सलग सोयाबीनसाठी जोडओळ पेरणी (Soybean Twin Sowing Method) पद्धती फायदेशीर ठरते. पेरणीसाठी (Sowing) उपलब्ध ट्रॅक्टरचलित किंवा बैलजोडीचलित अवजारांचा वापर करता येतो. जोडओळ पद्धतीमुळे शेतात पुरेशी मोकळी जागा उपलब्ध होऊन पिकाचे निरीक्षण करणे शक्य होते. तसेच पीक उत्पादनाचा दर्जा (Crop Production Quality) व प्रत सुधारण्यास मदत होते.
अ) ट्रॅक्टरचलित सहा दात्यांचे पेरणी यंत्र ः
१) सलग सोयाबीनसाठी जोडओळ पद्धतीने पेरणी पद्धत ः
मोठ्या ट्रॅक्टरच्या सहा दाती पेरणी यंत्राने पेरणी करताना पेरणी यंत्राच्या बियाणे व खताच्या कप्प्यातील दुसरे व पाचवे छिद्र बोळा कोंबून किंवा टिकली लावून बंद करावे. बियाणे व खताच्या पहिल्या, मधल्या आणि शेवटचा कप्प्यामध्ये भरून घ्यावा. अशाप्रकारे पेरणी करताना ट्रॅक्टर प्रत्येक वेळी येताना व जाताना प्रचलित पद्धतीनुसार पेरणीवेळी जेवढी जागा सोडली जाते तेवढीच जागा सोडावी. म्हणजेच शेतात जोडओळ पद्धतीत पेरणी शक्य होईल आणि प्रत्येक तिसरी ओळ खाली राहील. या पद्धतीत बियाणे व खताची ३३ टक्के बचत होते.
२) सलग सोयाबीनसाठी जोडओळ पद्धतीत टोकण पद्धतीने पेरणी ः
मोठ्या ट्रॅक्टरचे सहा दाती पेरणी यंत्र वापरून टोकण पद्धतीने सोयाबीनची पेरणी करावयाची झाल्यास पेरणी यंत्रातील खताच्या कप्प्याचे दुसरे व पाचवे छिद्र बोळा कोंबून किंवा टिकली लावून बंद करावे. इतर सर्व कप्प्यांमध्ये फक्त खत भरावे. बियाण्याचे कप्पे पूर्ण रिकामे ठेवावेत. अशाप्रकारे संपूर्ण शेतात हलक्या सऱ्या पाडून घेऊन जोडओळीत खताची मात्रा द्यावी. त्यानंतर मजुरांच्या मदतीने फक्त जोडओळ पद्धतीत खत दिलेल्या ओळीत दोन झाडांतील अंतर ८ ते १० सेंमी राखून प्रत्येक ठिकाणी साधारणत: २ ते ३ बियाणे टोकण पद्धतीने लावावे. यासाठी मनुष्यचलित टोकण यंत्राचा वापरदेखील करता येतो. असे करताना प्रत्येक तिसरी ओळ रिकामी राहील आणि जोडओळ पद्धतीत पेरणी होईल. या पद्धतीत बियाणाची ४० टक्के, तर खतांची ३३ टक्के बचत होते.
ब) टॅक्टरचलित पाच दाती पेरणी यंत्र ः
१) सलग सोयाबीनसाठी जोडओळ पद्धतीने पेरणी ः
छोट्या ट्रॅक्टरचे पाच दाती पेरणी यंत्राच्या बियाणे व खताचे मधले (३ क्रमांकाचे) छिद्र बोळा कोंबून किंवा टिकली लावून बंद करावे. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी येताना व जाताना एक ओळ सुटेल एवढे अंतर खाली ठेवावे. (उदा. दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी असल्यास या ठिकाणी साधारणत: ९० सेंमी (३ फूट) रिकामी जागा राहील). म्हणजेच जोडओळीत पेरणी होऊन प्रत्येक तिसरी ओळ रिकामी राहील. या पेरणीपद्धतीत बियाणे व खताची ३३ टक्के बचत शक्य होते.
२) सलग सोयाबीनसाठी जोडओळीमध्ये टोकण पद्धतीने पेरणी ः
छोट्या ट्रॅक्टरच्या पाच दाती पेरणी यंत्राद्वारे टोकण पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास बियाणे व खताच्या कप्प्यातील मधले (३ क्रमांकांचे) छिद्र बोळा कोंबून किंवा टिकली लावून बंद करावे. पेरणीयंत्राच्या पहिल्या दोन व शेवटच्या दोन कप्प्यांपैकी फक्त खताच्या कप्प्यात रासायनिक खत भरावे. बियाण्याचे कप्पे रिकामे ठेवावेत. अशाप्रकारे शेतात हलक्या सऱ्या (काकर) पाडून घ्याव्यात. याप्रकारे जोडओळीतील सऱ्यांमध्ये खते दिली जातील. त्यानंतर मजुरांच्या साह्याने टोकन पद्धतीने दोन झाडांतील अंतर ८ ते १० सेंमी याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी २ ते ३ बी लावावे. यासाठी मनुष्यचलित सुधारित टोकण यंत्राचादेखील वापर करता येईल. यामध्ये प्रत्येक तिसरी ओळ रिकामी राहील आणि जोडओळ पद्धतीने पेरणी होईल. या पेरणी पद्धतीत बियाण्याची ४० टक्के व रासायनिक खताची ३३ टक्के बचत शक्य होते.
३) सलग सोयाबीनसाठी पाच ओळींची पट्टा पेरणी पद्धत ः
छोट्या ट्रॅक्टरच्या पाचदाती पेरणी यंत्राने पेरणी करताना प्रत्येक वेळी ट्रॅक्टर येताना व जाताना दोन ओळींत राखवयाचा अंतरापेक्षा दुप्पट जागा सोडावी (उदा. दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी असल्यास या ठिकाणी साधारणत: ९० सेंमी (३ फूट) जागा सुटेल). म्हणजे शेतात पाच-पाच ओळींच्या पट्ट्यात पेरणी होईल आणि प्रत्येक सहावी ओळ रिकामी राहील. यामध्ये बियाणे व खताची १७.५ टक्क्यांपर्यंत बचत होते.
४) सलग सोयाबीनसाठी तीन ओळींची पट्टापेर पेरणी पद्धत ः
छोट्या ट्रॅक्टरच्या पाच दाती पेरणी यंत्राने तीन ओळींच्या पट्टापेर पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास, पेरणी यंत्राचे बियाणे व खताच्या कप्प्यातील पहिले व शेवटचे छिद्र बोळा कोंबून किंवा टिकली लावून बंद करावे. ट्रॅक्टर प्रत्येकवेळी येताना व जाताना पेरणी यंत्राचे शेवटचे दाते खाली काकरात ठेवावे. म्हणजेच प्रत्येक चौथी ओळ रिकामी राहील आणि तीन-तीन ओळींच्या पट्ट्यात पेरणी होईल. या पद्धतीमध्ये बियाणे व खताची २५ टक्के बचत शक्य होते.
५) सलग सोयाबीनसाठी चार ओळींची पट्टापेर पेरणी पद्धत ः
छोट्या ट्रॅक्टरच्या पाचदाती पेरणी यंत्राने पेरणी करताना बियाणे व खताच्या कप्प्यातील मधले (३ क्रमांकांचे) छिद्र बोळा कोंबून किंवा टिकली लावून बंद करावे. पेरणी करताना प्रत्येकवेळी ट्रॅक्टर येताना व जाताना प्रचलित पद्धतीने नेहमीप्रमाणेच पेरणी केल्यास दोन सोयाबीनच्या ओळींच्या बाजूला पुन्हा दोन सोयाबीनच्या ओळी याप्रकारे पेरणी होईल. म्हणजेच शेतात चार-चार ओळींच्या पट्ट्यात पेरणी होऊन प्रत्येक पाचवी ओळ खाली राहील. म्हणजेच बीबीएफ यंत्राप्रमाणे पेरणी शक्य होईल. या पद्धतीत बियाणे व खतामध्ये २० टक्के बचत शक्य होते.
क) बैलजोडीचलित तिफण, चौफण, काकरी व सरत्याने पेरणी ः
१) जोडओळ पेरणी पद्धत ः
- बैलजोडीचलित तिफण किंवा तिदाती काकरी व सरत्याने पेरणी करताना मधल्या चाड्यातून किंवा मधल्या सरत्याद्वारे पेरणी न करता, केवळ पहिल्या व तिसऱ्या चाड्यातून किंवा सरत्याद्वारे पेरणी केल्यास प्रत्येकवेळी ट्रॅक्टर येताना व जाताना प्रचलीत पद्धतीप्रमाणे पेरणी केल्यास जोडओळीत पेरणी शक्य होते. प्रत्येक तिसरी ओळ खाली राहते. हीच बाब खत व्यवस्थापनासाठी देखील लागू राहील.
- बैलजोडी चौफण किंवा चारदाती काकरी व सरत्याने पेरणी करताना पहिल्या व शेवटच्या चाड्यातून अथवा सरत्याद्वारे पेरणी न करता केवळ मधल्या दोन चाड्यातून किंवा सरत्याद्वारे पेरणी केल्यास प्रत्येकवेळी ट्रॅक्टर येताना व जाताना चौफणचे किंवा चारदाती काकरीचे शेवटचे दाते खाली काकरात ठेवल्यास जोडओळीत पेरणी शक्य होते. आणि प्रत्येक तिसरी ओळ खाली राहते. हीच बाब खत व्यवस्थापनासाठी देखील लागू राहील. म्हणजेच दोन चाड्यांतील चौफण अथवा चार सरत्यांद्वारे पेरणी यासाठी लागू राहील.
वरील पेरणी पद्धतीमध्ये मजुरांद्वारे टोकण पद्धतीने अथवा मनुष्यचलित टोकण यंत्राचा वापर करून पेरणी करण्यासाठी वरील बैलजोडीचलित अवजारांद्वारे हलक्या सऱ्या पाडून घ्याव्यात. त्यासोबतच जोडओळ पद्धतीत खत द्यावे आणि नंतर टोकण पद्धतीने बियाणे लावावे.
नावीन्यपूर्ण सुधारित पेरणी पद्धतीचे तोटे ः
- पेरणीसाठी उपलब्ध औजारांचा ज्या पद्धतीच्या पेरणीसाठी अवलंब केला असेल त्याप्रमाणात ओळींची तसेच झाडांची संख्या कमी होणार आहे. म्हणजेच जोडओळ पद्धतीत प्रत्येक तिसरी ओळ आणि चार ओळीच्या पट्ट्यामध्ये प्रत्येक पाचवी ओळ रिकामी राहणार. अशाप्रकारे अवलंब केलेल्या पेरणी पद्धतीनुसार ओळींची व झाडांची संख्या कमी होणार आहे.
- प्रत्येक जोडओळीनंतर अथवा पट्ट्यानंतर रिकामी ठेवलेल्या ओळींमध्ये मोकळी जागा असल्यामुळे, त्या भागात तणांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
नावीन्यपूर्ण सुधारित पेरणी पद्धतीचे फायदे ः
- बियाणे व रासायनिक खतांच्या मात्रेत बचत होते.
- तणनाशक, कीटकनाशक, बुरशीनाशक, विद्राव्य खते इत्यादींमध्ये बचत.
- शेतात मोकळी जागा उपलब्ध झाल्यामुळे, पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करणे शक्य होते.
- कीड-रोगांच्या प्रादुर्भावानुसार वेळेत आणि योग्यप्रकारे फवारणी करता येते.
- दोन पिकांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध झाल्यामुळे सूर्यप्रकाश, जमिनीतील ओल, अन्नद्रव्ये इ.साठी स्पर्धा कमी होते.
- संपूर्ण शेतात पिकाची एकसमान वाढ होते.
- शेतात हवा खेळती राहते. त्यामुळे शेतात योग्य आर्द्रता राखली जाते.
- डवरणी (कोळपणी) वेळी रिकाम्या ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी डवऱ्याच्या (कोळप्याच्या) जानोळ्याला दोरी गुंडाळून त्या ठिकाणी सरी काढून घेतल्यास, पीक गादी वाफ्यावर येते. कोळपणीनंतर शेतातील पावसाचे अतिरिक्त पाणी सरीमध्ये साचून मूलस्थानी संवर्धन शक्य होते. त्यामुळे कमी किंवा जास्त पावसाच्या स्थितीत पिकाचे नुकसान टाळता येते.
- ओलिताची सोय असल्यास दांडातून, स्प्रिंकलरच्या पाइप किंवा नोझलद्वारे तुषार सिंचन पद्धतीने ओलित करणे शक्य होते.
- जोडओळ तसेच पट्टापेर पद्धतीमध्ये काठावरच्या ओळी ‘बॉर्डर इफेक्ट’च्या माध्यमातून उत्पादनात वाढ होण्यास मदत करतात.
- पिकाच्या उत्पादनाचा दर्जा व प्रत सुधारण्यास मदत होते.
------------------------------
- जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७ (सहयोगी प्राध्यापक, कृषिविद्या विभाग, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.