Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. आज (ता. २०) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट, तर काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असतानाच मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेर पासून कोटा, गुना, सागर, रायपूर, पुरी ते कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे. तर कच्छ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

पावसाला पूरक स्थितीमुळे शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाच्या मुसळधार सरींनी हजेरी लावली. विदर्भाच्या गडचिरोलीतील सिरोंचा येथे १८७ मिलीमीटर तर रायगडमधील पेणमध्ये १८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकण, घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला. राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

आज (ता. २०) कोकणातील रत्नागिरी, पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे मुसळधार पावसाचा 'रेड' अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरेली जिल्ह्यात जोरदार पावसाचा 'ऑरेंज' अलर्ट आहे. उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे.

कमी दाब क्षेत्र जमीनीवर येणार

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ही प्रणाली ओडिशाच्या पुरी पासून ७० किलोमीटर, गोपालपूर व परादीपपासून १३० किलोमीटर आग्नेय दिशेकडे, तर आंध्र प्रदेशच्या कलिंगापट्टमनपासून २४० किलोमीटर ईशान्येकडे होती. ही प्रणाली आज पुरी जवळ जमीनीवर येणार असून, हळूहळू निवळण्याचे संकेत आहेत.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

रत्नागिरी, चंद्रपूर.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरेली.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, पालघर, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धुळे, जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, भंडारा, गोंदिया.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT