Latest Monsoon Update  Agrowon
हवामान

Monsoon 2025 : ...अशी असेल मॉन्सूनची वाटचाल

Monsoon Latest Update : मॉन्सूनचा उगम दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रशांत महासागरात म्हणजे दक्षिण अमेरिकेतील विषुववृत्ताजवळील पेरू, कोलंबिया, ईक्वेडोर देशांपासून होतो.

Team Agrowon

माणिकराव खुळे

साधारण मे महिन्याच्या मध्यापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे वेध सुरू होतात आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत हंगामाची सांगता होते. एकूण १६० ते १६५ दिवसांचा हा खरीप हंगाम पूर्णपणे जागतिक पातळीवरील वातावरणीय घडामोडीतून देशात येणाऱ्या आणि १२० दिवस पडणाऱ्या मोसमी पावसावर अवलंबून असतो. हवामान शास्त्रानुसार जागतिक पातळीवर या पावसाला ‘इंडियन समर मॉन्सून’ म्हणून संबोधले जाते.

या मॉन्सूनचा उगम दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रशांत महासागरात म्हणजे दक्षिण अमेरिकेतील विषुववृत्ताजवळील पेरू, कोलंबिया, इक्वेडोर देशांपासून होतो. जेव्हा उगम होतो, तेव्हा समुद्रावरून मॉन्सून वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुववृत्त समांतर भारत महासागरीय क्षेत्राकडे वाहण्यास सुरवात होते.

हा मॉन्सून मजल दरमजल करत विषुववृत्त तसेच हवेच्या कमी दाबाचा पट्टा म्हणजे आंतरकटिबंधीय एकत्रीकरण अभिसरणीय क्षेत्राच्या (आयटीसीझेड) समांतर पूर्वेकडून पश्चिमेकडे एकोणीस हजार किलोमीटर प्रशांत महासागरीय समुद्री अंतर कापत प्रवास करत येतो.

प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या मध्यानंतर भारत महासागरीय परिक्षेत्रात म्हणजे प्रथम बंगालच्या उपसागरात आणि नंतर हिंद महासागरातून तो अरबी समुद्रात प्रवेश करतो आणि दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील म्हणजे केनिया, सोमालिया देशांजवळ पोहोचतो. येथे मॉन्सून वारे वळण घेतात.

मॉन्सूनच्या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धातील मादागास्कर बेटादरम्यान उच्च हवेचा दाब, आयटीसीझेड (आंतर कटिबंधीय एकवटणारे परिक्षेत्र) आणि ‘कोरिओलीस फोर्स’ या तिघांच्या एकत्रित परिणामातून, पूर्वेकडून आलेले आणि दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर आदळलेले मॉन्सूनचे वारे तेथील पर्वतीय क्षेत्राच्या अडथळ्यामुळे पुढे दक्षिण आफ्रिकेच्या आंतरभागात तसेच पुढे पश्चिमेकडे न जाता दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरच सोमालिया देशादरम्यान वळण घेऊन नैॡत्य दिशेकडे वळण घेतात.

त्यांची दिशा नैॡत्येकडून ईशान्येकडे म्हणजे अंदाजे सोमलिया देशाकडून केरळ राज्याकडे बदलते. अरबी समुद्रातून भारत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर ज्या वेळेस हे नैॡत्य वारे प्रथम केरळाच्या किनारपट्टीवर आदळतात, तेव्हा आपण म्हणतो की, नैॡत्य मॉन्सून भारतात आला, असे काही कसोट्यांद्वारे घोषित करतो. या वर्षी तो २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. मॉन्सूनच्या वाटचालीत ‘कोरिओलीस फोर्स’ चा संदर्भ आला आहे. हा मॉन्सूनच्या वाऱ्यांना वळण देतो.

‘कोरिओलीस फोर्स ’चा परिणाम

प्रशांत महासागरीय मॉन्सूनचे वारे जेव्हा उत्तर गोलार्धात विषुववृत्तादरम्यान पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतात, तेव्हा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या परिभ्रमणामुळे, विषुववृत्तापासून ते उजवीकडे म्हणजे नैॡत्येकडे वळतात. तेच वारे दक्षिण गोलार्धात मात्र विषुववृत्तापासून डावीकडे म्हणजे आग्नेयकडे वळतात.

या कारणामुळे वाऱ्यांची दिशा विचलित होते, यालाच ‘कोरिओलिस फोर्स’ म्हणतात. हा शोध फ्रेंच गणिती तज्ञ गॅस्पर्ड गुस्तावे-डी- कोरिओलीस (१७९२ ते १८४३) यांनी लावला. त्यांनी मुळात पारंपरिक गतिमान तंत्र व्युत्पत्तीतून निर्देशांक रूपांतराची बाब शोधून काढली. यास फेरेलचा विचलनाचा नियम म्हणतात. म्हणून उत्तर गोलार्धात वाऱ्यांना नैॡत्येकडे वळण घ्यावे लागते.

मॉन्सून आला म्हणजे नेमके काय होते?

सोमालिया देशाजवळील पर्वतीय क्षेत्राच्या अडथळ्यामुळे तसेच आयटीसीझेड आणि पृथ्वीच्या भ्रमणातून तयार होणाऱ्या ‘कोरिओलीस फोर्स’मुळे

मॉन्सूनची दिशा नैॡत्येकडून ईशान्येकडे म्हणजे अंदाजे सोमलिया देशाकडून केरळ राज्याकडे बदलते. याचा अर्थ अशा पद्धतीने मॉन्सून प्रचंड बाष्प घेऊन येणाऱ्या

जोरदार वाऱ्यांचा प्रवाह, वातावरणीय प्रणालीद्वारे खाली वर होत पुढे सरकत भारताकडे येण्याचा त्याचा रस्ता मोकळा होतो.

मॉन्सून वाऱ्यांचा रस्ता मोकळा होणे म्हणजेच मॉन्सून आपल्यापर्यंत पोहोचणे होय. आपल्याकडे हे बाष्पयुक्त वारे ४ ते ५ महिने एका दिशेने म्हणजे नैॡत्येकडून ईशान्यकडे वाहत असतात. त्यांची ही एक दिशा मॉन्सून परत फिरेपर्यंत म्हणजे ऑक्टोबर अखेरपर्यंत टिकून राहते.

मॉन्सूनच्या बाष्पयुक्त वाऱ्यात, पावसासाठी जबरदस्त ऊर्जा असेल किंवा दमदारपणा असेल, तरच मॉन्सूनचा व्यापक स्वरूपात कधी कधी झडीचा पाऊस होतो, अन्यथा नाही. अर्थात ही बाष्प ऊर्जा पावसाळी हंगामात कमी सुद्धा होते किंवा अधिक वेगात भरली जाते.

ऊर्जा कमी झाली तर पुन्हा फक्त मॉन्सूनमुळे हे

बाष्पयुक्त वारे ही ऊर्जा पुन्हा भरू शकतात. म्हणून त्यासाठी मॉन्सून वारे तुमच्या गावापर्यंत पोहोचणे गरजेचे असते.

कधी असे होते, की मॉन्सून आला किंवा येऊन पुढे गेला तरी पाऊस पडत नाही. मग शेतकरी गोंधळतात. त्यांना वाटते हा काय प्रकार आहे? आला म्हणतात अन् येथे तर चक्क उन्ह पडले आहे. त्याचे उत्तर या ऊर्जेत आहे. म्हणून मॉन्सून ज्या ठिकाणी पोहोचला म्हणजे त्या ठिकाणी पाऊस झालाच पाहिजे, असेही नाही.

मॉन्सूनची ओळख

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत, नैॡत्य दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यामुळेच हा पावसाचा हंगाम टिकून राहतो, म्हणूनच त्याला इंग्रजीत ‘‘साऊथ-वेस्ट मॉन्सून’’ आणि मराठीत नैॡत्य मॉन्सून म्हणूनही ओळखले जाते. आपण महाराष्ट्रातील शेतकरी ऋतूनुसार केवळ पावसाळा या नावानेच नैॡत्य मॉन्सूनला ओळखतो.

खरीप हंगामाचा अंदाज

खरीप हंगाम चांगला जाण्यासाठी जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होणे अपेक्षित असते. महाराष्ट्रात पावसाळी हंगामातील जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील क्षेत्रफळभारित सरासरी पाऊस हा साधारण अंदाजे १०० सेंमीच्या आसपास असतो. महाराष्ट्राचा विचार केला तर जेव्हा जून ते सप्टेंबर चार महिन्यांत सरासरी इतका पाऊस झाला म्हणजे तो ९६ ते १०४ टक्के इतका पाऊस झाला, असे हवामानशास्त्रीय भाषेत समजतात.

भारतीय हवामान खात्याच्या दीर्घ पल्ल्याच्या अंदाजानुसार या वर्षी जून ते सप्टेंबर २०२५ वर्षात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे सरासरीच्या १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. म्हणजे दरवर्षीचा साधारण १०० सेंमीच्या आसपास जो पाऊस जून ते सप्टेंबर चार महिन्यात एकत्रित पडणार आहे, त्यापेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. म्हणजेच या वर्षीचा खरीप हंगाम हा चांगलाच जाणार आहे.

चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे ऊस, मका, सोयाबीन, कडधान्ये, बाजरी, भुईमूग, तूर, कपाशी भाजीपाला ही पिके सुस्थितीत राहण्याची शक्यता आहे. यासाठी चार महिन्यात पावसाचे वितरण मात्र समसमान होणे गरजेचे आहे.

जून महिन्यात महाराष्ट्रात सरासरी इतकाच म्हणजे १५ ते २० सेंमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे चांगल्या मॉन्सूनच्या ओलीवर पेरणी होणे आवश्यक आहे. सध्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात मॉन्सूनने ओढ दिली आहे.

पावसाची शक्यता

येत्या सोमवारपर्यंत(ता. १६) पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यातही शनिवार (ता.१४) ते सोमवार (ता.१६) या तीन दिवसात मुंबईसह संपूर्ण कोकण, खानदेश, मराठवाडा तसेच नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील ११ जिल्ह्यांत सध्या मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

आतापर्यंत काही शेतकरी धूळ पेरणीचा विचारात होते. परंतु मॉन्सून सक्रिय झाल्यावर, म्हणजे रविवार (ता.१५) नंतर चांगल्या मॉन्सूनच्या पावसानंतर येणारी उत्तम ओल आणि वाफसा यासह शेतातील परिस्थितीचा विचार करून पेरणीचा निर्णय घ्यावा. ज्यांच्याकडे पूर्वमोसमी पावसामुळे शेतात चांगली ओल झाली आणि सिंचनाची चांगली व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर, आपल्या जमिनीचा पोत जाणून पेरणीचा निर्णय घ्यावा.

ज्यांनी मे महिन्यात झालेल्या पूर्व मोसमी पावसाच्या ओलीवर गेल्या १० दिवसांपूर्वी पेरण्या केल्या असतील अशा शेतकऱ्यांनी आता येणाऱ्या पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर घाबरू नये. कारण मॉन्सून सक्रियतेच्या शक्यतेनुसार त्या आगाप पेरीसुद्धा मार्गी लागू शकतात.

गेल्या पंधरा दिवसांपासून पुणे, मुंबईत पोहोचलेला मॉन्सून जागेवर थांबलेला आहे. त्यात प्रगती नाही. खानदेश, नाशिक आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अजून मॉन्सून पोहोचलेला नाही. मात्र त्यानंतर म्हणजे कालपासून मॉन्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मृग नक्षत्राच्या काळात चांगला पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- माणिकराव खुळे,

९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

(ज्येष्ठ सेवानिवृत्त हवामान शास्रज्ञ,

भारतीय हवामान खाते, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Corridor Maharashtra : ‘टायगर कॉरिडॉर’च्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

Crop Loan : पीककर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट

Jat Water Storage : जतमध्ये पाणीसाठ्यात १६ टक्क्यांनी वाढ

AI In Sugarcane : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी ‘केडीसीसी’कडे अर्ज करा

SCROLL FOR NEXT