Monsoon 2024 Agrowon
हवामान

Monsoon 2024 : मॉन्सूनचे रंग नवे

Rain Alert : यंदा मॉन्सूनने नवे रंग दाखवले आहेत. सह्याद्रीच्या पूर्व उतारावर प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी दिसून आले आहे. तर सोलापूर, धाराशिवसह लेट खरीप आणि मुख्यतः रब्बीच्या पट्ट्यात यंदा दमदार पावसाच्या सरी कोसळल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Pune News : मॉन्सूनचा पाऊस दरवर्षी नवनवीन वैशिष्ट्ये घेऊन येत असतो. वेळेआधी आगमन, मोठ-मोठे खंड, पावसाचे असमान वितरण, कुठे पूर, तर कुठे पाण्यासाठी वणवण अशी मॉन्सूनची निरीक्षणे नवीन नाहीत. यंदा मॉन्सूनने नवे रंग दाखवले आहेत.

सह्याद्रीच्या पूर्व उतारावर प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी दिसून आले आहे. तर सोलापूर, धाराशिवसह लेट खरीप आणि मुख्यतः रब्बीच्या पट्ट्यात यंदा दमदार पावसाच्या सरी कोसळल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात पाऊस घाट उतरल्याने स्थिती काहीशी बदलली आहे.

पावसाच्या असमान वितरणामुळे आणि बेभरवशी स्वभावामुळे शेतकऱ्यांना मात्र अडचणीत आणले आहे. पावसाअभावी नाशिक, नगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील प्रमुख धरणे साधारणतः जुलै महिन्याच्या अखेरीस अनेक धरणे ओसंडून वाहू लागतात. यंदा हंगामाचे दोन महिने संपले असून, पावसाळ्याचा जवळपास निम्मा कालावधी उलटून गेला आहे.

मागील आठवड्यापूर्वी (२१ जुलैपर्यंत) कोकणासह, मध्य महाराष्ट्रात पावसाने कशीबशी सरासरी गाठली होती. तरीही अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे.
नंदुरबारसह, धुळे आणि नगर जिल्ह्यांच्या अनेक भागांत समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. या शिवाय पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत परिस्थिती चिंताजनक होती.

पुरेशा पावसाअभावी भात लागवडी रखडल्या असून, पेरणी झालेली सोयबीन पिके मोडावी लागली. पूर्व विदर्भातही पावसाचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र गेल्या आठवड्यात (२७ जुलैपर्यंत) राज्यात सर्वदूर समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने स्थिती सुधारून समाधानकारक चित्र पाहायला मिळाले. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात अद्यापही पावसात ५४ टक्क्यांची तूट असल्याचे दिसून आले आहे.

या उलट मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्याने लेट खरीप आणि रब्बी पिकांचे क्षेत्र अधिक असलेल्या सोलापूर, धाराशिव जिल्ह्यांसह लगतच्या भागात मात्र पावसाचे प्रमाण यंदा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा १ जून २७ जुलै या काळात धाराशिव जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक तब्बल ८२ टक्के अधिक, तर लातूर जिल्ह्यात ८१ टक्के, सांगली जिल्ह्यात ८० टक्के अधिक आणि सोलापूर जिल्ह्यात ६७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. या भागात अधिक पावसामुळे पेरणी झालेली पिके हातची जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

कमकुवत मॉन्सून हेच कारण

मॉन्सून हंगामातील पावसाच्या वितरणाची कारणमीमांसा करताना हवामान विभागातील निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, की धाराशिव, सोलापूरच्या जोडीला लातूर, परभणी, सांगली, कोल्हापूर, जळगाव असे काही जिल्हे आहेत, की काहीसा कमी तरी, पण बऱ्यापैकी पाऊस आहे. मात्र नाशिक, धुळे, नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांत पाऊस कमी आहे.

हवामान शास्त्राच्या ज्ञान-आधारित कसोटीवर विचार केला, तर सर्व अचंबितच करणाऱ्या गोष्टी वाटतात. विशेषतः सर्व प्रणाल्या पाहता हे वातावरण हे १०० टक्के पावसाचे आहे, तर पाऊस मात्र १० टक्केच होत आहे. थोडक्यात, सर्व प्रणाल्या असूनही पाऊस नाही. आणि जो आहे, तो अनपेक्षित आहे. एप्रिल, मे, सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यासारखा उष्णता संवहनी प्रक्रियेतील पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे.

ही अवस्था मॉन्सूनच्या कमकुवतपणामुळे असून, विशेषतः वर्षाच्छायेच्या जिल्ह्यातच हा प्रकार अधिक घडत आहे. मॉन्सून घाट सोडून खाली येण्यास तयार नाही. हेच पाऊस कमी असल्याचे एकमेव कारण आहे. सोलापूर आणि धाराशिवसह इतर जिल्ह्यांच्या स्थानिक भौगोलिक रचनेतून व त्यांना पूरक असे २०२४ च्या वर्षातील मॉन्सूनचे वर्तन दिसून येत आहे.

ज्या कालावधीत या भागात पाऊस झाला, त्या वेळी या जिल्ह्यांच्या लगत असलेल्या उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्ये अतिजोरदार पावसाच्या प्रणाल्या होत्या. त्या प्रणाल्यांच्या प्रेरित परिणामातून त्या विशिष्ट जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत समाधानकारक नव्हे, पण ठीक असा पाऊस झाला असल्याचे श्री. खुळे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याचा बार्शी, वैराग ते तुळजापूर हा साधारण २५ किलोमीटरचा पट्टा आहे. धाराशिव जिल्ह्याला चिकटून असलेल्या या पट्ट्यात खूप पाऊस पडलाय. वैराग अन् काटी या दोन मंडलांत, तर वार्षिक सरासरी एवढा पाऊस पडलाय. विहिरी वाहत आहेत, रानं उफाळली आहेत. पावसाचा प्रकारही जरा वेगळाच वाटतोय. अचानक लहान थेंबाचे रूपांतर मोठ्या धारेत होते अन् अर्ध्या एक तासात पाणीच पाणी होते. कमालीचा पर्जन्यछायेचा असणारा हा भाग एवढा पाऊस सहन करत नाही. या भागातील ९० टक्के कांदा रोपवाटिका, पेर कांदा, उडीद, मूग आणि तूर या पिकांचे नुकसान आहे. सोयबीन पिकालाही फटका बसेल.
बाळासाहेब गवळी, धामणगाव (दुमाला), बार्शी, जि. सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

SCROLL FOR NEXT