ठिबक, खत व्यवस्थापन ठरले उत्तम कपाशीचे गमक
ठिबक, खत व्यवस्थापन ठरले उत्तम कपाशीचे गमक 
यशोगाथा

नियोजन खरिपाचे : ठिबक, खत व्यवस्थापन ठरले उत्तम कपाशीचे गमक

Vinod Ingole

शेतकरी ः विजय इंगळे चित्तलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला संपर्क ः ९६०४०५६९४४, ७९७२९३५९२७ पिकाला पाणी देण्याच्या पद्धतीत केलेला छोटासा बदल आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी घेतलेला पुढाकार हे चित्तलवाडी (ता. तेल्हारा, जि. अकोला) येथील विजय इंगळे यांच्या कापसातील उत्पादकता वाढीचे गमक ठरले आहे. कापसाची ठिबकवर लागवड करत खतांच्या उत्तम नियोजनातून त्यातून कपाशीचे सातत्यपूर्ण उत्तम उत्पादन घेत आहे. विहीर, बोअरवेलसारख्या संरक्षित स्रोतांमुळे पाण्याची उपलब्धता असलेल्या विदर्भामध्ये सिंचनासाठी पाटपाण्याची पद्धती रुढ होती. त्यात २००१ मध्ये तर कपाशीची ठिबकवर लागवड होऊ शकते; हा विचारही अनेकांना मानवणारा नव्हता. चित्तलवाडीच्या विजय इंगळे यांची संयुक्‍त कुटुंबाची ८० एकर शेती असून, संपूर्ण कपाशी लागवड करत. कापूस शेतीत त्याचे प्रयोग सुरू असत. या प्रयोगांची दखल घेत २००१ मध्ये अकोल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले, तत्कालीन तेल्हारा तालुका कृषी अधिकारी कुंवरसिंह मोहने, अशोक अग्रवाल यांनी विजय इंगळे यांना कपाशीसाठी ठिबक सिंचन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या सल्ल्यानुसार विजय इंगळे यांनी संपूर्ण ८० एकर शिवार ठिबकखाली आणले. पूर्वी पाटपाणी सिंचन पद्धतीमध्ये एकरी १० ते १२ क्‍विंटल कपाशी उत्पादन मिळत असे. ठिबक सिंचनानंतर नॉनबीटी कपाशीचे उत्पादन १७ ते १८ क्‍विंटलपर्यंत पोचले. २००२ पासून काही क्षेत्रावर बीटी कपाशीची लागवड केली. या कपाशीचे उत्पादन एकरी २२ ते २३ क्‍विंटलवर पोचले. यात ठिबकद्वारे पाणी व खत व्यवस्थापनाचा मोठा वाटा असल्याचे विजय इंगळे सांगतात. १९९७-९८ मध्ये भारतात केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेली बीटी कपाशीची पहिली चाचणी विजय इंगळे यांच्या शेतावर घेण्यात आली होती. एका एकरावर बीटी व नॉनबीटी वाणाची लागवड या चाचण्यांतर्गंत केली होती. विजय इंगळे यांची प्रयोगशीलता व तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याची पद्धतीमुळे कपाशी वाणांच्या चाचण्या घेतल्या गेल्या. असे आहे व्यवस्थापन ठिबक सिंचनाचे फायदे ः

  • जमीन वापसास्थितीत राहते. पावसाळा असल्यासारखा परिणाम साधला जात असल्याने पिकाला तो पोषक ठरतो.
  • पाण्यासोबतच विद्राव्य खते देता येतात. त्यामुळे मजूर आणि वेळेची देखील बचत होते.
  • कापूस वेचणी सुरू झाली त्या वेळी देखील पिकाला अन्नद्रव्याची गरज राहते. काही बोंड वेचली जातात तर काही बोंड परिपक्‍व होण्याच्या स्थितीत झाडावर असतात. अशा अवस्थेत अन्नद्रव्याची गरज भागविणे हे पिकाच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचे ठरते. ठिबकद्वारे विभागून अनेकवेळा अन्नद्रव्ये देणे शक्य होते.
  • वेचणी काळात खत दिल्यामुळे झाडाची पाने हिरवी राहतात. पाने हिरवी राहिल्याने प्रकाश संश्लेषणाची क्रिया सुरू राहून मालाचा दर्जा आणि वजन चांगले मिळते. झाडावरील कापूस वेचणीनंतर देखील पाने हिरवे ठेवण्याचे कसब ठिबकमुळे साधता येते.
  • खत व्यवस्थापन ः

  • पावसाळी वातावरणामध्ये मजुरांच्या साह्याने खत दिले जाते. त्यामध्ये १०ः२६ः२६ एकरी एक पोते, डीएपी आणि युरिया एकरी पोते याप्रमाणे दिले जाते.
  • कपाशीची वाढ झाल्यानंतर ठिबकद्वारे खतांचे नियोजन केले जाते. ०ः०ः५०, ०ः५२ः३४ आणि मॅग्नशिअम सल्फेट, ०ः१२ः६१ अशा ग्रेडची खते ते वापरतात.
  • पावसाळा संपल्यानंतर झाडावर कच्चा माल असल्याने झाडाला अन्नद्रव्याची अधिक गरज असते. ही गरज ओळखून खते देण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. या काळात ओलावा कमी झाल्याने खते देणे केवळ ठिबकनेच शक्‍य होत असल्याचे ते सांगतात.
  • कपाशीची अवस्था आणि त्यावरील मालधारणा लक्षात घेऊन निरीक्षणाअंती आठवडी किंवा पंधरा दिवसांनी याप्रमाणे दोन ते तीन हप्ते ते देतात. एकरी बारा ते साडेबारा किलो या प्रमाणात विद्राव्य खते या प्रमाणात मात्रा देतात. कपाशीच्या अपेक्षित उत्पादकता वाढीसाठी खत आणि पाणी नियोजन हेच घटक महत्त्वाचे ठरतात, असे ते सांगतात.
  • कीडनिरीक्षणावर राहतो भर कपाशीच्या लागवडीनंतर ४५ दिवसांपर्यंत कोणत्याही कीडरोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्यानंतर मावा, तुडतुडे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव होतो. कपाशीच्या झाडावरील शेंड्याकडील पान पालटून पाहिल्यास त्यावर सर्व किडी दिसून येतात. त्याकरिता दररोज सकाळी निरीक्षण केले पाहिजे, असे विजय इंगळे सांगतात. कीडरोगाच्या नियंत्रणाचा निर्णय निरीक्षणाअंती आणि त्यांची आर्थिक नुकसान पातळी लक्षात घेऊन करतात. बिजी-२ हा जीन नजीकच्या काळात गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक्षम उरला नाही. परिणामी, फेरोमॉन ट्रॅपच्या वापरावर त्यांनी भर दिला आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT