नलावडे यांचा पोल्ट्री व्यवसाय
नलावडे यांचा पोल्ट्री व्यवसाय 
यशोगाथा

पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना मिळवली बाजारपेठ

Amol kutte

धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार वर्षांपासून पांढरी व तपकिरी अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे पालन करीत आहेत. सुयोग्य व्यवस्थापनातून उत्पादित दर्जेदार अंड्यांना त्यांनी व्यापारी व मॉल यांची बाजारपेठ मिळवली. कोरोना लॉकडाऊनच्या संकटात व्यवसायावर परिणाम झाला. तरीही मोठ्या धैर्याने या व्यवसायात पुन्हा भरारी घेण्याचे कसोशीचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले आहेत.   पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात धोलवड येथील गीताराम दत्तात्रय नलावडे यांनी शेती करीत असताना १९९७ मध्ये ब्रॉयलर पक्षांचे पालन सुरू केले. त्यावेळी रस्ते खूपच खराब होते. पक्षी तसेच खाद्य आणणे, पक्षांची विक्री ही कामे खूपच अवघड जात होती. सन २००० मध्ये गावात रस्त्यालगत तीनहजार हजार पक्षी क्षमतेचे शेड भाडेतत्त्वावर घेऊन चालवले. सन २००४ साली स्वतःच्या जमिनीत पाच हजार पक्षांचे शेड उभारल्यानंतर खऱ्या अर्थाने व्यवसायाला सुरुवात केली. ब्रॉयलर कोंबड्यांचे २०१८ पर्यंत करार पद्धतीने उत्पादन घेतले. मात्र एकूण विचार करता त्यातील अर्थकारण फायदेशीर ठरत नव्हते. लेअर पक्षांचे उत्पादन वर्षभरातील नफ्याचा न बसणारा मेळ पाहता लेअर कोंबड्यांचे पालन सुरू केले. केजेस, यंत्रणा, पक्षी, खाद्य यासाठी ५० लाख रुपयांची गुंतवणूक केली. अडचणींचा सामना करीत पांढऱ्या तसेच तपकिरी अंडी देणाऱ्या कोंबड्यांची जोपासना सुरू केली. पत्नी निलम, पुतण्या सर्वद आणि ओम नलावडे यांचे सहकार्य मिळू लागले. दोन मजूर तैनात केले. डॉ. वाघमारे, पोल्ट्री उत्पादक सचिन नेहे, अरुण पोटे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यातून चार वर्षांत व्यवसायात चांगला जम बसला. पोल्ट्री व्यवस्थापन- ठळक बाबी

  • एक एकर क्षेत्रात शेड. लांबी साडेसहाशे फूट तर रुंदी ३२ फूट
  • शेडची दोन भागात विभागणी. लोखंडी केजेसचा (पिंजरे) एक भाग. यात पांढरी अंडी देणाऱ्या सुमारे १० हजार कोंबड्या बसतात. उर्वरित जागा पिल्ले व खाद्यनिर्मितीसाठी
  • प्रति पिंजऱ्यामध्ये तीन पक्षी. निपल यंत्रणेद्वारे पक्षी चोचीने पाणी पितो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो. खाली सांडत नसल्याने माशांचा त्रासही कमी
  • खाद्यासाठी तसेच अंडी जमा होण्यासाठी वेगवेगळे ट्रे
  • पक्षी जमिनीपासून एक मीटर उंचीवर. त्यामुळे विष्ठा त्याखालील जागेत जमा.
  • वीजभारनियमन वेळापत्रक सांभाळून खाद्यनिर्मिती. यासाठी फिडमिल यंत्रणा. मका, सोया, तांदळाचा चोथा आदींचा वापर.
  • दररोज सुमारे एक टन खाद्य तयार केले जाते. प्रति किलो २५ रुपये खर्च येतो.
  • अंडी उत्पादन व खर्च

  • कंपनीकडून एक दिवसीय पिल्लू ४० रुपयांना तर १५ आठवड्याचा पक्षी २५० रुपयांपर्यंत मिळतो.
  • १९ आठवड्यांचा पक्षी अंडी देण्यास सुरुवात करतो. या काळात त्याचा खर्च ३५० रुपये. २४ व्या आठवड्यापर्यंत पूर्ण क्षमतेने अंडी उत्पादन. ८० आठवड्यांपर्यंत अंडी मिळतात.
  • दहा हजार कोंबड्यांपासून दररोज ७ ते साडेआठ हजार अंडी मिळतात. पुढे पक्षी मांसासाठी विकला जातो.
  • महिन्याला लसीकरण पाच हजार रुपये, जीवनसत्त्वे, प्रथिनांसाठी १० हजार रुपये, शेड निर्जंतुकीकरण पाच हजार रुपये, मजुरी प्रतिदिन
  • सुमारे एक हजार रुपये खर्च.
  • एकूण सर्व खर्च व परिश्रम यांचा विचार केल्यास मिळणारा नफा अत्यंत कमी असल्याचे नलावडे सांगतात.
  • तपकिरी अंड्यांना जास्त मागणी

  • सुमारे ८० टक्के अंड्यांची पुणे, मुंबईतील व्यापाऱ्यांकडून जागेवर खरेदी
  • उर्वरित अंड्यांची स्थानिक विक्रेते किंवा घरगुती ग्राहकांना विक्री.
  • तपकिरी अंड्यांमध्ये प्रथिने व पोषकद्रव्ये अधिक असल्याने त्यांना अधिक मागणी. दरही दीड ते २ रुपये जास्त.
  • आयटी क्षेत्रातील ग्राहकांकडून या अंड्यांना जास्त मागणी असल्याचे नलावडे सांगतात.
  • मॉलसाठी खरेदी एक व्यापारी नलावडे यांच्याकडून अंडी खरेदी करून ती त्यांच्या ब्रॅण्डने मॉलला पुरवतो. सहा नगाच्या ट्रेमध्ये पॅकिंग. थंडीच्या महिन्यात चांगली मागणी. उन्हाळ्यात मागणीत घट. लॉकडाऊनमधून सावरणार नलावडे म्हणाले की लॉकडाऊनच्या काळात व्यवसायाला मोठा फटका बसला. काही लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. वाहतूक बंद असल्याने खाद्यासाठी कच्चा माल उपलब्ध न झाल्याने पक्षांची उपासमार होऊन अंडी देण्याची क्षमता कमी झाली. एका व्यापाऱ्याने तर दीड किलो वजनाचा पक्षी २० ते २५ रुपये एवढ्या कमी दराने खरेदी केला. नियम जसे शिथिल होत आहेत त्याप्रमाणे ना नफा ना तोटा स्थितीत व्यवसाय सुरू आहे. पांढऱ्या अंड्याला साडेतीन रुपये तर तपकिरी अंड्यांना पाच ते साडेपाच रुपये दर मिळतो. मॉल्स बंद असल्याने व्यापाऱ्यांकडून उठाव नाही. प्रति बॅच ३० ट्रॉली कोंबडी खत मिळते. प्रति ट्रॉली पाच हजार रुपये दर मिळतो. तेवढा दिलासा आहे. येत्या काळात पुन्हा भरारी घेण्याचा प्रयत्न आहे. निसर्ग वादळाचा फटका नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचाही तडाखा बसला. या काळात पक्षांना घरात हलवून सुरक्षा देण्यात आली. अंडी उत्पादन काहीसे कमी झाले. भिजल्याने पाच टन खाद्याचे नुकसान झाले. शेतीचे नियोजन

  • ॲग्रोवनमधून मस्यपालनाची माहिती मिळाल्यानंतर तीन गुंठ्यात शेततळे उभारून मृगल व चंदेरी माशांचे पालन करण्याचे नियोजन
  • घरगुती दुधासाठी तीन गीर गायींची जोपासना
  • आपल्या आठ एकरांत ऊस, दोन एकरांत कांदा, गहू, हरभरा
  • संपर्क- गीताराम नलावडे- ९८६०३०४२५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT