रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची जोड
रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची जोड 
यशोगाथा

कडवंची : रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची जोड

Santosh Munde

कडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ द्राक्षबागेवर अवलंबून न राहता बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन रोपवाटिका आणि शेळीपालनास सुरवात केली. या पूरक उद्योगांची जबाबदारी त्यांच्या दोन्ही सुनांकडे आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली साथ असेल तर पूरक उद्योगातूनही आर्थिक विकासाची वाट सापडते, हे क्षीरसागर कुटुंबाने दाखवून दिले आहे.

कडवंचीमधील सखाराम क्षीरसागर यांच्याकडे नऊ एकर लागवड क्षेत्र. या क्षेत्रापैकी सहा एकरांवर द्राक्षबाग. आर्थिक मिळकतीसाठी निव्वळ द्राक्षबागेवरच अवलंबून राहणे योग्य नाही, हे लक्षात घेऊन सखाराम क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी सौ. बकुळाबाई यांनी शेतीला रोपवाटिका आणि शेळीपालनाची जोड दिली. सध्या द्राक्षबाग आणि शेतीची जबाबदारी त्यांची मुले राजेश आणि रवींद्र सांभाळतात. शेळीपालन, रोपवाटिकेची जबाबदारी सूनबाई विद्या आणि रेखा यांनी घेतली आहे. मुलांनी द्राक्ष शेती विस्ताराच्याबरोबर विक्रीची सोय लावली आणि रोपवाटिका, शेळीपालन आणि बचत गटाच्या उपक्रमातून सूनबाईंनी कुटुंबाच्या अर्थकारणातील आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने उचलली आहे. सर्वांच्या सहयोगातून कुटुंबाला आर्थिक विकासाची दिशा मिळाली.

एक एकरातून सुरवात कडवंची येथील सखाराम क्षीरसागर यांना जवळपास १८ वर्षांचा द्राक्ष शेतीचा अनुभव. २००१ मध्ये वेगळे पीक म्हणून एक एकरावर लागवड केलेली द्राक्षबाग सहा एकरांवर पोचली.  दोन एकरांत खरिपात सोयाबीन लागवड आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय व्हावी म्हणून रब्बी ज्वारी लागवड असते. उर्वरित क्षेत्रात रोपवाटिका आणि शेळ्यांचा अर्धबंदिस्त गोठा आहे. शेतीला पाणीपुरवठ्यासाठी दोन विहिरी आहेत. त्याचबरोबरीने बागेला उन्हाळ्यात संरक्षित पाणी उपलब्ध होण्यासाठी दोन शेततळी खोदली. एक शेततळे अठरा लाख लिटर आणि दुसरे शेततळे अकरा लाख लिटर क्षमतेचे आहे. संपूर्ण शेतीला ठिबक सिंचनाने काटेकोर पाणी दिले जाते. बागेत पाचटाचे आच्छादन असते. एकरी सरासरी बारा ते चौदा टन द्राक्ष उत्पादनाचे सातत्य त्यांनी राखले आहे. व्यापारी शेतावरच द्राक्षाची खरेदी करीत असल्याने किफायतशीर दर मिळतो. मात्र, हे जरी खरं असले, तरी केवळ द्राक्षबागेवरच अवलंबून न राहता क्षीरसागरांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन रोपवाटिका आणि शेळीपालनास सुरवात केली.

द्राक्ष खुंट, भाजीपाल्याची रोपवाटिका गेल्या सहा वर्षांत कडवंची आणि परिसरातील दहा गावांमध्ये द्राक्ष आणि भाजीपाला लागवड वाढत आहे. हे ओळखून २०१३ मध्ये क्षीरसागरांनी द्राक्ष खुंट रोपनिर्मितीसाठी रोपवाटिका उभारली. रोपवाटिकेची जबाबदारी सूनबाई विद्या आणि रेखा यांच्याकडे आहे. रोपवाटिका व्यवस्थापनाबाबत माहिती देताना राजेश क्षीरसागर म्हणाले, की द्राक्षासोबतच भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून हंगामानुसार विविध भाजीपाला रोपांची मागणी असते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन दर्जेदार भाजीपाला रोपांच्या निर्मिती सुरू केली.  रोपवाटिकेला परिसरातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसादही मिळतो. द्राक्ष खुंटासोबत, सीताफळ, टोमॅटो, मिरची, वांगी, शेवगा, पपई, पेरू, राय जांभळाची रोपे,कलमे तयार करतो. डॉगरीज खुंट आणि सुपर सोनाका, साधी सोनाका, माणिक चमन कलमांच्या निर्मितीवर आमचा भर आहे.

शेणखतासाठी पशुपालन शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होण्यासाठी सखाराम क्षीरसागर यांनी पशुपालन केले आहे. सध्या त्यांच्याकडे १ गाई, १  म्हैस, १ गोऱ्हा, १ कालवड, १ वगार आहे. गाई, म्हशीकडून कुटुंबापुरते चार लिटर दूध मिळते. जनावरांचे शेण, मूत्रापासून शेणखत तयार केले जाते. क्षीरसागर यांच्याकडे पाच वर्षांपासून बायोगॅस असल्यामुळे शाश्वत इंधनाची सोय झाली आहे. बायोगॅसमुळे दर वर्षी चार सिलिंडरची बचत होते. बायोगॅस स्लरीचा वापर द्राक्षबागेत केला जातो. स्लरीमुळे जमिनीची सुपिकता जपली जाते. द्राक्षाची गुणवत्ताही चांगली मिळते.

शेळीपालन ठरतेय फायद्याचे     शेळीपालनाबाबत माहिती देताना सखाराम क्षीरसागर म्हणाले, की मला खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांकडून शेळीपालनाची माहिती मिळाली. या व्यवसायाचे आर्थिक गणित समजावून घेऊन २०१२ मध्ये एक उस्मानाबादी शेळी विकत घेतली, जी आजही आमच्या गोठ्यात आहे. एका शेळीपासून हा पूरक उद्योग विस्तारत ६५ शेळ्यांपर्यंत पोचला. शेळीपालनाची जबाबदारी माझ्या सूनबाई रेखा  आणि विद्या यांच्याकडे आहे. शेळीपालनामुळे आर्थिक अडचणीच्यावेळी पैसे उभे करणे शक्य होते. दर वर्षी शेळीपालनातून खर्च वजा जाता सरासरी दीड लाखांचा नफा मिळतो. तसेच, शेतीला पुरेसे लेंडीखतही उपलब्ध होते. आम्ही केवळ बोकडांची विक्री करतो. गावातील शेतकऱ्यांकडूनच  बोकडांसाठी मागणी वाढत आहे.

अशी आहे रोपवाटिका

  • १५ गुंठे क्षेत्रांवर शेडनेटची उभारणी.
  • दर वर्षी सुमारे डॉगरीज खुंट आणि द्राक्ष जातींच्या कलमांची निर्मिती.
  • सीताफळाची १० हजार, रायजांभळाच्या हजार रोपांची निर्मिती.  
  • दर वर्षी टोमॅटो दोन लाख, मिरची दीड लाख, वांगे दीड लाख, शेवगा २५ हजार आणि पपई २० हजार  रोपांची निर्मिती.
  •  डॉगरीज रोप पाच ते दहा रुपये, तर द्राक्ष कलमास जातीनुसार १०० ते १५० रुपये दर.
  •  मराठवाड्यासह विदर्भातून रोपांना चांगली मागणी.
  •  दोन्ही सुनांकडे रोपवाटिकेची जबाबदारी. महिला मजुरांना रोपवाटिकेत कायमस्वरूपी रोजगार.
  • - रवींद्र क्षीरसागर ः ९५४५४४०३८२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

    Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

    Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

    Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

    Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

    SCROLL FOR NEXT