महिला बचत गटाने तयार केलेले सोयावर आधारीत पदार्थ
महिला बचत गटाने तयार केलेले सोयावर आधारीत पदार्थ  
यशोगाथा

'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून पसंती

Vinod Ingole

अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव) गावातील महिलांनी बचत गटाद्वारे एकत्र येत सोयाबीनवर आधारित विविध उत्पादनांची निर्मिती केली आहे. वैशिष्ट्यपूर्ण, स्वादयुक्त असलेल्या या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत आहे. त्याद्वारे शाश्‍वत रोजगार मिळून या महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीदेखील झाल्या आहेत.   अमरावती जिल्ह्यात धामणगाव तालुक्यातील अंजनसिंगी हे दुर्गम गाव आहे. गावातील काही महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने २००३ मध्ये एकत्र येऊन गाडगेबाबा स्वयंसाहाय्यता बचत गटाची स्थापना केली. सुरुवात चांगली झाली खरी; पण काही तांत्रिक कारणांमुळे गटाचे कार्य काही वर्षे थांबले. मात्र, महिलांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा २०१५ मध्ये गटाला चालना दिली. नव्या महिला सदस्य गटाला जोडल्या. यंदाच्या जानेवारीपासून दरमहा २०० रुपये बचत करण्यात येत आहे. वैशाली जगदीश पिल्लारे गटाच्या अध्यक्ष आहेत. एकूण बारा सदस्य सद्यःस्थितीत कार्यरत आहेत. सोयाबीनपासून वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने बचत गटाच्या महिलांनी सोयाबीनपासून पदार्थ तयार करण्याचे निश्‍चित केले. सन २०१६ मध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून व कृषी विज्ञान केंद्रातर्फे (केव्हीके) अंजनसिंगी येथे सात दिवसीय प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात पिल्लारे आणि गटातील सदस्यांनी प्रशिक्षण घेतले. पदार्थांची निर्मिती केली. सुरुवातीला अकोला येथे विक्री केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने महिलांचा उत्साह वाढीस लागला. ‘वैदर्भी’ ब्रँडने विक्री सध्या गटातील महिलांनी पिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली सोयाबीनपासून सुमारे २५ पदार्थांची निर्मिती करून पाहण्यापर्यंत मजल मारली आहे. अर्थात, सर्व पदार्थ काही एकावेळेस उपलब्ध नसतात, मागणीनुसार ते बनवले जातात. सध्या सोयाबीन आधारित इडली, ढोकळा व कॉफी या तीन मुख्य पदार्थांचे प्रयोगशाळा अहवाल तयार केले आहेत. या उत्पादनांना ‘फूड सेफ्टी’ विषयातील केंद्रीय संस्थेचे प्रमाणपत्र घेतले आहे. जिल्ह्यातील सर्व महिला बचत गटांची उत्पादने वैदर्भी ब्रॅंडने होतात. हाच ब्रॅंड गाडगेबाबा बचत गटालाही मिळाला आहे. काही वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ (सोयाआधारित) सोया कॉफी, इडली, ढोकळा, नटस, गुलाबजाम, लाडू, हलवा, शंकरपाळे, चकली, शेव, श्रीखंड व सोया पापड पुरस्काराने सन्मान पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने गटाने तयार केलेल्या स्वादिष्ट व आरोग्यदायी पदार्थांची दखल घेत त्यांना पुरस्काराने गौरवले आहे. महाराष्ट्र शासनातर्फेही जिल्हास्तरीय हिरकणी नवउद्योजक पुरस्काराने सन्मान केला आहे. पुरस्कारांची रक्कम दोन ते सव्वा दोन लाख रुपयांपर्यंत गेली आहे. या रकमेतून पॅकेजिंगसाठीच्या यंत्रांची खरेदी करण्यात आली. प्रदर्शनांमधून विक्री वर्षभर मुंबई येथे दोन, तसेच अकोला व अमरावती अशा चार ठिकाणी प्रदर्शनांमधून उत्पादनांची विक्री करण्यात येते. मुंबई येथे यंदा महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सुमारे साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न गटाने मिळवले. अन्य प्रदर्शनांमधूनही सुमारे पन्नास हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही एका विक्री केंद्रात उत्पादने ठेवण्यात आली आहेत. काही किराणा व्यावसायिकांनाही विक्रीसाठी ती देण्यात आली आहेत. डोअर टू डोअरदेखील पुरवठा सुरू केला आहे. गटाकडून कच्च्या मालाचा पुरवठा गटातील बहुतांश महिलांकडे सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. साहजिकच कच्चा माल जागेवरच उपलब्ध होतो. बाजारभावाप्रमाणे त्यासाठी रोख स्वरूपात चुकारे दिले जातात. प्रतिप्रदर्शनासाठी उत्पादने बनवण्यासाठी सरासरी चार क्‍विंटल सोयाबीनची गरज पडते. हरभरा, तांदूळ, सोया डाळ अशा घटकांचा वापर केला जातो. सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्याने ग्राहकांकडून त्यास पसंती असल्याचे गटाच्या सचिव जिजा काळे सांगतात. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबत्व उत्पादनांच्या माध्यमातून गटातील महिलांना दर महिन्याला उत्पन्न मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दर महिन्याला सुमारे ३० हजार ते ४० हजार रुपयांची उत्पादने बनविली जातात. अर्थात, तेवढी विक्रीही होत असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. आर्थिक स्वावलंबत्व मिळण्याबरोबरच शाश्‍वत स्थानिक रोजगारही तयार झाला आहे. एक किलो ढोकळा वा इडली उत्पादन तयार करण्यासाठी किमान १२० रुपये, तर सोया नटस तयार करण्यासाठी एक किलोसाठी किमान ९० रुपये खर्च होतो. सध्या सदस्य महिलांची संख्या कमी असल्याने घरगुती स्वरूपातच उत्पादन घेण्यात येते. सामाजिक जाणीव जपली कान्होजी महाराज यात्रा महोत्सव दर फेब्रुवारी महिन्यात असतो. या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी गटाच्या माध्यमातून अन्नदान करण्याची परंपरा आहे. पाच वर्षांपासून यात गटाने सातत्य राखले असून, या वर्षीचे हे सहावे वर्ष आहे. मिरवणुकीत देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यावरही गटाने भर दिला आहे. पुढील काळात शेवया आणि मसाले उद्योगात उतरण्याचा गटाचा मानस आहे. वैशाली पिल्लारे - ८८४७७४४३८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT