विष्णू वनारे आपल्या वाहनाद्वारे डाळींची थेट विक्री करतात.
विष्णू वनारे आपल्या वाहनाद्वारे डाळींची थेट विक्री करतात.  
यशोगाथा

व्यावसायिक वृत्तीतून शेतमजूर झाला डाळमिल उद्योजक

Gopal Hage

धानोरा बुद्रूक (जि. बुलडाणा) येथील विष्णू वनारे यांची केवळ एक एकर शेती असल्याने अनेक वर्षे शेतमजुरी केली. मात्र जिद्द, ध्येय, प्रयत्न व व्यावसायिक वृत्तीतून डाळमील प्रक्रिया उद्योग सुरू केला. नियोजनबद्ध कामांमधून यश मिळवले. पुढे वाहन घेऊन डाळी व अन्य पदार्थांची थेट आठवडी बाजारात विक्री सुरू केली. त्यातून उल्लेखनीय उलाढाल केली. आज मजूर ते लघुउद्योजक अशी ओळख त्यांनी तयार केली आहे.   बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा तालुक्यातील धानोरा बुद्रूक (जंगम) येथील विष्णू शंकर वनारे यांची घरची एक एकर शेती होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठीही मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. आज त्यांचे वय सुमारे ४५ वर्षे आहे. अनेक वर्षे मजुरीचे कष्ट उपसल्यानंतर आता स्वयंपूर्ण होऊन स्वतःचा उद्योग सुरू करावा असे त्यांना वाटू लागले. पण त्यासाठी पुरेशा भांडवलाची गरज होती. शिवाय हा उद्योग शाश्‍वत व कायम मागणी असणारा हवा होता. उभारला डाळमिल उद्योग नांदुरा तालुक्यात खरिपात तूर, मूग, उडीद, रब्बीत हरभरा पेरण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे गावागावांत डाळ उद्योगाला लागणारा कच्चा माल मिळतो. डाळी हा सातत्याने वापर होणारा घटक आहे. वर्षभर लागणाऱ्या डाळी तयार करून घेण्याकडेही अलीकडे कल वाढला आहे. त्यातूनच याच व्यवसायाचा मार्ग मिळाला. सन २०१७ मध्ये या उद्योगाला सुरुवात केली. अशी केली गुंतवणूक

  • अडीच लाख रुपये किमतीची मशिनरी खरेदी केली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील मॉडेलवर आधारीत डाळमिल, पॉलीशर, ग्रेडर, एलीवेटर, शेलर असा हा संच.
  • शेतातच ४० बाय ३० फूट आकाराचे गोदाम - खर्च सुमारे साडेचार लाख रू.
  • डाळ सुकवण्यासाठी ओटा. खर्च- एक लाख रुपये.
  • वीज पुरवठा व संबंधित - १ लाख रू.
  • तत्कालीन सरकारने सुरु केलेल्या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानाचे पाठबळ मिळाले.
  • नांदुरा तालुका कृषी कार्यालयाने त्यासाठी मदत केली. या योजनेतून सव्वा लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले
  • डाळउद्योग दृष्टिक्षेपात

  • तालुक्यातील २५ ते ३० गावातील शेतकरी विष्णू यांच्या ‘साईराम’ डाळमिलमधून डाळ तयार करून घेतात.
  • यासाठी प्रति क्विंटल सहाशे रुपये शुक्ल आकारण्यात येते.
  • वर्षभराचा विचार केला तर तुरीची ३०० क्विंटल, हरभरा २००, मूग १०० तर उडिदाची १०० क्विंटल डाळ बनविण्यात येते.
  • उन्हाळी हंगामात नैसर्गिकरित्या म्हणजे सूर्यप्रकाशात डाळ सुकवण्यात येते.
  • कडधान्याच्या प्रकारानुसार प्रति क्विंटल सुमारे ७० ते ८०, ८५ टक्के डाळीचा उतारा मिळतो.
  • ग्राहकाला कोणत्यावेळी कोणत्या डाळी लागतात याचा अंदाज आल्याने तसे नियोजन करण्यात येते.
  • शिवाय शेतकऱ्यांनाही स्थानिक पातळीवर डाळ उपलब्ध झाली.
  • प्रक्रियेतून शिल्लक राहिलेली चुरी व भुसा जनावरांना उपलब्ध झाला.
  • सुरु केली विक्री व्यवस्था

  • एकीकडे आपल्या डाळमिलमध्ये इतरांसाठी डाळी तयार करतानाच विष्णू यांनी स्वतःही
  • आठवडी बाजारांमधून डाळ विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी दोन लाख रुपये खर्च करून
  • छोटे वाहनही घेतले आहे. ग्राहक आकर्षित होण्यासाठी त्यावर आपल्या डाळनिर्मितीची जाहीरातही केली आहे. शिवाय सूचना फलकांद्वारेही परिसरातील गावांमध्ये प्रचार केला.
  • आठवडाभरात खामगाव, मलकापूर, नांदुरा, बुलडाणा असे मोठ्या शहरातील तीन बाजार करण्यात येतात.
  • तूर, मूग, उडीद, हरभरा, मटकी, चवळी, त्यांचे सुमारे तीन प्रकार तसेच जोडीला ज्वारी, बाजरी,
  • गहू, हळद आदी विविध उत्पादनांचीही विक्री होते.
  • आठवड्याला सर्व मिळून ७५ हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उलाढाल होते.
  • या तीन दिवसांव्यतिरिक्त आठवड्यातले उर्वरित चार दिवस डाळमील उद्योगाकडे लक्ष दिले जाते.
  • व्यवसायातील अनुभव वाढत चालला आहे तसे विपणनाचे कौशल्य वाढू लागले आहे.
  • कोरोना लॉकडाऊनच्या काळात मात्र व्यवसायाला मोठा फटका बसला. त्यातून हळूहळू सावरण्यास सुरुवात झाल्याचे विष्णू सांगतात.
  • कुटुंबाची साथ विष्णू यांनी आपल्या उद्योगात दोन मजुरांना रोजगार दिला आहे. सोबतच पत्नी विद्या, मुलगा ऋषिकेश, सौरभ यांचीही मोठी मदत होते. विद्याताई अंगणवाडी सेविका आहेत. मात्र वेळ मिळतो त्यावेळी त्या सर्व जबाबदारी उचलतात. घरच्या एक एकरात शासकीय योजनेतून लिंबूची लागवड केली आहे. मार्गदर्शन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी या युनिटला भेटी देत तांत्रिक मार्गदर्शन केले आहे. जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्राने हे गाव दत्तक घेतले असून तेथील तज्ज्ञ नितीन तळोकार, विकास जाधव यांचे मार्गदर्शन विष्णू यांना लाभते. एकेकाळी मजुरीशिवाय पर्याय नसलेल्या विष्णू यांना प्रक्रिया उद्योगातून स्वयंपूर्ण झाल्याचे समाधान लाभले आहे. संपर्क-  विष्णू शंकर वनारे- ९७६७३९८७१४ नितीन तळोकार,८३२९९३३१५० पीकेव्ही मिनी डाळमिल झाली रोजगाराचे साधन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केलेली पीकेव्ही मिनी डालमिल अनेक शेतकऱ्यांच्या रोजगाराचे प्रमुख साधन झाले आहे. डाळमिल यंत्राचे अकोला हे माहेरघर असून विविध उद्योगांकडून ही यंत्रे विकसित केली जातात. अन्य राज्यातील उद्योजकही त्यासाठी पुढे आले आहेत. अकोला हे डाळींसाठी देखील प्रसिद्ध शहर मानले जाते. त्याचेही मोठे उद्योग तयार झाले असून डाळ प्रसिद्ध झाली आहे. पीकेव्ही डाळमिलची क्षमता तुरीसाठी प्रति दिन आठ ते १० क्विंटल आहे. मोठ्या डाळमिलमध्ये तेलाचा वापर करून उन्हात वाळवितात. या प्रक्रियेत तूर चार रोलर्समधून भरडून डाळ तयार होते. पीकेव्ही मिनी डाळमिलमध्ये मात्र तीनच वेळा रोलरमधून पाठविण्यात येते. त्यामुळे डाळीचा उतारा मोठ्या डाळमिलपेक्षा जास्त मिळू शकतो. गरजेनुसार यंत्रात सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT