VR Food Experience Agrowon
टेक्नोवन

Virtual Taste: आता आभासी खाद्याची आभासी चवही घेणे होईल शक्य

E-Taste Technology: आता आभासी वास्तव (VR) फक्त पाहण्यापुरते मर्यादित राहणार नाही! ओहियो राज्य विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ई-टेस्ट नावाचे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे आभासी पदार्थांची चवही अनुभवता येणार आहे.

Team Agrowon

Future of Food: आभासी सत्यतेद्वारे (Virtual Reality) तयार केलेल्या जगामध्ये अनेक गोष्टी किंवा अन्नपदार्थ तुम्हाला पाहता येत असले, तरी आजवर त्यांची चव घेणे शक्य नव्हते. मात्र या आभासी जगामध्येही घेता येईल, अशी आभासी चव (ई टेस्ट) अत्याधुनिक संवेदके आणि योग्य त्या रसायनाच्या फवारणी तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळविण्यामध्ये ओहियो राज्य विद्यापीठातील शास्त्रज्ञांना यश आले आहे.

शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या चवींच्या कमी अधिक तीव्रतांचा अनुभव देण्याच्या क्षमतेची चाचणी घेतली असून, त्यात समाधानकारक अचूकतेपर्यंत यश मिळाल्याचा दावा केला आहे. या तंत्रज्ञानामुळे आभासी जगामध्ये आता चवीचाही अंतर्भाव होणार आहे. या प्रणालीमुळे मानवी मेंदू चवी कशा प्रकारे ओळखतो, यावरही प्रकाश पडू शकतो. हे संशोधन ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये २८ फेब्रुवारीला प्रकाशित झाले आहे.

...असे आहे ई टेस्ट उपकरण

या नव्या ‘ई टेस्ट’ उपकरणामध्ये अनेक सेन्सर्स वापरले असून, त्यावर चालवले जाणारे वायररहित रसायन फवारणी यंत्रे (वायरलेस केमिकल डिस्पेन्सर्स) वापरलेली आहेत. हे सेन्सर्स गोड, खारट, तुरट, कडू आणि उमामी अशा वेगवेगळ्या पाच चवींसाठी कारणीभूत विशिष्ट मूलद्रव्ये (उदा. ग्लुकोज, ग्लुटामेट इ.) ओळखतात. हा माहितीसाठी विद्युत संदेशामध्ये रूपांतरित केला जातो आणि वायररहितपणे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या उपकरणांपर्यंत पोहोचवला जातो. तिथे त्या विशिष्ठ चवीची निर्मिती केली जाते.

ही प्रणाली ओहिया राज्य विद्यापीठातील सहायक प्राध्यापिका जिनहुआ ली यांच्या पूर्वीच्या बायोसेन्सर तंत्रावर आधारित आहे. त्यात ली यांनी तोंडाचा इंटरफेस आणि लहान विद्युत चुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) पंप असलेले अॅक्च्यूएटर वापरले आहे. हा पंप रसायनाशी जोडलेला असून, त्यातून विद्युत प्रवाह पुढे जात असताना थरथरतो. या कमी अधिक थरथरण्यामुळे रसायने कमी अधिक प्रमाणात पुढे फेकली जाऊन विशिष्ट जेलसारखा थर तोंडामध्ये पसरवला जातो. त्याद्वारे चवीचा एक आभास निर्माण केला जातो.

सध्याच्या तंत्रज्ञानाविषयी बोलताना प्रा. जिनहुआ ली यांनी सांगितले, की विद्युत संदेशांच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या तीव्रतेच्या चवींची निर्मितीकरताना त्यामध्ये विविधता आणि त्याच वेळी वापरकर्त्यांची सुरक्षितता यांची विचार केला आहे. सध्याच्या आभासी वास्तव (VR) आणि परस्परसंवादी संवर्धित वास्तव (AR) तंत्रज्ञानामध्ये दृश्य आणि अन्य अनुभवांच्या दृष्टीने अधिक विचार केला गेला असला, तरी चव, स्वाद आणि रासायनिक परिमाणांचा विचार झालेला नाही. वास्तवतेच्या अनुभवांमध्ये अधिक पूर्णता आणण्याच्या दिशेने आम्ही विकसित केलेले उपकरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

चव, स्मृती आणि भावना यातील सांधकाम

चव आणि गंध (वास) हे प्रत्येक व्यक्तीच्या किंवा सजीवाच्या सापेक्ष असलेला संवेदनाविषयक अनुभव आहे. तो एका क्षणापासून दुसऱ्या क्षणापर्यंत बदलू शकतात. त्यामध्ये त्या व्यक्तीच्या भावना आणि स्मृती यांचा मोठा वाटा असतो. त्यातही तुम्ही जे काही खात आहात, ते सुरक्षित असल्याची खात्री दरवेळी मेंदू वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारे पटवून घेत असतो. ही उत्क्रांतीची अनेक थरांमध्ये विकसित झालेली अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.

आपली विविध ज्ञानेंद्रिये मिळणाऱ्या चव, स्वाद आणि गंधांची दरवेळी नोंद घेत साठवून ठेवत असतात. त्यामुळे ती व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. एकाच वेळी सर्व लोकांना एकच चव, स्वाद किंवा गंध तितकाच चांगला किंवा खराब वाटायला लावणे हे अत्यंत अवघड असल्याचे ली यांनी सांगितले. पण मानवांवर घेतलेल्या चाचण्यांतून या नव्या उपकरणाद्वारे तयार केलेल्या द्रवपदार्थांच्या वेगवेगळ्या चवी सुमारे ७० टक्क्यांपर्यंत अचूक असल्याचे पुढे आले आहे.

आभासी आणि भौतिक जगांना जोडताना...

एका प्रयोगामध्ये त्या व्यक्तींना पाठवण्यात आलेल्या लिमोनेट, केक, तळलेले अंडे, माशांचे सूर किंवा कॉफी या पैकी त्यांना मिळालेल्या चवींची ओळख पटविण्यास सांगण्यात आले होते. त्यावरून ओहियोमध्ये तयार केलेली चव अगदी दूरवर कॅलिफोर्नियामध्ये बसलेल्या व्यक्तींपर्यंत पाठवून त्या व्यक्तींना त्या त्या आभासी पदार्थांची चवीचीही अनुभूती देण्याची क्षमता या इ टेस्ट उपकरणांमध्ये असल्याचे स्पष्ट झाले.

भविष्यामध्ये या तंत्रज्ञानामध्ये अचूकतेच्या दृष्टीने अधिक सुधारणा करतानाच त्याचे आकारमान कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ली यांनी सांगितले. भविष्यात आभासी वास्तव आणि परस्परसंवादी संवर्धित वास्तवात दिसणारे, जाणवणारे अनुभव आणखी एका मितीमध्ये वृद्धिंगत करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आभासी खेळांमधील अनुभव अधिक वास्तव होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT