सुहास लावंड यांच्या शेतात निशिगंधाची तोडणी सुरू असताना.
सुहास लावंड यांच्या शेतात निशिगंधाची तोडणी सुरू असताना.  
यशोगाथा

फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची यशकथा ठरली ‘टर्निंग पॉइंट’ 

ज्ञानेश्वर रायते 

पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी फूलशेतीतून आपले आयुष्य पालवटले आहे. पायाने अपंग व किराणा दुकानात एकेकाळी नोकरी करण्याची वेळ आलेल्या सुहास यांनी संकटांवर मात करीत विविध फूलपिकांची शेती अत्यंत कष्टाने उभी केली. बाजारपेठ व्यवस्था मिळवली. ‘ॲग्रोवन’मधील यशकथा वाचून आपल्याला प्रेरणा मिळाली. तेथून आयुष्य बदलण्यास कलाटणी मिळाल्याचे ते नम्रपणे विशद करतात.  पुणे जिल्ह्यात रुई गावातील (ता. इंदापूर) माने-लावंड वस्तीत सुहास विठ्ठल लावंड राहतात. येथेच त्यांची शेती आहे. वाटण्या झाल्यानंतर वडिलोपार्जित अडीच एकर बागायती व दीड एकर जिरायती क्षेत्र त्यांच्या वाट्याला आले. पोलिओमुळे जन्मतःच अपंग असल्याने सुहास यांना काम करण्यावर मर्यादा येत होत्या, तरीही ते शेती करीत होते. सन २००७ पासून त्यांनी भाजीपाला व ऊस घेण्यास सुरवात केली. भाजीपाला पिकांचे उत्पादन चांगले मिळाले, तरी दरांचा फटका अनेकवेळा बसायचा. पाणी, दर, मजूरबळ या अनुषंगाने उसाचे अर्थकारणही किफायतशीर होत नव्हते. जर्सी गायी घेऊन पाहिल्या. पण, हा व्यवसाय दरांच्या अनुषंगाने फायदेशीर ठरला नाही. घरचा उदरनिर्वाह व्यवस्थित होत नव्हता. चार एकर शेती असूनही काय करावे ते उमगत नव्हते.  किराणा दुकानातील नोकरी  घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. अखेर गावातीलच भावकीतील एका किराणा दुकानात त्यांनी २०१४ मध्ये दररोज १४० रुपये रोजंदारीने काम करण्यास सुरवात केली, तरीही जमा-खर्चाचा मेळ जमत नव्हता. उत्पन्नाचे मार्ग शोधण्याचे प्रकार सुरूच होते. एके दिवशी दुकानात जिनसाच्या पुड्या बांधत असताना ‘ॲग्रोवन’चा पेपर हाती आला. त्यात लातूर भागातील फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा होती. संध्याकाळी घरी गेल्यानंतर सुहास यांनी ती यशकथा वाचली. त्याचे अर्थकारण त्यांना भावले. आपणही अशीच फूलशेती केली तर? अशी जिज्ञासा निर्माण झाली.  फूलशेतीचा संकल्प  फूलशेतीचा अभ्यास करण्यास सुरवात केली. लागवडीचा निश्‍चय केला. बोरी (ता. इंदापूर) येथील हरिभाऊ कुंभार यांच्याकडून १५ गुंठे क्षेत्रासाठी निशिगंधाचे कंद घेतले. मात्र, ते खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. पुण्यात असलेला मोठा भाऊ संतोष मदतीला धावला. मी आर्थिक मदत करतो. पण, त्यात यश मिळव. त्यासाठी कष्ट कर, अशी सूचना केली.  फूलशेतीत आत्मविश्‍वास  जून २०१५ मध्ये १० ते १५ गुंठ्यांत गुलछडीचे कंद लावले. त्यात मिरचीचे आंतरपीक लावले. फुलाचे उत्पन्न सुरू होईपर्यंत मिरचीने २० हजार रुपये दिले. त्याचा वापर खुरपणी व मशागतीसाठी झाला.  सप्टेंबरच्या दरम्यान फुलाचे उत्पादन मिळण्यास सुरवात झाली. गणेशोत्सव असल्याने व अन्यत्र आवक कमी असल्याने ३५० ते ४०० एवढा प्रतिकिलो दर मिळाला. त्यादरम्यान चांगले म्हणजे सुमारे लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सुहास व पत्नी राणी अशा दोघांचाही विश्वास बसेना. फूलशेती आपण चांगल्या प्रकारे करायची, असा उत्साह व आत्मविश्‍वास मिळाला.  फूलशेतीत जम बसला  पहिल्या प्रयोगानंतर सुहास यांनी प्रत्येकी दहा ते १५ गुंठ्यांत विविध फुलांची शेती करण्यास सुरवात केली. बारमाही उत्पादन व उत्पन्नाचे नियोजन केले. विशेष म्हणजे, बोरी भागातील प्रसिद्ध फूल व्यावसायिक सोमनाथ शिंदे यांनी सुमारे पाच ते आठ फूल व्यापारी मिळवून देण्यात मदत केली. त्यांना नियमित पुरवठा सुरू झाला. गुलछडीचे बाराही महिने उत्पादन सुरू असते. दिवसाला गुलछडीचे १८ ते २० किलो, गलांड्याचेही तेवढेच; तर गुलाबाचे ५०० फुलांपर्यंत उत्पादन मिळते. क्षेत्र, हवामान व हंगामानुसार ते कमी-जास्त होत राहते.  मिळविले बांधीव दर  सुहास यांनी फुलांना वर्षभरासाठी बांधीव दर मिळविले आहेत. त्यामुळे विक्री न होणे व दर पडणे, या गोष्टींची जोखीम राहिलेली नाही.  बांधीव दर (प्रतिकिलो) 

  • गुलछडी- ६० रुपये 
  • गुलाब- १ रुपया व उन्हाळ्यात दोन रुपये. 
  • गलांडा- ३० रुपये 
  • शेवंती- ८० रुपये 
  • दुष्काळातही मजुरांना दिला रोजगार  सुहास सांगतात की, गुलाबचे दररोज चारशे ते पाचशे फुलांपर्यंत उत्पादन मिळते. त्यातून ताजे उत्पन्न हाती पडायचे. उन्हाळा तीव्र झाला की फुले कमी येतात. मात्र, निशिगंधाला हेच तापमान पथ्यावर पडते. अलिकडे दुष्काळ अत्यंत तीव्र झाला आहे. पण, फुलांना पाणी तुलनेने कमी लागते. वर्षभर उत्पादन सुरू असल्याने दोन मजुरांना दुष्काळातही कायम रोजगार देऊ शकलो, याचे समाधान आहे.  शेती केली विकसित  सुहास यांच्या वाट्याला आलेल्या अडीच एकर बागायती जमिनीपैकी दीड एकर जमीन कित्येक वर्षे पडीक होती. ती नावाला बागायती होती. झाडेझुडपे, दगड असल्याने व ती विकसित करण्यासाठी पैसे नसल्याने त्याकडे लक्षच नव्हते. फूलशेतीने हात दिल्यानंतर ती विकसित करण्यास सुरवात केली. दीड एकर शेती विकसित केली आहे. फूलशेतीमुळे किराणा दुकानात काम करण्याची गरज उरलेली नाही. अर्थकारण चांगलेच सुधारले आहे. मुलांच्या शिक्षणावर त्यांनी चांगला भर दिला आहे. दोन मुलांपैकी एक मुलगी सातवीत असून, वारकरी संस्थेत तिला शिक्षणासाठी पाठवले आहे. मुलगा तिसरीत आहे.  लावंड दांपत्य आता लवकरच साध्या घरातून पक्क्या घरात राहायला जाणार आहे. त्याचे दांपत्याला समाधान आहे.  संपर्क- सुहास लावंड- ९३०९८२७२५१ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT