डाळमिलसोबत उपस्थित महिला शेतकरी व कंपनी पदाधिकारी
डाळमिलसोबत उपस्थित महिला शेतकरी व कंपनी पदाधिकारी 
यशोगाथा

धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची दमदार वाटचाल

Gopal Hage

शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि. बुलडाणा) परिसरातील शेतकऱ्यांनी ‘संत तेजस्वी फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ स्थापन करण्यापर्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला. मालाचे मूल्यवर्धन करून धान्य, डाळींची विक्री यशस्वी केली. शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक कसे मिळतील यासाठी गाव पातळीवरच साधन सुविधा मिळवून देत कंपनीने पुढील वाटचालही दमदार ठेवली आहे. बुलडाणा जिल्हयात देऊळगावमाळी (ता. मेहकर) येथे संत तेजस्वी फार्मर प्रोड्यूसर कंपनी आकारास येऊन यशस्वी वाटचाल करते आहे. कंपनीच्या वाटचालीबाबत सांगायचे तर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुरुषोत्तम भराड सुमारे नऊ वर्षे खासगी कृषी महाविद्यालयात वीज तंत्री म्हणून नोकरीस होते. मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढे पुरेसे वेतन नव्हते. सन २०१० मध्ये नोकरी सोडली. दरम्यानच्या काळात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (अकोला) मिनी डाळमिलबाबत माहिती वाचली. अभ्यासातून व्यवसायाचे अर्थकारण आश्‍वासक वाटले. पुढचे पाऊल म्हणून देऊळगाव माळी येथे २०१७-१८ मध्ये परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्वामी विवेकानंद शेतकरी गटाची स्थापना केली. डाळमिल उद्योगाची वाटचाल सन २०१८ मध्ये डाळमिल उभारली. हंगामात त्यास थोडा उशीर झाला तरीही पहिल्याच वर्षात सुमारे सातशे क्विंटल डाळ तयार करून दिली. पुढील वर्षात तूर व हरभऱ्याची जवळपास दुपटीपर्यंत म्हणजे १४०० क्विंटल डाळनिर्मिती झाली. याच वर्षात गटातर्फे स्वच्छता व प्रतवारी केंद्र सुरु केले. त्या माध्यमातून सुमारे ३०० टन गहू, ज्वारीची प्रतवारी करून देण्यात आली. सन २०२० मध्ये गटाने १६०० क्विंटल डाळ तर पाच हजार क्विंटल गव्हाचे ग्रेडिंग केले. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ८० क्विंटल रुपये दराने स्वच्छता, प्रतवारी करून देण्यात येते. डाळीचा ७० टक्के उतारा मिळतो. वर्षभरात १२० दिवस व्यवसाय चालतो. दिवसाला सरासरी १० क्विंटल डाळ तयार होते. प्रति क्विंटल धान्यापासून डाळ तयार करण्याचा मजुरीसह खर्च साधारण १५० रुपये येतो. शेतकरी कंपनीकडे वाटचाल गटाने १८ फेब्रुवारी, २०२० मध्ये मोठे पाऊल टाकले. देऊळगावमाळी सारख्या गावात संत तेजस्वी फार्मर प्रोडयूसर कंपनी उदयास आली. सध्या पाच संचालक व पाच ‘प्रमोटर्स’ तर १५० सदस्य आहेत. कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे. सध्या परिसरातील २५ किलोमीटर परिघातील शेतकऱ्यांसाठी काम सुरु आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून प्रतवारी व वर्गवारी केंद्र उभारणीसाठी सहकार्य मिळाले. पोकरा प्रकल्पांतर्गत दिवसाला आठशे क्विंटल धान्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा केला. विकेल ते पिकेल अंतर्गत खरेदी विक्री केली जाते. विपणन साखळीचे प्रयत्न गट ते कंपनी या प्रवासात प्रक्रिया, प्रतवारी, पॅकिंगद्वारे शेतकऱ्यांच्या मालाला दोन पैसे अधिक मिळाले. आता कंपनीमार्फत पॅकिंग केलेले धान्य, डाळी विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. स्थानिक पातळीवर दुकानदारांसोबत संपर्क करीत डाळी पोचविल्या जातात. तूर, हरभरा, गव्हाची ‘शेतकरी ते ग्राहक’ अशा तत्त्वावर विक्री होते. यंदा आत्तापर्यंत एकूण २०० टनापर्यंत विक्री झाल्याचे भराड म्हणाले. भांडवल उभारणी सन २०१८ मध्ये उद्योग सुरु करताना गटातील सदस्यांनी स्वतःकडील भांडवल उभारले होते. आता कामाचे स्वरूप वाढत चालले आहे. त्यामुळे कंपनीच्या विविध कामांसाठी मेहकर येथील बँकेकडून सुमारे ३६ लाखांचे कर्ज मिळवण्यात कंपनी यशस्वी झाली आहे. आगामी उपक्रम शेतकरी कंपनी गटशेतीच्या माध्यमातून यंदाच्या हंगामापासून सोयाबीन व अन्य पिकांच्या बीजोत्पादनात उतरणार आहे. कंपनीमार्फत शेतकऱ्यांकडून थेट खरेदी विक्रीचा संकल्प आहे. धान्य साठवणूक केंद्र उभारण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण कंपनीच्या माध्यमातून गावात सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बैठका, प्रशिक्षण घेण्यात आले. सेंद्रिय- जैविक प्रकल्पाचे वरिष्ठ पदाधिकारी, तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना या शेतीचे महत्त्व पटवून दिले. शिवाय प्रात्यक्षिकही देण्यात आले. मोफत मार्गदर्शनाचा संकल्प भराड म्हणाले की आमच्या स्वयंसेवी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या काळात महिला, शेतकरी यांच्या साठी कौशल्य विकासाचे उपक्रम राबविले. यासाठी मेहकर शहरात ‘फाउंडेशन’चे बैठकीसाठी सभागृह आहे. या ठिकाणी कृषी विभागाच्या बैठका होतात. येत्या काळात आमच्या कंपनीच्या पुढाकाराने युवा शेतकरी, महिला शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगारांना स्वतः चा उद्योग व कृषी संलग्नित उद्योगाचे प्रशिक्षण देणार आहोत. लागवडीपासून थेट विक्रीपर्यंत विविध पातळ्यांवर करावयाच्‍या नियोजनाची माहितीही मोफत देण्याचा प्रयत्न आहे. मान्यवरांच्या भेटी कंपनीच्या कार्याची माहिती घेण्यासाठी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी भेट देत सविस्तर मार्गदर्शन केले. तत्कालीन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, प्रभारी सहसंचालक शंकर तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी वसंत राठोड यांच्यासह अन्य वरिष्ठांनी भेटी देऊनही कंपनीच्या सदस्यांना प्रोत्साहित केले आहे. संपर्क- पुरुषोत्तम भराड- ९८२२४२९८१३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT