Activities of Eklavya seff help Group
Activities of Eklavya seff help Group 
यशोगाथा

एकलव्य शेतकरी बचत गटाचे उपक्रम

राजेश कळंबटे

गोळप (ता. जि. रत्नागिरी) गावातील एकलव्य शेतकरी बचत गटाने गेल्या चार वर्षांत परिसरात वेगळी ओळख तयार केली आहे. गटाने भातशेती, भाजीपाला, हळद, नाचणी लागवडीसह कुक्कुटपालनदेखील यशस्वी केले. भात मळणी यंत्र विकत घेऊन हा गट तंत्रस्नेही झाला आहे. परंपरेप्रमाणे वाट्याला आलेल्या चार गुंठ्यांमध्ये घरासाठी पुरेल एवढी भातशेती करायची आणि जमेल तसा भाजीपाला करून गुजराण करायची, असे गोळप (ता. जि. रत्नागिरी) गावातील गोठणेवाडी, नवेदरवाडीवासीयांचे अनेक वर्षांचे ठरलेले नियोजन. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन एकत्र आणत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय दत्ताराम वारिशे यांनी घेतला. त्यांना कृषी आणि आत्मा विभागातील अधिकाऱ्यांची चांगली साथ मिळाली. गोळप गावातील दत्ताराम वारिशे हे मुंबईमध्ये पोलिस खात्यात नोकरीला होते. २०१० साली ते सेवानिवृत्त होऊन गावी आले. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी ग्रामविकासाला चालना दिली. या उपक्रमास श्रीकांत कृष्णा पैकडे यांची चांगली साथ मिळाली. यातून वाडीतील तेरा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केला. या गटाला आत्मा विभागाच्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हर्षला पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. या सर्वांनी एकत्र येत २०१५ मध्ये आत्मांतर्गत एकलव्य शेतकरी बचत गट स्थापन केला. पहिली तीन वर्षे या गटात गोठणेवाडीतील तेरा शेतकरी होते. गटाचे कामकाज पाहिल्यानंतर नवेदरवाडीतील सात शेतकरी गटात सहभागी झाले. वर्षभरात सुमारे पाच एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्यात गटाला यश आले. गांडूळखत निर्मिती

  • गटातील शेतकऱ्यांना परसबागेत भाजीपाला लागवडीचा अनुभव होता. याला सुधारित शेती तंत्राची जोड मिळू लागली. कृषी विभागाची मदत घेत शेतीसाठी आवश्यक अनुदान घेण्यासाठी गट आणि लागवड वैयक्तिक असे नियोजन शेतकऱ्यांनी केले.  
  • गटाने पहिल्यांदा गांडूळखत निर्मितीवर भर दिला. खत निर्मितीसाठी शेड उभारली. सध्या दर तीन महिन्यांनी सरासरी १५०० किलो गांडूळ खत तयार होते. हे खत नाचणी, भाजीपाला लागवडीसाठी वापरले जाते.
  • पीक लागवडीचे नियोजन

  • दहा हजार रुपयांच्या मूळ भांडवलातून गटातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवडीचे नियोजन केले. कृषी विभागातील तज्ज्ञांनी गटाला पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.  
  • चार एकर क्षेत्रामधून गटाने वालीच्या ३०० जुड्या, पालेभाजीच्या ५०० जुड्या, वांगी ८० किलो, कुळीथ ४०० किलो आणि २५०० किलो नाचणीचे उत्पादन घेतले. पहिल्या वर्षी गटातील सदस्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये नफा झाला. त्यानंतर हळूहळू यामध्ये वाढ होत गेली.  
  • भाजीपाल्यासाठी गांडूळखत तसेच गरजेनुसार सेंद्रिय कीडनाशकांचा वापर केला जातो. गटाने आत्मा विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार २०१७ मध्ये दहा गुंठे क्षेत्रावर हळद लागवड केली. निव्वळ हळद विकण्यापेक्षा त्यापासून पावडर तयार केली जाते. बाजारपेठेत अडीचशे रुपये किलो या दराने पावडरची विक्री होते.  
  • गटाने यंदा चार गुंठ्यांवर हरभरा लागवड केली आहे. गटातील सदस्य आणि कुटुंबीय एकमेकांना मदत करतात. त्यामुळे मजूर समस्येवर मात करणे शक्य झाले. गटातील सदस्यांचे लागवड क्षेत्र विखुरलेले असल्यामुळे वानर, डुकरांचा त्रास होतो. यावर मात करण्यासाठी गटातील सर्व सदस्य आळीपाळीने शेतीची राखण करतात. यासाठी प्रत्येकाने वेळ ठरवून घेतली आहे.  
  • गटातील शेतकरी भाजीपाला, हळद, नाचणीची विक्री गोळप, पावस बाजारपेठेत करतात. रत्नागिरी शहरातील काही विक्रेत्यांना भाजी पुरवठा केला जातो. नाचणीला प्रति किलो चाळीस रुपये दर मिळतो.  
  • भाजीपाला, हळद, नाचणी विक्रीतून गटाला एक लाख रुपयांचे उत्पन्न झाले. गटाचे यंदा पाचवे वर्ष असून प्रत्येक सदस्याला दरवर्षी शेतमाल विक्रीतून चाळीस हजार रुपये उत्पन्न मिळते. गोळप गावाजवळ गटाने शेतमाल विक्री केंद्र सुरू केले आहे.
  • उत्पन्नातून होते बचत

  • वर्षभरात मिळणाऱ्या उत्पन्नातील काही रक्कम गटातील सदस्य बचत करतात. या रकमेतून पुढील वर्षाला आवश्यक खर्च केला जातो. गटाने २०१५-१६ मध्ये १० हजार ८०० रुपये, २०१६-१७ मध्ये १२ हजार ३०० रुपये, २०१७-१८ मध्ये १५ हजार ९०० रुपये आणि २०१८-१९ मध्ये १४ हजार ४०० रुपये बचत केली.
  • कुक्कुटपालनाची जोड

  • दरवर्षी नवीन प्रयोग करायचा आणि त्यातून उत्पन्नाचा पर्याय तयार करायचा असे गटाचे धोरण असते.  
  • शेतीबरोबरच गटातील आठ सदस्यांनी कुक्कुटपालन सुरू केले. ऑक्टोबर, २०१९ मध्ये आत्मामधून प्रत्येकी चार हजार रुपये अनुदान मिळाले. यातून गटाने कावेरी जातीची १६० पिल्ले विकत घेतली. प्रत्येक सदस्याने वीस पिल्लांचे संगोपन केले. चांगल्या संगोपनामुळे कोंबड्या अंडी उत्पादन देऊ लागल्या आहेत.  
  • सध्या प्रत्येक सदस्याला महिन्याला २५ अंडी मिळतात. बाजारपेठेत एक अंडे दहा रुपये दराने विकले जाते. एक कोंबडी अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलो दराने विकली जाते. कुक्कुटपालनातून चांगला नफा शेतकऱ्यांना मिळत आहे.
  • यांत्रिकीकरणावर भर

  • गटातील प्रत्येक सदस्याकडे भातशेती आहे. मजूर मिळत नसल्याने भात झोडणीमध्ये अडचणी येतात. यावर मात करण्यासाठी गटाने भात मळणी यंत्र विकत घेतले. यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत अनुदान मिळाले. त्यामध्ये ९ हजार रुपये स्वहिस्सा आणि उर्वरित ४१ हजार रुपये अनुदान मिळाले.  
  • गटामार्फत हे यंत्र भाडेतत्त्वावर दिले जाते. गटातील सदस्याला दिवसासाठी २०० रुपये तर अन्य शेतकऱ्यांना पाचशे रुपये भाडे आकारले जाते.  
  • यंत्राद्वारे झोडणी करण्यासाठी तीन माणसे लागतात. भात झोडून ते वारवून पोत्यात भरून मिळते. यंत्रासाठी इंधन स्वतः शेतकऱ्याने आणायचे असते. गटाच्या बचत खात्यामध्ये यंत्र भाडे जमा केले जाते.
  • असा आहे शेतकरी गट गटातील सदस्य

  • श्रीकांत पैकडे (अध्यक्ष), संजय माजलकर, दत्ताराम वारीशे (सचिव), श्रीधर वारीशे, संतोष वारीशे, संजय आग्रे, मनीषा माजलकर, वैभव पैकडे, सुशीला पैकडे, श्रीधर पैकडे, महेश माजलकर, अक्षय पैकडे, लक्ष्मण झोरे, हरिश्‍चंद्र गोरीवले, रुपेश गार्डी, चैतन्य सुर्वे (कृषी पदवीधर), प्रवीण पेटकर, राकेश आग्रे, लक्ष्मण आग्रे, मनीष आग्रे.
  • कृषी विभागाचे मार्गदर्शन

  • आत्मांतर्गत एकलव्य शेतकरी गट स्थापन करण्यात आला. गटाला तालुका कृषी अधिकाऱ्यांसह कृषी पर्यवेक्षक माधव बापट, कृषी सहाय्यक धनाजी पौळ, मंडळ कृषी अधिकारी मनीषा जाधव आणि तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हर्षला पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. येत्या काळात गटातर्फे सुधारित भात जातींची लागवड करण्यात येणार आहे.
  • पुरस्काराने सन्मान

  • आत्मांतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट गट पुरस्कार २०१८  
  • कृषी महोत्सव २०१९ मध्ये विशेष योगदानाबद्दल सन्मान
  • संपर्कः  दत्ताराम वारिशे, (सचिव) ७०८३०७३२१९ हर्षला पाटील, ९४२२४४१५७१ (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT