दुग्ध व्यवसायातून सावरले अल्पभूधारकाने कुटुंब, चिकाटी, सुयोग्य नियोजन ठरले महत्त्वाचे 
दुग्ध व्यवसायातून सावरले अल्पभूधारकाने कुटुंब, चिकाटी, सुयोग्य नियोजन ठरले महत्त्वाचे  
यशोगाथा

दुग्ध व्यवसायातून सावरले अल्पभूधारकाने कुटुंब, चिकाटी, सुयोग्य नियोजन ठरले महत्त्वाचे 

Suryakant Netke

आठ वर्षांपूर्वी कुटुंब विभक्त झालं. त्यातून अल्प म्हणजे केवळ सव्वादोन एकर जमीन वाट्याला आली. त्यामुळे अडचणी समोर दिसत होत्या. पण गायींच्या आधारे दूध व्यवसायाची निवड केली. सुयोग्य नियोजन, सर्व कष्टांची तयारी, मुक्तसंचार पद्धतीचा गोठा, चाऱ्याची उपलब्धता, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, थेट दूध विक्री अशा विविध प्रयत्नांतून व्यवसायात स्थिरता मिळवली. कुटुंब सावरता आले. खुपटी (ता. नेवासा, जि. नगर) येथील युवा शेतकरी नामदेव बाबा ससे यांची ही यशकथा निश्‍चित प्रेरणादायी आहे.  नगर हेच जिल्हा व तालुक्याचे ठिकाण असलेल्या ससेवाडी येथून पन्नास वर्षांपूर्वी ससे कुटुंब खुपटी (ता. नेवासा) येथे रोजगारासाठी स्थलांतरित झाले. कुटुंबात तिघे भाऊ. २०११ मध्ये कुटुंब विभक्त झाले. त्यात तीन भावांपैकी नामदेव यांच्या वाट्याला सव्वादोन एकर जमीन आली. या परिवाराचा पूर्वीपासून संयुक्त दूध व्यवसाय. मात्र अल्प जमीन असल्याने त्यातून उदरनिर्वाह चांगला होणार नाही याची कल्पना आल्याने स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय नामदेव यांनी घेतला. वाटणीतून नामदेव यांच्याकडे दोन म्हशी आल्या होत्या. त्यात वाढ करत त्यांनी ही संख्या बारापर्यंत नेली.   

व्यवसायाचा विस्तार  कष्ट व सातत्याने व्यवसाय स्थिर झाला होता. पण केवळ म्हशींपासून पुरेसे दूध मिळत नसल्याने व्यवसायाचा विस्तार करण्यात मर्यादा येत असल्याचे जाणवू लागले. २०१२ मध्ये म्हशी विकून गायींच्या आधारे दूध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी होलस्टीन फ्रिजियन (एचएफ) गाय खरेदी केली. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. दुभत्या गायींच्या संख्येत वाढ होऊ लागली. आज नामदेव यांच्याकडे दहा दुभत्या गायी आहेत. दररोजचे दूध संकलन सुमारे १०० ते १२० लिटरपर्यंत होते. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असल्याने फार खर्च न करता २०१३ साली ५५ हजार रुपये खर्च करून गायींसाठी मुक्त संचार गोठा बांधला.  कामांचे नियोजन  दूध काढण्यापासून चारा आणणे, गायींची देखभाल, अन्य मजुरीचे काम नामदेव आणि त्यांच्या पत्नी  सौ. सीमा असे दोघे मिळून करतात. त्यातून मजूरबळावर मात करताना वर्षभरात किमान लाख रुपयांच्या मजुरीची बचत केली आहे. कष्ट करमी करण्याच्या हेतूने तीन वर्षांपूर्वी दूध काढण्याचे यंत्र घेतले आहे.  दर्जेदार दुधाला चांगला मागणी असून, व्यवसायात चांगली स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे. आता दहा गीर गायींच्या पालनाचेही नियोजन केले आहे. व्यवसायातील चिकाटी व प्रयत्नशील वृत्ती याद्वारे मिळालेल्या उत्पन्नातून शेतात टुमदार बंगला बांधणे त्यांना शक्य झाले आहे.  थेट विक्रीतून वाढवला नफा  नामदेव यांनी दूध व्यवसायावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले. त्यांना नेवासा हे तालुक्याचे गाव पाच किलोमीटरवर आहे. त्यामुळे उत्पादित होणाऱ्या सुमारे १२० लिटर दुधापैकी ६५ ते ७० लिटर दूध ते थेट ग्राहकांना वितरित करतात. उर्वरित दूध डेअरीला दिले जाते. डेअरीवर दुधाला २५ रुपये प्रतिलिटर दर मिळतो. तर थेट विक्री होत असलेल्या दर्जेदार दुधाला ३५ ते ४० रुपयांचा दर मिळतो. साहजिकच नफ्याचे प्रमाण वाढवले आहे.  उपलब्ध क्षेत्रावर चारा उत्पादन  दूध व्यवसायात चारा उपलब्धता ही सर्वांत महत्त्वाची बाब असते. नामदेव आपल्या उपलब्ध दोन एकर क्षेत्रावर आठ वर्षांपासून केवळ चारा उत्पादन घेत आहेत. सध्या त्यांच्याकडे एक एकरवर लसूण घास तर प्रत्येकी अर्धा एकर मका व अन्य गवत आहे. त्यामुळे भर दुष्काळातही ओल्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. वाळलेला चारा विकत घेण्यात येतो. सध्या उपलब्ध असलेल्या मक्यापासून दहा टन मुरघास करण्याचे नियोजन केले आहे.  शेणाची विक्री  ससे यांच्याकडे दरवर्षी साधारण पस्तीस ते चाळीस टन शेणखत तयार होते. अलीकडील काळात त्यांनी शेणखत न उचलता मुक्त संचार गोठ्यात ठेवले आहे. गोमूत्र त्यात मिसळले जात असल्याने शेणखताला सकसपणा येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. चाऱ्यासाठी शेणखत वापरून शिल्लक खताची विक्री ते करतात. दूध व्यवसायातील वाढलेल्या खर्चाच्या युगात हे उत्पन्न मोठे आधार ठरले आहे. चारापिकांनाही दर्जेदार खत मिळाल्याने जनावरांना सकस चारा आणि त्यातून दर्जेदार दूध उत्पादन मिळत आहे.  मार्गदर्शन घेतले  नामदेव व्यवसायाच्या निमित्ताने प्रभात डेअरीच्या संपर्कात आले. तेथील विस्तार अधिकारी सुयोग बेहळे यांनी गोठा व्यवस्थापन, जनावरांचे प्रजनन, कृत्रिम रेतन, पशुपोषण, लसीकरण आदी बाबींबाबत सातत्याने मार्गदर्शन केले. त्यानुसार नामदेव यांनी जानावरांचे आरोग्य, खाद्य याबाबत काळजी घेतल्याने आजारावंरील खर्च सुमारे ५० ते ७० टक्क्यांनी कमी केला.  संपर्क- नामदेव बाबा ससे - ९०९६०७२६२०, ८७६६४२११२८   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT