खरबूज, कलिंगड, झेंडू पिकातून बसवले आर्थिक नियोजन
खरबूज, कलिंगड, झेंडू पिकातून बसवले आर्थिक नियोजन 
यशोगाथा

खरबूज, कलिंगड, झेंडू पिकातून बसवले आर्थिक नियोजन

sandeep navale

बिरोबावाडी (ता.दौंड) येथील केशव बबनराव होले यांनी खरबूज, कलिंगड आणि झेंडू या पिकाच्या वार्षिक नियोजन केले आहे. वार्षिक एकूण रक्कम, दरमहा खर्चासाठी आवश्यक रक्कम उपलब्ध होईल, अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने उत्पादनाचे गणित बसवले आहे. एकूण आर्थिक नियोजनामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, कुटुंबीयांचे आरोग्य याला अधिक महत्त्व दिले आहे. पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता. दौंड) येथील केशव बबनराव होल यांची आठ एकर शेती आहे. संपूर्ण शेती बागायती असून, त्यात खरबूज, कलिंगड आणि झेंडू ही मुख्य पिके आहेत. खरबूज व कलिंगड पिकातून वर्षाला एकरकमी उत्पादन मिळते. मात्र त्यासोबतच झेंडू पिकाचे नियोजन केले जाते. उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी केशव होले प्रयत्न करतात. निश्चित वार्षिक उत्पन्नांसाठी ः बागायती शेतीमध्ये खरबूज, कलिंगड ही पिके मुख्य झाली आहेत. सध्या साडेचार एकर क्षेत्रात खरबूज केली आहे. सव्वा एकर क्षेत्रात कलकत्ता झेंडूची लागवड केली आहे. लागवडीपूर्वी हिरवळीचे खतासाठी तागाची लागवड करून, ती फुलोऱ्यात येताच गाडली जातात. त्यातून सेंद्रिय खताची पूर्तता करतो. शेणखत विकत घेऊन शेतामध्ये वापरण्याच्या तुलनेमध्ये हे स्वस्त पडते. आधुनिक तंत्रामुळे खर्च व कष्टात बचत ः

  • जानेवारीच्या दरम्यान खरबूज लागवड तर मार्च-एप्रिल मध्ये कलिंगड लागवड करतात. खरबूज, कलिंगड लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आहे. त्यात प्रामुख्याने ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर यांचा समावेश असतो.
  • ठिबक सिंचन व मल्चिंगमुळे पाण्यामध्ये बचतीसह तणनियंत्रणाचा खर्च व कष्ट वाचतात. व्यवस्थित गादीवाफे करून केलेल्या मल्चिंगवर एकामागे एक या प्रमाणे खरबूज, कलिंगड व त्यानंतर झेंडू अशी तीन पिके घेता येतात. त्यामुळे सुरवातीला अधिक वाटणारा मल्चिंगचा खर्च विभागला जाऊन कमी राहतो.
  • क्रॉप कव्हरसाठी एकरी १८ ते २० हजार रुपये अधिक खर्च होत असला तरी रोग व कीड नियंत्रणासाठीचे खर्च व कष्टही वाचतात. यामुळे १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होते. फळांचा दर्जा चांगला मिळतो. परिणामी बाजारपेठेत दर चांगला मिळतो.
  • जून-जुलै महिन्यात झेंडू लागवड केली जाते.
  • एकरी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर केला जातो.
  • हिरवळीच्या खताचा वापर ः जमिनीची सुपीकता आणि पिकांच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्बांची आवश्यकता असते. मात्र, शेणखतातून त्याची पूर्तता करणे दिवसेंदिवस महागडे होत चालले आहे. अशा वेळी दर वर्षी शेतीतील वाढता खर्च कमी करण्यासाठी पिकांच्या शिल्लक अवशेषांचा वापर केला जातो. हे अवशेष लवकर कुजण्यासाठी वेस्ट डिकंपोजरचा वापर करतात. सोबतच हिरवळीच्या खत पिकांची (ताग) लागवड केली जाते. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते. विविध ठिकाणी दिल्या जातात भेटी ः केशव होले हे उच्चशिक्षित आहेत. कृषी क्षेत्रातील अधिक माहिती घेण्यासाठी कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र यांना वारंवार भेटी दिल्या जातात. प्रशिक्षणे, चर्चासत्र, सेमिनार यांना उपस्थित राहतात. विविध कृषी प्रदर्शनांना भेटी देतात. या साऱ्या गोष्टींमुळे शेती व्यवसायाकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभत असल्याचे केशव यांचे मत आहे. वर्षातून तीन पिकांचे नियोजन ः केशव होले हे गेल्या १४ वर्षापासून एकूण आठ एकरांपैकी सात एकरामध्ये पालटून पालटून वर्षातून तीन वेळा खरबूज आणि कलिंगड पिकांची लागवड करतात. सध्या त्यांच्या शेतामध्ये साडे चार एकरावर खरबूज लागवड केली आहे. तर सव्वा एकरावर झेंडूची लागवड केलेली आहे. नियमित पिके घेत असल्याने वर्षभर व्यापाऱ्यांच्या संपर्कात राहतात. पर्यायाने उत्पादनांना चांगला दर मिळण्यास मदत होते. दरामध्ये चढउतार झाले तरी खर्च वजा जाता ३ ते साडे तीन लाख रुपये निव्वळ उत्पन्न हाती येत असल्याचा केशव यांचा अनुभव आहे. शेतीचा एकरी ताळेबंद ः

  • खरबूज उत्पादन - सरासरी २० टन, खरबुजाला १० रुपये ते ३५ इतका दर मिळतो.
  • उत्पादन खर्च - १ लाख रुपये, उत्पादन खर्च वजा जाता एकरी- १ ते १.७५ लाख रुपये.
  • कलिंगड उत्पादन - सरासरी ३० ते ३५ टन, कलिंगडास ६ रुपये ते २० इतका दर मिळतो. उत्पादन खर्च- ६० ते ७० हजार रुपये, उत्पादन खर्च वजा जाता एकरी- १ लाख रुपये.
  • झेंडू - १० टन, झेंडूच्या दरामध्ये प्रचंड चढउतार होत असतो. उत्पादन खर्च- ८० हजार रुपये, उत्पादन खर्च वजा जाता एकरी १ लाख रुपये.
  • दरवर्षीचे प्रमुख खर्च ः

  • कायमस्वरूपी सहा महिला मजूर शेतामध्ये कामाला असतात. मजुरी, खते, कीडनाशके, डिझेल इ. - ७ लाख रुपये.
  • कौटुंबिक खर्च - २ लाख रुपये.
  • कृषी शिक्षण, प्रदर्शने भेटी, प्रशिक्षणे इ. वरील खर्च - १ लाख रुपये.
  • आरोग्य खर्च - २ लाख रुपये.
  • विक्री व बाजारपेठ ः उत्पादित केलेल्या मालाची प्रतवारी करून क्रेटमध्ये विक्रीसाठी पाठवतात. एका क्रेटमध्ये वीस किलो माल बसतो. त्यामुळे विक्री करताना फारशा अडचणी येत नाहीत. मालाची पुण्यातील मार्केट यार्ड आणि मुंबईतील वाशी मार्केट येथे कलिंगड व खरबुजाची विक्री केली जाते. तर झेंडूची पुणे मार्केट यार्डमध्ये विक्री केली जाते. परिसरातील ग्राहकांसह काही व्यापारीही थेट शेतातून खरबूज आणि कलिंगडाची खरेदी करतात. खरबुजाची प्रति किलो २० ते २५ रुपये, तर टरबुजाची १० ते १५ रुपये प्रति किलोने विक्री केली जाते. वाहतूक खर्च, आडत, हमाली इ. खर्च वाचतात. साधारणपणे अडीच एकरांच्या प्लॉटमधून सुमारे दोन टनांपर्यंत माल थेट विकला जातो. आरोग्यासाठी वेगळी तरतूद ः कुटुंबात तीन व्यक्ती आहे. आरोग्याच्या दृष्टीने जागरूक राहून सर्व कुटुंबाचा आरोग्य विमा काढला आहे. त्यासाठी वार्षिक सुमारे दोन लाख रुपये खर्च होतो. यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या अचानक उद्भवणाऱ्या आजारांवरील चिंता राहत नाही. वेळीच योग्य व चांगल्या दर्जाचे उपचार मिळू शकतात. शेतकऱ्यांना मार्गदर्शन ः गेल्या अनेक वर्षापासून खरबूज, कलिंगड व झेंडू पिकांचे उत्पादन घेत असून, पिकांमधील असंख्य बारकावे ज्ञात झाले आहेत. मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. केशवरावांशी सुमारे १७०० शेतकरी जोडले गेले आहेत. त्यात महाराष्ट्रातील संख्या अधिक असून, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थान येथील अनेकजण जोडले गेले आहेत. संपर्क ः केशव बबनराव होले, ९९७५५४१२७२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT