्रिक ज्ञान घेतले व यशस्वी उत्पादनही घेतले. मागील वर्षी मार्चमध्ये दोन एकर नवी द्राक्ष लागवड केली. लोखंडी अँगलच्या साहाय्याने मांडव उभारला. त्याचा वापर करीत त्यात दुधी भोपळा घेतला. त्याद्वारे द्राक्षबागेचा खर्च कमी होणार आहे. भोपळा व्यवस्थापन

  • सुमारे सहा महिन्यांचे पीक.
  • भोपळ्याचा वेल मांडवावर गेल्यानंतर शेंडा मारणे, खराब पाने काढणे, मर्यादित फळ घेणे, नवीन कळ्या जमिनीकडे वळविणे यांसह कीडनाशकांच्या संतुलित फवारण्या व मात्रा याकडे विशेष लक्ष
  • १५ दिवसांनंतर शेंडा धरल्यानंतर दोरीने बांधणी. पुढील ३५ दिवसांनंतर वेल बागेच्या तारांपर्यंत पोचल्यानंतर बांधणी
  • तारेवर वेल आल्यानंतर योग्य सूर्यप्रकाश व्यवस्था
  • वेलींवर आलेल्या कळ्यांचा अंदाज घेऊन कॅनोपी व्यवस्थापन
  • लागवडीनंतर ४० दिवसांनी काढणी सुरू
  • एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब. चालू वर्षी सातत्याने पाऊस असल्याने करपा रोगाची भीती होती. गरजेनुसार फवारण्या केल्या. फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामगंध सापळे
  • खर्चांच्या सर्व नोंदी व पारदर्शक व्यवहार
  • करार पद्धतीच्या शेतीतूनही विविध पिके घेण्याचा प्रयत्न. चालू वर्षी शेवगा, त्यात सोयाबीनचे आंतरपीक.
  • हाताळणी व प्रतवारी
  • भोपळ्याचा आकार, रंग व देठांची लांबी या गोष्टींचे निकष पाळून मालाची प्रतवारी.
  • काढणीनंतर शेडमध्ये एकत्र केला जातो.
  • आकार व गुणवत्तेनुसार ए, बी, सी ग्रेडमध्ये वर्गीकरण
  • त्यानंतर प्लॅस्टिक आवरणामध्ये प्रतिक्रेट १८ भोपळे रचून विक्री थेट नाशिक मार्केटमध्ये.
  • उत्पादन

  • मागील वर्षी दीड ते पावणेदोन एकरांत ३००० क्रेट उत्पादन
  • यंदा दोन एकरांत आतापर्यंत २००० क्रेटची विक्री (प्रतिक्रेट १८ किलो). ४००० क्रेट उत्पादनाचे लक्ष्य. मागील वर्षी सुमारे दोन ते सव्वादोन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न.
  • दर प्रतिक्रेट

  • १८० ते ५५० रुपये
  • प्रतिभोपळा - १० ते ३० रुपये
  • विक्री : लिलाव पद्धतीने
  • एकत्र कुटुंब हीच ताकद थोरले दिलीप यादवराव जाधव, मधले सुभाष व धाकटे संजय असे तीन भावांचे एकत्रित कुटुंब आहे. सुमारे १६ सदस्य एकत्र राहतात. आपापली जबाबदारी प्रत्येकजण पार पाडतो. सामूहिक शक्तीच्या बळावरच कुटुंबाने आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती साधली आहे. नवी पिढी अभियांत्रिकी, कृषी शिक्षण व ललित कला शिक्षण क्षेत्रात पदवीधर आहे. दिलीप यांना थोरला राहुल व धाकटा गोकूळ अशी दोन मुले आहेत. पहाटेपासून रात्रीपर्यंत व्यग्र राहुल बी.एस्सी. ॲग्री व एबीएम पदवीधर आहेत. कृषी क्षेत्रातील आघाडीच्या स्वयंसेवी संस्थेत ते नोकरी करतात. पहाटे साडेपाचला त्यांचा दिवस सरू होतो. सकाळी नोकरीला जाण्यापूर्वी शेतीचे व्यवस्थापन व रात्री त्याचा फॉलो अप असे त्यांचे व्यग्र वेळापत्रक असते. नवे प्रयोग, तंत्रज्ञान घेण्यातही दोघे बंधू आघाडीवर असतात. श्रमांची बचत, अचूक व्यवस्थापन व विक्री व्यवस्था ही त्यांच्या कामांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. संपर्क : राहुल जाधव - ९४२३०६६००५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

    Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

    Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

    Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

    Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

    SCROLL FOR NEXT