custard apple box packing
custard apple box packing 
यशोगाथा

फळबागेने दिली आर्थिक स्थिरता

Santosh Munde

सुदाम देवराव शिंदे यांनी वरुडी (जि. जालना) येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये पारंपरिक पिकांऐवजी मोसंबी, सीताफळ आणि डाळिंबाची लागवड केली. जमिनीची सुपीकता जपत सुधारित तंत्राने सीताफळ, मोसंबीचे दर्जेदार उत्पादनही साध्य केले आहे. थेट विक्रीवर भर देत त्यांनी अपेक्षित दरही मिळविला आहे.

वरुडी (ता. बदनापूर, जि. जालना) येथील सुदाम देवराव शिंदे यांना सीताफळ लागवड फायदेशीर ठरली आहे. याच बरोबरीने २०१२ च्या दुष्काळात तोडलेली मोसंबीची फळबाग त्यांनी पुन्हा नव्याने उभी केली आहे. सीताफळाला अपेक्षित दर मिळविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून महामार्गालगत स्टॉल लावून थेट ग्राहकांना विक्रीचा पर्याय त्यांनी शोधला आहे.  शेती नियोजनावर भर  आठवीपर्यंत शिक्षण झालेले ५२ वर्षांचे सुदामराव गेल्या ३० वर्षांपासून शेतीत राबत आहेत. वडिलोपार्जित ९ एकर २५ गुंठे शेतीमध्ये त्यांनी अभ्यास आणि बाजारपेठ लक्षात घेऊन पीक बदल केले. शेतीत राबण्याचे ठरवल्यानंतर सुदामरावांनी वडिलोपार्जित जमिनीतील काही पडीक क्षेत्र १९८९ मध्ये लागवडीखाली आणले. हे करताना जल, मृद्‌संधारणासाठी बांधबंदिस्तीवर विशेष भर दिला.  अलीकडेच त्यांचा मुलगा स्वप्नील हा शेती नियोजनात सहभागी झाला आहे. शाश्वत सिंचनाची सोय निर्माण करण्यासोबतच सूक्ष्म सिंचनावर भर, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांशी सातत्याने संपर्कातून शेतीला आधुनिक रूप देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सुरवातीला १९९० मध्ये दीड एकर मोसंबी ठिबकवर आणणाऱ्या सुदामरावांनी टप्प्याटप्प्याने ६ एकर २० गुंठे क्षेत्र ठिबकखाली आणले आहे. सततच्या दुष्काळात पाण्याचे महत्त्व ओळखून तज्ज्ञांच्या सल्ल्याने  पिकाच्या गरजेनुसार पाणी वापरावर सुदामरावांचा भर आहे. पुन्हा उभी केली मोसंबी बाग सुदामराव यांच्याकडे पावणे दोन एकरावर न्यूसेलर मोसंबीची बाग होती. ही बाग २०१० पर्यंत चांगले उत्पादन देत होती. परंतु २०१२ च्या दुष्काळात बाग संपली. परंतु हार न मानता त्यांनी २०१६ मध्ये पुन्हा नवीन दीड एकरावर १५ बाय १५ फूट अंतराने न्यूसेलर मोसंबीची बाग लावली. ही बाग उत्पादनाच्या उंबरठ्यावर आहे. यंदा अर्धा टनांहून अधिक मोसंबी सुमारे १५ हजारात विकली असून, आता आंबे बहराचे नियोजन सुरू झाले आहे. बागेला ठिबक सिंचनही केले आहे. विश्रांती काळात मोसंबीच्या झाडांना  बोर्डोपेस्ट लावली जाते. तसेच दरवर्षी भरपूर प्रमाणात शेणखताचा वापर केला जातो. फळ उत्पादनाचे सातत्य राखण्यासाठी झाडांची चांगली जोपासना केली जाते. मोसंबी विक्रीसाठी दिल्लीवारी मोसंबीच्या पहिल्या बागेतील फळांची बागवानाला विक्री होत होती. परंतु कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकारातून विविध ठिकाणी केलेल्या अभ्यास दौऱ्यात त्यांना  मोसंबीची थेट विक्री केल्यास चांगले दर मिळू शकतात, ही बाब लक्षात आली. त्यातूनच त्यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा मित्र आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार दिल्लीमधील आझादपूर बाजारपेठेत स्वतःच्या बागेत उत्पादित मोसंबीची थेट व्यापाऱ्यांना विक्री केली.यातून त्यांना स्थानिक बाजापेठेपेक्षा दुप्पट दर मिळाला.  डाळिंबाची लागवड सीताफळ आणि मोसंबीला सुदामरावांनी डाळिंबाची जोड दिली आहे. २०१८ मध्ये ६० गुंठे क्षेत्रात आठ बाय तेरा फूट अंतरावर डाळिंबाच्या भगवा जातीच्या ५५० रोपांची लागवड केली आहे. यंदा डाळिंबाच्या मृग बहरात यश मिळाले नाही. परंतु आता पुढील काळात अंबिया बहराचे नियोजन त्यांनी केले आहे.

उभी केली सीताफळ बाग सुदामराव दुष्काळात तग धरू शकेल अशा पिकाच्या शोधात होते. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून त्यांना दुष्काळातही सीताफळ आर्थिक आधार देऊ शकते याची खात्री पटली. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी २०१३ मध्ये  सव्वा एकरावर साडेसात बाय पंधरा फूट अंतरावर सीताफळाच्या बाळानगर जातीच्या ४०० रोपांची लागवड केली. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी शेणखताचा पुरेपूर वापर ते करतात. तसेच काडीकचरा बागेतच कुजविला जातो. बागेला ठिबक सिंचन केले आहे. त्यामुळे कमी पाण्यातही बाग चांगल्याप्रकारे बहरली आहे. ही बाग गेल्या तीन वर्षांपासून उत्पादन देत आहे. यंदाच्या हंगमात त्यांना अडीच टन फळांचे उत्पादन मिळाले.

सीताफळाची थेट विक्री  दिल्लीवारी करून मोसंबीची थेट विक्री करणाऱ्या सुदामरावांनी सीताफळाचे उत्पादन सुरू झाल्यापासून औरंगाबाद -जालना महामार्गावर स्टॉल लावून थेट विक्री सुरू केली. विक्री करताना बाजारपेठ तसेच शहरात सीताफळाचे नेमके  काय दर आहेत याचा अंदाज घेऊन विक्रीचा दर निश्चित केला जातो. थेट विक्रीमुळे दरवर्षी सुदामरावांकडूनच सीताफळ खरेदी करणारे पाचशेहून अधिक ग्राहक तयार झाले आहेत. अलीकडे स्टॉल विक्री सोबतच थेट बागेत सीताफळ खरेदीसाठी ग्राहक येऊ लागले आहेत. ग्राहकांना सरासरी ५० रुपये किलो दराने विक्री केली जाते. खर्च वजा जाता यंदा सीताफळातून एक लाखांचे उत्पन्न सुदामरावांना मिळाले आहे.

घरपोच सीताफळाचा बॉक्स स्टॉल आणि बागेतून  ग्राहकांना सीताफळाची विक्री करण्यासोबतच ऑर्डर प्रमाणे बॉक्समध्ये सीताफळ पॅक करून थेट ग्राहकांना घरी पोहोच देण्याचा उपक्रम  सुदामरावांनी राबविला आहे. दोन किलो आणि चार किलोचा बॉक्स त्यांनी तयार केला आहे. दोन किलोचा बॉक्स सरासरी १०० ते १२० रुपयांना ग्राहकांना दिला जातो. सीताफळाच्या बॉक्स पॅकिंगसाठी सुदामरावांना त्यांच्या पत्नी सौ. रंजना आणि सून सौ.राजश्री यांची चांगली मदत होते.

शेती नियोजनाचे मुद्दे ः 

  • शेतीमध्ये राबतात कुटुंबातील चार सदस्य.    प्रत्येक पिकाचा खर्च आणि उत्पन्नाच्या नोंदी. 
  •  सिंचनासाठी दोन विहिरी, ठिबक सिंचनावर भर.   शासनाच्या योजनेतून सौरऊर्जा संचाचा वापर. 
  •  शेणखतासाठी दोन बैल, एका गाईचे संगोपन.    कांदा बीजोत्पादनावरही भर. 
  •  सुदामरावांच्या बागेत होते शिवारफेरी.   थेट विक्रीमुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद. 
  • दोन वर्षापासून सीताफळ रोप निर्मिती, विक्रीला सुरवात.
  • - सुदाम शिंदे, ८६६८३८३२१६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

    Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

    Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

    Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

    Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

    SCROLL FOR NEXT