uday mohite showing quality bean pods
uday mohite showing quality bean pods 
यशोगाथा

वर्षभरात चार हंगामांत फायदा देणारा घेवडा

विकास जाधव

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. मात्र या पिकाचा दीर्घ कालावधी व तुलनेने मिळणारे उत्पन्न लक्षात घेता शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात असतात. सातारा जिल्ह्यात शिरगाव येथील मोहिते कुटुंबाने सुमारे चार वर्षांपासून वरुण अर्थात वाघ्या घेवड्याचे पीक घेण्यात सातत्य ठेवले आहे. वर्षभर या पिकाचे चार हंगाम घेत त्यातून आर्थिक बळकटी आणली आहे. सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यातील शिरगाव हे सुमारे चार हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. गावातून तारळी नदी बारमाही वाहते. त्यामुळे ८० टक्क्यांहून अधिक क्षेत्र बागायती आहे. सातारा जिल्ह्यात आले, हळद या प्रमुख पिकांबरोबर ऊस व भाजीपाला ही पिकेदेखील अधिक प्रमाणात घेण्यात येतात. शिरगावातदेखील सर्वाधिक उसाचे पीक घेतले जाते. गावातील उदय पाडुंरग मोहिते यांच्या कुटुंबाची सुमारे चार एकर शेती आहे. बहुतांश शेती बागायती आहे. उदय आपले धाकटे बंधू शिरीष यांच्या साह्याने ती सांभाळतात. त्यांचे आशिष हे बंधू अन्य व्यवसाय करतात. शेती व पीकबदल

  • पदवीधर झाल्यानंतर उदय यांनी सातारा येथे एका कंपनीत नोकरी केली. मात्र वेतन न परवडवणारे असल्याने त्यांनी शेतीतच लक्ष घालण्याचे ठरवले. मजूरटंचाईची समस्या लक्षात घेऊन त्यांनी ट्रॅक्टर व अवजारे भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यात हळूहळू स्थिरता येऊ लागली. त्याचबरोबर ताजे उत्पन्न मिळावे यासाठी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली.  
  • भाजीपाला मुंबई बाजारपेठेत घेऊन जाण्याच्या अनुभवातून घेवडा पिकाचे अर्थकारण लक्षात आले. हा पर्याय आपण वापरून पाहावा असे उदय यांना वाटले. मग त्याची सविस्तर माहिती घेतली.
  • घेवडा पिकाची शेती

  • कोरेगाव तालुक्यात घेवडा (राजमा) हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र शक्यतो खरीप हंगामात एकदाच हे पीक घेण्याची सर्वसाधारण पद्धती आहे. मात्र केलेल्या अभ्यासानुसार मार्केटमध्ये त्यास वर्षभर मागणी राहात असल्याने ते विविध हंगामात घेणे शक्य असल्याचे उदय यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यानुसार नियोजन सुरू केले.  
  • प्रथम २०१४ मध्ये जून महिन्यात ३० गुंठे क्षेत्रात तीन फुटी सरीवर लागवड केली. त्यातून दीड टन उत्पादन मिळाले. सरासरी ३० रुपये प्रति किलो दर मिळाला. आश्‍वासक उत्पन्न मिळाल्याने पुढील प्रयोगासाठी ऊर्जा मिळाली. अन्य पिकांच्या तुलनेत कमी कालावधीत, कमी भांडवलात तसेच कमी कष्टात हे पीक फायदेशीर ठरू शकते, असे वाटले. मग क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला.
  • वर्षभराचे घेवड्याचे नियोजन

  • वर्षभर घेवडा घेण्याचे नियोजन करताना सुरुवातीला ऊस तसेच भाजीपाला पिकाचे क्षेत्र कमी कमी करत टप्प्याटप्प्याने घेवड्याच्या क्षेत्रात वाढ केली. मागील चार वर्षापासून प्रत्येकी दोन एकरांत लागवड केली जाते. वर्षभरात सुमारे चारवेळा हे पीक घेण्यात येते. उदय सांगतात की वर्षभर कोणत्याही हंगामात घेता येणे हे या पिकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. उन्हाळ्यात त्याचे उत्पादन तुलनेने कमी व हिवाळ्यात चांगले येते.  
  • हे पीक सुमारे अडीच ते तीन महिन्यात येते. वर्षातून चारवेळा घेताना जून १५ ते २० ऑगस्ट, २० ऑक्टोबर व दहा जानेवारी असे टप्पे पाडले जातात. प्रत्येक काढणीनंतर सुमारे एक महिना त्या क्षेत्राची मशागत करून विश्रांती दिली जाते. घेवड्यास पाणी जास्त झाले की खराब होण्याचा धोका असतो. यासाठी पावसाळ्यात प्लॅाटची अधिक काळजी घेतली जाते. शेतात पाणी साठू नये यासाठी शेतात चरी मारल्या जातात. गंधकाचा वापर या पिकात महत्त्वाचा ठरतो.
  • घेवडा शेतीतील ठळक बाबी

  • शेणखत, लेंडीखताचा शेतात जास्तीत जास्त वापर होतो.  
  • प्रत्येक हंगामात क्षेत्र दोन एकर असते.  
  • तीन फुटी सरीवर सहा इंच अंतरावर टोकण असते.  
  • एकरी ४० किलो बियाण्याचा वापर होतो.  
  • या पिकात विशेषतः उन्हाळ्यात मायक्रो स्प्रिंकलरचा वापर फायदेशीर ठरतो.  
  • आवश्यकता असल्यासच कीडनाशकांचा वापर होतो.  
  • एकवेळ खुरपणी करून तणांचे नियंत्रण केले जाते.  
  • स्वतःच्या शेतातील दर्जेदार बियाण्याचा वापर होतो.
  • उत्पादन व अर्थकारण

  • पुणे हे घेवड्यासाठी चांगले मार्केट आहे. पन्नास किलो वजनाचे पॅकिंग करून तेथे घेवडा पाठवला जातो. एकरी सुमारे चार टनांपर्यंत उत्पादन मिळते. किमान दर प्रति किलो ४० रुपये तर कमाल दर ७० रुपये मिळतो. उत्पादन खर्च सुमारे २५ हजार ते ३० हजार रुपये असतो. एकरी सुमारे एक लाख ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न या पिकातून मिळते. वर्षभरात तीन ते चार वेळा पीक घेता आले तरी तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न हे पीक देऊन जाते. या पिकात तार, बांबू, मांडवाचीही गरज भासत नाही.
  • पूरक व्यवसायांची जोड

  • मोहिते कुटुंबाला ट्रॅक्टर व अन्य अवजारे भाडेतत्त्वावर देण्याच्या व्यवसायातून वर्षाला दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. जोडीला शेळीपालन केले आहे. शेतात शेड बांधून लहान-मोठ्या मिळून २५ शेळ्यांचे संगोपन केले जात आहे. दुग्ध व्यवसाय व शेणखतासाठी चार म्हशींचे संगोपन होत आहे. या पूरक व्यवसायांमुळे शेतीतील भांडवली खर्च कमी होण्यास मदत झाली आहे.
  • संपर्कः उदय मोहिते, ८००७९९९३९९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT