नारळाच्या करवंटीपासून बनविलेली आकर्षक सायकल आणि सुपारीच्या पानांपासून चमचे, डिश, बाउल्स.
नारळाच्या करवंटीपासून बनविलेली आकर्षक सायकल आणि सुपारीच्या पानांपासून चमचे, डिश, बाउल्स. 
यशोगाथा

सुपारीची पाने, करवंटीपासून पर्यावरणपूरक उत्पादने

एकनाथ पवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता.वेंगुर्ला) येथील प्रथमेश नाईक यांनी सुपारीची पाने आणि नारळाची करवंटी यांच्यापासून विविध उत्पादनांची निर्मिती केली. गुणवत्तापूर्ण, कलात्मक पद्धतीने निर्मिती व पर्यावरणपूरक अशा या उत्पादनांना राज्य, परराज्यांसह अमेरिका, इंग्लंडपर्यंत बाजारपेठ मिळवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाटपरुळे-मालवण सागरी महामार्गावरील परुळे आजारवाडी येथे प्रथमेश नाईक यांचे घर व काजू, नारळ अशी शेती आहे. बीएस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर औषधी विषयातील कंपनीचे वितरक म्हणून त्यांनी काम केले. स्वतःचा व्यवसाय करून त्यात नाव मिळवावे असे त्यांना वाटायचे. केरळ, कर्नाटकात सुपारीच्या पानांपासून होणारी विविध उत्पादनांची निर्मिती व बाजारपेठ याबाबत माहिती त्यांना मिळाली. आपल्या भागातही मोठ्या प्रमाणात सुपारीच्या बागा असून, त्याची पाने वाया जातात. त्यावर प्रकिया केली, तर शेतकरी व आपला फायदा होईल असा विचार त्यांनी केला. उद्योजक होण्याचे प्रयत्न

  • सुरुवातीला शेतकऱ्यांनाच सुपारीच्या पानांवर प्रक्रिया करणारे यंत्र देऊन त्यांच्याकडून विविध उत्पादने बनवून घ्यायची व त्यांचे मार्केटिंग करायचे असा प्रथमेश यांनी प्रयत्न केला.
  • मात्र त्यात तितकेसे यश मिळाले नाही. मग ते स्वतःच उत्पादन निर्मितीत उतरले. घरालगतच्या इमारतीत प्रारंभ केला रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या प्रकारचा पहिलाच प्रयत्न होता.
  • संकटात शोधली संधी

  • सुपारीच्या पानांपासून विविध उत्पादने तयार होऊ लागली. व्यवसायात चांगला जम बसला. त्याचवेळी अजून काही नावीन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न होता. दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे संकट आले. व्यवसायावर मोठा परिणाम झाला. पर्यटक यायचे थांबले. अन्य बाजारपेठांमधून असलेली मागणीही मंदावली. परंतु प्रथमेश डगमगले नाहीत. त्यांनी संकटाकडे संधीच्या रूपाने पाहिले. नावीन्यपूर्ण काही करण्याच्या मनातील सुप्त इच्छेने पूर्तीच्या दृष्टीने पावले टाकली. नारळातील खोबरे काढल्यानंतर करवंटी फेकून दिली जाते किंवा जळणासाठी वापर होतो. त्याच करवंटीपासून वस्तू बनविण्यास सुरुवात केली.
  • अनुभव, संघर्षातून शिकताना हातून एकाहून एक सरस, शोभिवंत, कलात्मक वस्तू लॉकडाउनच्या कालावधीत आकारास येऊ लागल्या. विविध बाजारपेठांमध्ये पाठवू लागल्यानंतर ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळू लागला.
  • उद्योगाविषयी आठ एकर जमीन घेत सिद्ध ॲग्रो कंपनी उभारली. सन २०१० मध्ये सुरू झालेल्या व्यवसायात आता ११ वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. प्रति पान ६० ते ८० रुपये दराने शेतकऱ्यांकडून सुपारीच्या पानांची बांधावर खरेदी होते. नारळाच्या करवंट्या पूर्वी हॉटेल व्यावसायिक फेकून द्यायचे. त्या विकत घेण्यास सुरुवात केली. कच्चा माल डिसेंबर ते जून या काळात साठवला जातो. प्रक्रियेसाठी सुरुवातीला अडीच लाख रुपये खर्चून मनुष्यबळावर चालणारी सहा यंत्रे खरेदी केली. सन २०१५ मध्ये तीन लाख रुपये खर्चून हायड्रॉलिक यंत्रे घेतली. त्या माध्यमातून पाच प्रकारच्या उत्पादनांची एकावेळेस निर्मिती करता येते. या व्यवसायासाठी किमान भांडवल १० लाखांचे अपेक्षित आहे. बँकेचे कर्ज न घेता स्व गुंतवणुकीतून रक्कम उभारली आहे. यंत्रांसाठीच्या खोलीसाठी एक लाख रुपये व गोदामासाठीही तेवढाच खर्च आला. उत्पादने

  • सुपारीच्या पानांपासून जेवण, नाश्‍ता यासाठी विविध आकारांत डिशेस, प्लेट्स (उदा. १२ इंची जेवणाची प्लेट)
  • बाउल्स (३, ४ आदी विविध इंची स्वरूपात) व चमचे
  • नारळाच्या करवंटीपासून कॅण्डल स्टॅण्ड, पेन स्टॅण्ड, सायकल, स्कूटर, हॉटेलमध्ये विविध कामांसाठी वस्तू, शो पिसेस, सोप केस, भांडे, चहा कप, बाउल्स, सोलकढी, सूप आदींसाठी चमचे, आइस्क्रीम कप, बडीशेप, सुपारी आदी पदार्थांसाठी तबक
  • प्रत्येक नगाची वर्षाला अंदाजे दीड ते दोन लाख उत्पादन निर्मिती.
  • मासिक उलाढाल- १० लाख रुपये.
  • नफा- २५ ते ३० टक्के.
  • तीन स्थानिकांना रोजगार. संपूर्ण कुटुंबही व्यवसायात राबते.
  • आंबा, फणस, करवंद आदी कोकणी मेव्यावर प्रकिया करून उत्पादने निर्मितीचा मानस.
  • बाजारपेठ गुणवत्ता, पर्यावरण पूरक संकल्पना, सातत्य व कलात्मक पद्धती या बाबींवर लक्ष केंद्रित केले. सुरवातीला बाजारपेठेत जाऊन उत्पादनांचे महत्त्व विशद केले. सोशल मीडियाच चांगला उपयोग केला. त्यातून आज मुंबई, पुणे, धुळे, अमरावती, जळगाव, कर्नाटक, कोइमतूर, केरळ या भागात माल पाठविला जातो. परदेशात निर्यात अमेरिका, इंग्लंड या देशांमध्येही निर्यातदारांच्या माध्यमातून माल पाठवण्यात प्रथमेश यशस्वी झाले आहेत. या देशांमध्ये बाउल्स व चमचे पाठवले जातात. हॉटेल व रेझॉर्ट व्यावसायिकांकडून उत्पादनांना मागणी आहे. लग्न समारंभासह विविध कार्यक्रमांसाठीही उत्पादनांचा वापर होतो. प्रकल्पस्थळी येऊन ग्राहक थेट खरेदी करतात. ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांनी प्रकल्पाला भेट देत प्रथमेश यांचे कौतुक केले आहे. थर्माकोल, प्लॅस्टिकला पर्याय थर्माकोल आणि प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्यामुळे ते पर्यावरणाला हानिकारक आहे हे स्पष्ट झाले आहे. सुपारी आणि करवंटीपासूनच्या वस्तू त्यास सक्षम पर्याय ठरत आहेत. त्यांचे वापरानंतर विघटन होते. निर्मितीत कोणत्या रसायनांचा वापर होत नाही. संपर्क : प्रथमेश नाईक, ९४२३०५१६८७, ९४०५९७३६८६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT