खुरपे तयार झाल्यानंतर आकार देताना दिलावर शिकलगार.
खुरपे तयार झाल्यानंतर आकार देताना दिलावर शिकलगार.  
यशोगाथा

ऐरणीच्या देवा तुला, ठिणगी ठिणगी वाहू दे...

Abhijeet Dake

सांगली जिल्ह्यातील बागणी गावचा अडकित्ता सर्वत्र प्रसिद्ध आहे. जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे या गावातील शिकलगार कुटुंबीयांनी हस्तकला व तंत्र यांचा सुरेख मेळ घालून शेतीला लागणारी खुरपी, विळी, कुऱ्हाडी, अडकित्ता आदी अवजारांची निर्मिती काही पिढ्यांपासून सुरू ठेवली आहे. शेतकऱ्यांकडून येत असलेल्या मागणीनुसार दर्जेदार अवजारे तयार करण्यात या कुटुंबाने हातखंडा तयार केला आहे. ऐरणीच्या देवा तुला, ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे 'साधी माणसं' या चित्रपटातील हे अजरामर गाणं आजही लोकांच्या ओठावर रेंगाळत आहे. व्यवसाय म्हणजे केवळ पैसा नसतो. तर व्यवसाय हाच देव. त्याच्याप्रती जिव्हाळा, प्रेम, नातं यांची एक गुंफणच असते. सांगली जिल्ह्यात बागणी गावातील शिकलगार कुटुंबाने आपल्या अवजार निर्मिती व्यवसायासोबत अशीच गुंफण केली आहे. बागणी गावाची अोळखच त्यासाठी झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सांगली जिल्ह्यात वारणा नदीच्या काठावर वसलेल्या बागणी गावातील शेतकरी उसासह भाजीपाला पिकविण्यात माहीर आहेत. याच गावात शिकलगार कुटुंब राहते. या संयुक्त कुटुंबाची गावात किमान सहा घरे पाहण्यास मिळतात. हे कुटुंब शेतीनिष्ठ आहे. मात्र अल्पभूधारक असल्याने केवळ शेतीवर अवलंबून राहणे शक्य नव्हते. छोटी अवजारे बनवणे हा त्यांचा सुमारे तीन पिढ्यांपासून सुरू असलेला व्यवसाय आहे. तोच पुढे नेण्याचे काम आज या कुटुंबातील नवी पिढी करते आहे. बागणीच्या अडकित्त्यास पहिला क्रमांक पूर्वी ब्रिटिशांचं राज्य होतं. त्या काळापासून शिकलगार कुटुंब अवजार निर्मितीत गुंतलेलं आहे. सुरवातीच्या काळात केवळ अडकित्ता तयार करण्याला प्राधान्य दिलं जायचं. या अडकित्त्याला संपूर्ण राज्यातून मागणी होती. विशेष म्हणजे आजही मागणी कायम आहे. ब्रिटिशांनी सांगलीत हस्तकला प्रर्दशन भरविले होते. यात लोहार, सुतार, कुंभार यांनी तयार केलेल्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये ब्रिटिशांनी बागणीच्या अडकित्त्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले. हाच पुरस्कार बागणी गावाचा इतिहास बनला आहे. गावातील जाणती मंडळी यास दुजोरा देतात. व्यवसायाला दिली शिक्षणाची जोड शिकलगार कुटुंबातील समीर व्यवसायाबाबत सांगतात. पूर्वजांचा वारसा हा व्यवसाय आम्ही चिकाटीने सुरू ठेवला आहे. गावात आमची सहा कुटुंबे आहेत. त्यातील प्रत्येक सदस्य या व्यवसायात आहे. मात्र हे करताना आमच्या घरच्यांनी शिक्षणाच्या बाबतीत मागे ठेवले नाही. वडिलांनी दूरदृष्टी ठेऊन घरच्या व्यवसायाला लागणारे पूरक शिक्षण मुलांना कसे मिळेल हाच विचार केला. त्यादृष्टीने मी ‘आयटीआय’ शाखेतून ‘वेल्डिंग’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. बदलत्या युगामध्ये लोखंड व्यवसायातही स्थित्यंतरे झाली. त्याचा फायदा व्यवसायात झाल्याचे समीर म्हणाले. दुसरी बाब म्हणजे आजच्या तांत्रिक युगाच्या काळातही हस्तकला टिकवून धरलेले कुटुंब म्हणून शिकलगार परिवाराकडे पाहाता येते. ग्राहकांकडून कायमच पसंती दिलावर शिकलगार म्हणतात की, अडकित्ते बनविणे तसे जिकिरीचे व मेहनतीच काम आहे. एक अडकित्ता बनविण्यासाठी सुमारे पाच तास लागतात. तो बनविताना कोणतेही माप अथवा त्याचे ‘डिझाइन’ डोळ्यासमोर कधीच ठेवत नाही. अडकित्त्यासोबत खुरपे, कुऱ्हाडी अशी अवजारेही आम्ही तयार करतो. मात्र शेतीत जशी आधुनिकता येत गेली त्याचप्रमाणे आमच्या खुरपी, कुऱ्हाडी यांच्या मागणीत थोडीफार घट झाली. असे असले तरी आजही बागणीची म्हणून खुरपी, कुऱ्हाडी घेण्यासाठी अनेक भागातून लोक येथे येतात हीच आमची ‘ॲचिव्हमेंट’ आहे. मुळात खुरपे असो की अडकित्ता, त्याला पाणी देण्याची पद्धत वेगळी आहे. पाणी देणे म्हणजे लोखंड ठराविक प्रमाणात गरम केल्यानंतर पाण्यातून लगेच काढणे. यामुळे ही अवजारे मजबूत राहतात. मागणीनुसार निर्मिती खाऊचे पान खाणारे शौकीन ग्रामीण काय किंवा शहरी काय सर्वत्र आढळतात. त्याच अानुषंगाने सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांतील पान शौकिनांकडून बागणीच्या अडकित्त्यांना मोठ्या प्रमाणात आहे. सांगली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक राज्यातूनही त्याला ग्राहक आहे. पूर्वीपासून अवजार निर्मितीची कलसा जोपासलेली असल्याने अनेक ग्राहकांची नाळ हस्तकला कारागिरांशी जोडलेली आहे. कुऱ्हाड, खुरपे, अडकित्त्यासह घरात लागणाऱ्या विळीची मागणी देखील ग्राहक एका फोनद्वारे करतात. त्यानुसार वस्तू बनविल्या जातात. समीर शिकलगार म्हणतात की, कलेची किंमत नसते. त्याची कदर केली जाते. आमचेही हेच म्हणणे आहे की शासनानेदेखील आमच्यासारख्या कारागिरांकडे दुर्लक्ष करू नये. उलट अधिकाधिक प्रोत्साहनच द्यावे. आम्ही महिन्याकाठी मनुष्यबळ व मागणीनुसार २५ ते ३० पर्यंत अडकित्ते तर दिवसाकाठी १२ खुरपी तयार करू शकतो. मुळात ग्राहकाला पाहिजे अशा वस्तू तयार करून देणे हीच आमची खासीयत आहे. त्यामुळे ग्राहक आमच्यावर कधीच नाराज होत नाही.

  • अशा आहेत किमती  (रुपये व प्रति नग) (किंमती आकारानुसार)
  • खुरपे - १५० ते २५०
  • विळा- २५० ते ३०० ,३५०
  • धनगरी कुऱ्हाड -४०० ते ४५०
  • साधी कुऱ्हाड - २५० ते ३००
  • अडकित्ता- ४५० ते १२००
  •  शेतीची अन्य अवजारेही सलीम शिकलगार म्हणाले की, खुरपे, विळे, कुऱ्हाडी यांच्या व्यतिरिक्त नारळ सोलण्याचे अवजार तसेच पानमळ्यात, द्राक्षबागेत छाटणीवेळी लागणाऱ्या अवजारांची निर्मितीही करतो. शेतकरी मागणी करतात, तेवढीच निर्मिती होते. कोणत्याही व्यापाऱ्यांना माल देण्याची वेळच येत नाही. थेट ग्राहकांनाच विक्री होते. आमची विळी तर अशी आहे की तिला धार लावण्याची वेळ शक्यतो येऊच नये. अडकित्त्यांचेही विविध प्रकार बनविणे ही आमची खासीयत आहे. धार लावण्याचे साधनही आमच्याकडे आहे, असेही शिकलगार यांनी सांगितले. संपर्क- समीर शिकलगार- ९८९०५२८०१३ सलीम शिकलगार- ९९७०९६७८५५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

    Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

    Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

    Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

    Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

    SCROLL FOR NEXT