उन्हाळी भुईमुगाची शास्त्रीय लागवड पद्धत
उन्हाळी भुईमुगाची शास्त्रीय लागवड पद्धत 
तेलबिया पिके

उन्हाळी भुईमुगाची शास्त्रीय लागवड पद्धत

जितेंद्र दुर्गे, सविता कणसे

खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात जास्त उत्पादन मिळू शकते. मात्र त्यासाठी योग्य वेळी पेरणीसोबत अन्य व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने करणे आवश्यक आहे. हवामान ः उन्हाळी हंगामात भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत करावी. पेरणीवेळी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे याकडे लक्ष द्यावे. फुलोरा अवस्थेत या पिकाला दिवसाचे तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस लागते, अन्यथा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. अति उशिरा पेरणी केल्यास फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते. जमीन ः भुईमूग पिकासाठी मध्यम प्रकारचा भुसभुशीत, चुना (म्हणजेच कॅल्शिअम) व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य.

  • जमीन तयार करताना नांगरणीची खोली फक्त १२ ते १५ सेंमी एवढीच राखावी. जास्त खोल नांगरणीमुळे जमिनीत शेंगा खोल पोसतात. काढणीवेळी झाडे उपटताना अथवा वखराद्वारे काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राहून उत्पादनात घट येते.
  • नांगरणी पश्‍चात उभी - आडवी वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी अथवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत २ टन प्रति एकर द्यावे.
  • भुईमुगाच्या वाण व दाण्याच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण राखावे.
  • मध्यमपेक्षा कमी आकाराच्या बियाणांसाठी - एकरी ४० किलो प्रति एकर,
  • मध्यम आकाराच्या बियाण्यासाठी - ५० किलो बियाणे प्रति एकर,
  • टपोऱ्या दाण्याच्या वाणासाठी - ६० किलो बियाणे प्रति एकर.
  • वाण निवड ः

  • भुईमूग उत्पादकांनी वाणाची निवड करताना परिसरात उपलब्ध वाण, वाणाची उत्पादकता (क्विंटल प्रति एकर), वाणाची उन्हाळी हंगामात वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता यांचा विचार करूनच लागवडीसाठी निवड करावी.
  • भुईमूग पिकाचे पसऱ्या (स्प्रेडिंग), निमपसऱ्या (सेमी स्प्रेडिंग) तसेच उपट्या (ईरेक्ट - बंची) असे तीन प्रकारचे वाण लागवडीखाली आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने उपट्या वाणांची लागवडीसाठी शिफारस आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एसबी - ११, टीएजी- २४, फुले उन्नती, टीजी-२६, जेएल -२४ (फुले प्रगती) या वाणांची शिफारस आहे.
  • टीपीजी -४१ या मोठ्या दाण्याच्या वाणाची शिफारस पश्‍चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांसाठी.
  • जे एल -२२० (फुले व्यास) या मोठ्या दाण्याच्या वाणाची शिफारस जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांसाठी.
  • जेएल-५०१ हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी शिफारशीत.
  • जेएल -७७६ (फुले भारती) हे वाण उत्तर महाराष्ट्रासाठी शिफारशीत.
  • बीजप्रक्रिया ः पेरलेल्या बियाणे व रोपावस्थेत प्रादुर्भाव होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया आवश्यक असते. पेरणीपूर्वी साधारणत: अर्धा तास आधी भुईमुगाच्या बियाण्याला थायरम ५ ग्रॅम अथवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम अथवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोड्रर्मा कल्चर (भुकटी) ४-५ ग्रॅम अथवा ट्रायकोडर्मा द्रवरूप कल्चर ३-५ मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणे लावावे. थोड्या अवधीसाठी बियाणे सावलीत वाळवून मग पेरणीसाठी वापरावे. या व्यतिरिक्त भुईमुगाचे रायझोबिअम कल्चर (द्रव) ५ मि.लि. अथवा (भुकटी) २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे, पीएसबी कल्चर (द्रव) ५ मि.लि. अथवा (भुकटी) २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि केएसबी (द्रव) ५ मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पेरणीचे अंतर ः पेरणी पद्धत, वाणाच्या वाढीचा प्रकार, वाणाचा कालावधी, बियाण्याचा आकार यांसारख्या बाबी विचारात घेऊनच पेरणीचे अंतर राखावे. शिफारशीत दिल्याप्रमाणे उन्हाळी भुईमूग पिकासाठी ३० सेंमी × १० सेंमी, ३० सेंमी × १५ सेंमी, ४५ सेंमी × १० सेंमी, यानुसार दोन ओळींतील तसेच दोन झाडांतील अंतर राखता येते. पेरणीची खोली साधारणत: ५-६ सेंमी एवढी राखावी ओलित व्यवस्थापन ः

  • वाणपरत्वे भुईमुगाचा कालावधी ९० ते ९५ दिवसांपासून ११० ते ११५ दिवस या दरम्यान असतो. उन्हाळी भुईमुगासाठी तुषार सिंचन फायद्याचे ठरते. पेरणीपूर्वीचे ओलित देऊन जमीन भिजवून घ्यावी. वाफसा आल्यावर अथवा जमिनीचा वरचा पापुद्रा सुकल्यावर लगेच पेरणी करावी.
  • पेरणीनंतर ४-५ दिवसांनी पाणी द्यावे अथवा उगवण झाल्यानंतर लगेचच पुन्हा ओलित द्यावे.
  • यानंतर पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा. मात्र जमिनीला भेगा पडू देऊ नयेत.
  • फुले येण्याची अवस्था (पेरणीपासून २२ -३० दिवस), येथून ठरावीक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून ४०- ४५ दिवस), शेंगा पोसण्याची अवस्था(पेरणीपासून ६५-७० दिवस) या वेळी पाण्याची पाळी चुकवू नये.
  • उन्हाळी भुईमुगाला जमिनीचा प्रकार, मगदूर, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण यानुसार वेगवेगळ्या पाण्याच्या पाळ्या लागू शकतात.
  • -एप्रिल मे महिन्यात गव्हाचा गव्हांडा व गव्हाचे बारीक काड पिकाच्या ओळीमधील जागेमध्ये पातळ थरात पसरल्यास पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवता येते.
  • भुईमुगाचे ओलित व्यवस्थापन करतेवेळी जमिनीला भेगा पडणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
  • आऱ्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखावी.
  • खत व्यवस्थापन ः रासायनिक खतांच्या व्यवस्थापनामध्ये पेरणी वेळी प्रति एकर ३-४ बॅग जिप्सम व आऱ्या सुटताना ३.४ बॅग जिप्सम दोन वेळा विभागून द्यावे. भुईमूग पिकाला प्रति एकर ४-५ किलो झिंक सल्फेट तसेच २ किलो बोरॅक्स पेरणीचे वेळी देण्याचीही शिफारस आहे.

    रासायनिक खते देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही एका पर्यायाचा अवलंब करावा.
    शिफारशीनुसार घ्यावयाची अन्नद्रव्यांची मात्रा (किलो / एकर ) शिफारशीनुसार लागणारी रासायनिक खतांची मात्रा (किलो / एकर) खते द्यावयाची योग्य वेळ व मात्रा
    नत्र स्फुरद पालाश    
    १० २० १२ डीएपी-४३.५ किलो (साधारणत: एक बॅग), एमओपी -२० किलो (साधारणत: अर्धा बॅग) डीएपी (एक बॅग) एमओपी (अर्धा बॅग)
    १० २० १२ १८:१८:१०-१११.२ किलो (साधारणत: सव्वादोन बॅग) १८:१८:१० (सव्वादोन बॅग)
    १० २० १२ २०:२०:००:१३-५० किलो (साधारणत: एक बॅग), एसएसपी - ६२.५ किलो (साधारणत: सव्वा बॅग), एमओपी-२० किलो (साधारणत: अर्धा बॅग) रणीच्या वेळी २०:२०:००:१३-५० (एक बॅग), एसएसपी (सव्वा बॅग), एमओपी (अर्धा बॅग)
    १० २० १२ १०:२६:२६-७६.९५ किलो (साधारणत: दीड बॅग ) पेरणीच्या वेळी १०:२६:२६ (दीड बॅग)
    १० २० १२ १४:३५.१४ - ५७.१५ किलो (साधारणत: सव्वा बॅग ) पेरणीच्या वेळी १४:३५:१४ (सव्वा बॅग)
    १० २० १२ १५:१५:१५ - ८० किलो (साधारणत:पावणेदोन बॅग), एसएसपी -५२ किलो (साधारणत: एक बॅग ) पेरणीच्या वेळी १५:१५:१५ (पावणेदोन बॅग), एसएसपी (एक बॅग)
    १० २० १२ युरिया -२१.७ किलो (साधारणत: अर्धा बॅग), (साधारणत: अडीच बॅग), एमओपी -२० किलो (साधारणत: अर्धा बॅग) पेरणीच्या वेळी युरिया (अर्धा बॅग), एसएसपी (अडीच बॅग), एमओपी (अर्धा बॅग)

    प्रा. जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (सहयोगी प्राध्यापक (कृषी विद्या), श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT