भाताचे कोठार असलेल्या मावळ तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिली. मात्र चांदखेड (जि. पुणे) येथील रूपाली व नितीन गायकवाड या दांपत्याने योग्य पाणी व्यवस्थापन, यांत्रिकीकरणातून भाताचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले आहे. याद्वारे श्रम आणि मजुरी यात बचत केलीच. तसेच उत्पादन खर्चही वाचवला. उत्पादित भाताला चांगली चव असल्याने ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.
चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील नितीन गायकवाड यांनी भातशेतीतील यांत्रिकीकरणावर भर दिला. यात पाॅवर टीलर, कोनोविडर, रिपर, भात झोडणी आदी अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला. जमिनीत नत्र वाढवण्यासाठी हिरवळीच्या खतांसह भातामध्ये ॲझोलाची वाढ केली जाते. चारसूत्री पद्धतीने भात लागवड, जिवामृत, स्लरीवर विशेष भर दिला. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखेत, गांडूळखत, शेणखताचा वापर वाढविला. यामुळे खतांच्या खर्चामध्ये ७० टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे. यंदा पावसाने मोठी ओढ दिली. भात पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाटाने पाणी देत ताण बसू दिला नाही. या प्रयोगाद्वारे श्रम आणि मजुरी तर वाचलीच. शिवाय उत्पादन खर्च कमी झाला. हेक्टरी १४१ क्विंटल उत्पादन घेण्यात मिळविलेल्या यशामुळे पुणे जिल्हा परिषदेने त्यांचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने नुकताच गौरवही केला आहे. सेंद्रिय खतांचा भरपूर वापर असलेल्या इंद्रायणी आणि फुले समृद्धी या भाताला चांगली चव, गुणवत्ता असल्याने घरगुती ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. गायकवाड यांच्या शेतीत यांत्रिकीकरणावर पहा... (video)
भात शेतीत यंत्रांचा वापर
अत्याधुनिक पद्धतीने भात व इतर पिकांचे उत्पादन घेताना ‘ॲग्रोवन’ नेहमीच सोबती राहिला आहे. तसेच पंचायत समितीचे अधिकारी, कृषी संशोधन केंद्राच्या डॉ. काशीद यांच्यासारख्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळते. जिल्हा परिषदेमार्फत सेंद्रिय शेतकरी म्हणून निवड केली असून, त्याबाबतचे प्रमाणपत्र घेऊन सेंद्रिय उत्पादनाचा ब्रॅंड तयार करण्याचा मानस आहे. नितीन गायकवाड, ७५८८२४९७०९
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.