buffalo shed .
buffalo shed . 
यशोगाथा

योग्य व्यवस्थापनातून वाढविला १९० म्हशींपर्यंत दुग्ध व्यवसाय

sandeep navale

गोठा, म्हशींचे संगोपन व दूध विक्री या स्तरांवर योग्य व्यवस्थापन करून वडगाव रासाई (जि. पुणे) येथील पोपट शेलार यांनी हा व्यवसाय सुस्थितीपर्यंत पोहोचविला आहे. दोन म्हशींपासून सुरुवात करून १९० म्हशी व दररोज १२०० लिटर दूध संकलनापर्यंत मजल मारून दुग्ध व्यवसायात आदर्श तयार केला आहे. शेतीतील वाढता खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ बसविणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी पूरक व्यवसायाकडे वळून उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई हे बागायती व ऊसशेतीत अग्रेसर गाव आहे. गावातील पंढरीनाथ म्हस्कू शेलार यांची प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख आहे. त्यांना पोपट आणि राहुल अशी दोन मुले आहेत. त्यांची १५ एकर बागायती शेती आहे. दोघे बंधू शेतीची जबाबदारी पाहतात. बारा वर्षांपूर्वी त्यांच्याकडे २० ते २२ गायी होत्या. दुधाला कमी दर व तुलनेत अधिक उत्पादन खर्च यामुळे व्यवसाय फायदेशीर ठेवणे जिकिरीचे ठरत होते. व्यवसायातील बारकाव्यांचा अभ्यास करून म्हैसपालन अधिक फायदेशीर ठरू शकेल या विचाराने शेलार यांनी नियोजन सुरू केले. दोन म्हशींपासून सुरुवात हवेली तालुक्यातील केसनंद येथील नातेवाईक संभाजी वाबळे यांच्याकडून दोन म्हशी घेतल्या. तालुक्यातील मांडवगण फराटा येथील मालती दूध डेअरीला २० लिटर दूधपुरवठा केला जायचा. डेअरीचे अध्यक्ष शरद पाटील यांनी व्यवसायात अधिक प्रोत्साहन दिले. त्यांच्यासोबत काम करताना विश्‍वासवृद्धी झाली. टप्प्याटप्प्याने म्हशींची खरेदी व दूधसंकलनही वाढत गेले. सध्या जवळपास अर्धा एकरात गोठा व पाच शेडस आहेत. सध्या म्हशींची संख्या तब्बल १९० पर्यंत नेली आहे. मुऱ्हा आणि जाफराबादी अशा दोन जाती आहेत. त्यांची नोंद ठेवण्यासाठी कानाला टॅग लावले आहेत. दुभत्या म्हशीची संख्या १३५ पर्यंत तर त्यांच्यापासून जन्मलेली पारड्याची संख्या ८० पर्यंत आहे. दुभत्या, कमी दुधावरील आणि भाकड असे वर्गीकरण करून विविध शेड्‍समध्ये त्या ठेवल्या आहेत. पारडी गोठ्याच्या मध्यभागी बांधली जातात. त्यामुळे दूध काढण्यासाठी सोडताना सोपे होते. वर्षभराचा विचार केल्यास प्रति दिन १२०० ते १३०० लिटरपर्यंत दूध संकलन होते. येत्या काळात पंधराशे लिटर संकलनाचे ‘टार्गेट’ ठेवले आहे. गोठा व्यवस्थापन दुग्ध व्यवसायात शेलार यांनी वेळेला अधिक महत्त्व दिले. पहाटे लवकर गोठे साफ करणे, कुट्टी, खाद्य देणे अशी कामे सुरू होतात. पहाटे चार ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत दूधकाढणी होते. त्यानंतर दूध संकलन होते. सकाळी सात ते १० वाजेपर्यंत गोठा व म्हशी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल्या जातात. मधल्या वेळेत काहीशी विश्रांती घेतल्यानंतर दुपारी अडीचनंतर उत्तरार्धातील काम सुरू होते. यात गोठा स्वच्छता, चारा, पाणी, संध्याकाळी चारनंतर दूधकाढणी अशी कामे होतात. जनावरांची संख्या पाहता दररोज सहा टन चाऱ्याची गरज लागते. १६ मजूर तैनात उत्तर प्रदेश, बिहार आणि बीड येथील सुमारे १६ मजूर तैनात केले आहेत. त्यांची राहण्याची सोय गोठ्या जवळच केली आहे. दर महिन्याला प्रति व्यक्तीला साडेचौदा हजार रुपर्यांपर्यंत पगार दिला जातो. पहाटे लवकर ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत ते विविध कामांमध्ये व्यस्त असतात. दुधाची साठवणूक दुधाची साठवणूक करण्यासाठी सुमारे २२०० लिटर क्षमतेचा कूलर घेतला आहे. त्यासाठी साडेचार लाख रुपयांचा खर्च केला आहे. दूध थंड राहण्यासाठी सोबत १५ केव्ही क्षमतेचे जनरेटरही घेतले असून, एकूण सात लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. दुपारी ११ ते १२ या वेळेत वडूज (जि. सातारा) येथील पृथ्वीराज डेअरीला टँकरद्वारे शेलार डेअरी नावाने दुधाची विक्री केली जाते. प्रति लिटर ५२ ते ५३ रुपये असा दर मिळतो. शेणखताची विक्री  एकूण मिळून महिन्याला तब्बल ३० ते ३२ ट्रेलरपर्यंत शेणखत मिळते. प्रति ट्रेलर चार हजार रुपये दराने त्याची विक्री होते. त्यापासून महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. गोठा धुतल्यानंतर शेणाचे पाणी व मूत्र सिमेंटच्या टँकमध्ये साठवले जाते. इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने ते चारा पिकांना दिले जाते. त्यामुळे चाऱ्याचा दर्जाही चांगलाच सुधारला आहे. चारा पिकांचे नियोजन एकूण १५ एकरांपैकी आठ एकरांवर गावातील शेतकऱ्यांकडून संकरित सुपर नेपिअरचे बेणे विकत घेतले व दोन वर्षांपूर्वी लागवड केली. सध्या त्याचेच उत्पादन घेण्यावर भर दिला आहे. आठ एकरांत प्रत्येक दोन ते अडीच महिन्यांनी एक कापणी केली जाते. लागणारा सर्व चारा स्वतःच्या शेतातच घेतला जातो. ऊस व वाढे विकत घेऊन कुट्टी करून ते म्हशींना दिले जाते. पोपट सांगतात, की दुग्ध व्यवसायात अनेक अडचणी आल्या. मात्र योग्य व्यवस्थापनातून आर्थिक नफा मिळत गेल्याने व्यवसाय सुस्थितीत आहे. तरुणांनी बारकावे समजून त्यात उतरावे. संपर्क ः पोपट शेलार, ८०१०८८६०६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

Agrowon Sanvad : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी

SCROLL FOR NEXT