Clouds Agrowon
हवामान

Monsoon 2023 : मॉन्सून घाट उतरतोय, पण सावकाशच...

Team Agrowon

- माणिकराव खुळे

Weather News : आतापर्यंत कोकणात कोसळणारा व घाट माथ्यावरच रेंगाळलेल्या मॉन्सूनने सोमवार (ता. १७)पासून हळूहळू घाटमाथा उतरण्यास सुरुवात केल्याचे जाणवते. आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या नाशिकपासून ते सांगली, सोलापूरपर्यंतच्या पर्जन्यछायेच्या जिल्ह्यांमध्ये कमी तीव्रतेचा का होईना पण पाऊस होण्याची शक्यता वाढली. परिणामी, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. तशा पद्धतीने अरबी समुद्राकडून येणाऱ्या मॉन्सूनमुळे तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ पाऊसही या भागात हजेरी लावताना दिसलाही. मात्र या प्रदेशात पावसाचा जोर अत्यंत अपुरा असून, तो पुढे नांदेड जिल्हा वगळता उर्वरित मराठवाड्यापर्यंत पोहोचण्यास पुरेसा ठरणार नाही. त्यामुळे अपेक्षेपेक्षा हा पाऊस मध्यमच जाणवत आहे. या आठवड्यात कोकण व विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली असली, तरी खानदेश वगळता मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता मध्यमच जाणवत आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यानंतर पूर्वेकडील पायथ्यापासून अधिक पूर्वेकडे पण उत्तर दिशेकडून विचार केल्यास वेरूळचे डोंगर, बालाघाटचे डोंगर रांग, औंध व जतच्या पठारापर्यंतचा म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, खुलताबाद, गंगापूर, नगर जिल्ह्यांतील शेवगाव, पाथर्डी, आष्टी, सोलापूर जिल्ह्यांतील करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, तर पार दक्षिणेकडे सांगली जिल्ह्यातील जतपर्यंत अरबी समुद्रातील मॉन्सून शाखेचा पाऊस पडतो. त्यापुढील पूर्व मराठवाडा व पूर्व विदर्भाकडील भागात बंगालच्या उपसागरातील प्रणालीमधूनच पाऊस पडत असतो. म्हणूनच एल -निनोच्या या वर्षात वर अधोरेखित केलेल्या दुष्काळी पट्ट्यात दक्षिणोत्तर सीमेपर्यंत जूनपासूनच पाऊस कमी जाणवत आहे. मागील ‘ला-निना’ च्या ३ वर्षात मात्र याच्या उलट मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील कमी पावसाच्या दुष्काळी  प्रदेशात अन्य अधिक पाऊस पडणाऱ्या पावसाळी प्रदेशापेक्षा अधिक तीव्रतेने पाऊस पडला.

मॉन्सूनच्या आगमनानंतर साधारणपणे दोन महिन्यांनंतर (म्हणजे १ ऑगस्ट २०२३ च्या दरम्यान) जरी ‘एल-निनो’ उगम पावण्याची शक्यता असली, तरी या ‘एल-निनो’ या वर्षीच्या मॉन्सून काळातील जून व जुलै महिन्यांत पावसाचे प्रमाण पावसाळी प्रदेशात (कोकण, सह्याद्रीचा घाटमाथा, विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत) त्यामानाने चांगले जाणवले. परंतु मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील पर्जन्यछायेच्या कमी पावसाच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण एकदमच नगण्य होते. ‘ला-निना’ काळात अधिक पाऊस असतोच, पण तो दुष्काळी पट्ट्यात अधिक जाणवतो. तर ‘एल-निनो’ वर्षात पाऊस कमी असतो, पण दुष्काळी पट्ट्यात तो जवळपास नसतोच. हाही अलीकडील वर्षात ‘ला-निना’ व ‘एल-निनो’ वर्षात एक महत्त्वाचा फरक जाणवत आहे.

वातावरणीय दृष्ट्या
(i) प्रशांत महासागराहून पूर्वेकडून विषववृत्त समांतर येणारे मोसमी वारे दक्षिण गोलार्धात आफ्रिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकून विषववृत्त ओलांडताना ‘कोरिओलिस फोर्स’ परिणामामुळे उजवीकडे वळते व त्यांची दिशा ईशान्येकडे होते. म्हणजेच जून-सप्टेंबर काळात अरबी समुद्राहून भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर येताना ते नैर्ऋत्येकडून येऊन देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीवर आदळतात. म्हणूनच त्याला नैर्ऋत्य मॉन्सून म्हणतात. या वर्षी हेच वारे कमकुवत असून, त्याची ताकद कोकणातच संपून जाताना दिसत आहे, परिणामी वरील भागात पावसाचे प्रमाण खुपच कमी किंवा अजिबात पाऊस नसल्याची स्थिती आहे.

(ii) केवळ बळकट नैर्ऋत्य मॉन्सून वारे असले तरी त्याला मैदानी अधिक उंचावर कमी दाबाचे क्षेत्र खेचण्यासाठी आवश्यक असते. मध्य महाराष्ट्रातील सर्व १० व मराठवाड्यातील ५ (संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूरचा काही भाग) अशा पर्जन्यछायेच्या १९ जिल्ह्यांत खरीप हंगामात पाऊस होण्यासाठी ते आवश्यक असते. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार होऊन वायव्येकडे ओडिशा, छत्तीसगड ओलांडून महाराष्ट्रातील विदर्भातील वर्धा-नागपूर दरम्यान समुद्रसपाटीपासून ४-५ किमी. उंचीपर्यंत त्याचा प्रभाव ठेवून स्थिरावले, तरच या प्रदेशात जोरदार झडीचा पाऊस होऊ शकतो. तसे
कमी दाबाचे क्षेत्र या वर्षी अद्याप २ महिन्यांत जाणवले नाही.

(iii) ‘तिबेटियन हाय’मुळे चेन्नई शहर १५ अंश अक्षवृत्तावर केरळ- कर्नाटक राज्य दरम्यान समुद्रसपाटीपासून १० ते १२ कि.मी. उंचीवर ताशी १५० ते २०० किमी अशा पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वाहणाऱ्या अतिवेगवान वाऱ्याचा झोत असायला हवा. परंतु तो अधिक उत्तरेकडील (म्हणजे नाशिक- बुलडाणा शहर) अक्षवृत्त २० अंशादरम्यान जाणवतो. त्यामुळे देशात कोकण व पूर्वोत्तर राज्यात अधिक, तर उर्वरित देश भूभागावर कमी पाऊस होतो. परिणामी अलीकडील उत्तर भारत वगळता उर्वरित महाराष्ट्रात या वर्षी जाणवणारा कमी पाऊस त्याचाच परिणाम समजावा.

(iv) ६० दिवसांत विषववृत्तादरम्यान काहीशी जागतिक फेरी पूर्ण करणारा, परंतु ६० पैकी भारतीय महासागरात १५ दिवसांचा मॉन्सूनला टेकू देऊन मॉन्सूनच्या पावसासाठी पूरक ठरणारा ‘मॅडन ज्युलियन’ दोलन असावयास हवा. या वर्षी त्याच्या कालावधीत तो आला असला, तरी त्याची क्षमता खूपच कमी होती. परिणामी, ‘एल- निनो’च्या मॉन्सूनच्या जून-जुलै महिन्यातही जोरदार पावसाला त्याची मदत झाली नाही.

(v) ‘इंडियन ओशन डायपोल’ तटस्थच राहिला. परंतु या दोन महिन्यांत तो धन अवस्थेकडेही झुकला नाही. परिणामी, मॉन्सून तीव्रताही न वाढल्याने महाराष्ट्रातही पाऊस नाही.

या सर्व नकारात्मक वातावरणीय बदलामुळे गेल्या २ महिन्यांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता कमीच राहिली. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून असलेल्या चांगल्या पावसाच्या भाकिताचा कालावधी साधारण २९ ते ३० जुलैला संपतो. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता वाटते. पुन्हा १ ऑगस्टनंतर सुधारित अंदाज वर्तवला जाईल. परंतु मुंबईसह महाराष्ट्रातील कोकणपट्टी, सह्याद्रीचा घाटमाथा संपूर्ण हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व तेलंगण, फक्त याच ठिकाणी पावसाने धुमाकूळ घालून जुलैचा दुसरा आठवडा गाजवला. पावसाळी हंगामाचे २ महिने संपत आले असून, उर्वरित २ महिन्यांच्या पावसावर रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे.

- माणिकराव खुळे, ९४२२०५९०६२
(ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT