Indian Farmer
Indian Farmer AgrowonAgrowon
टेक्नोवन

Mobile Agriculture: मोबाईलमुळे शेतकरी चौथ्या लाटेवर स्वार

रमेश जाधव

Indian Technology एका शेतक-याची नुकतीच गाय हरवली (Cow Missing), तेव्हा त्याने थेट फेसबुकवर स्टेटस टाकून शोधाशोधीचा प्रयत्न केला. त्या शेतक-याला गाय शोधण्यासाठी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचा उपयोग करावासा वाटला, ही गोष्ट तशी वरकरणी साधी दिसत असली तरी आपल्या पोटात भविष्यातल्या व्यापक बदलाचे बीज वागवणारी आहे.

एक नवा शेतकरी उदयाला येतो आहे आणि तंत्रज्ञान (Agriculture Technology) हे त्याच्यासाठी मोठी साधनसामुग्री ठरणार आहे, याचीच ही नांदी होय. शेती ही त्याची जीवनशैली नव्हे, तर व्यवसाय आहे. त्या अर्थाने तो उद्योजक आहे.

मोबाईल फोनमुळे या शेतक-याचे आयुष्य अगोदरच पुरते बदलून गेले आहे, आता त्याला वेगवान इंटरनेट, आर्टिफिशियल इन्टेलिजन्सची (Artificial Intelligence) जोड मिळणार असल्याने या बदलाची गती कैक पटींनी वाढणार आहे.

एल्विन टॉफ्लरने थर्ड वेव्ह या ग्रंथात समाजबदलाच्या गतिशास्त्राचं अत्याधुनिक निदान करताना असं म्हटलं होतं की जगातली पहिली क्रांती कृषी क्रांती होती. शिकार आणि अन्न गोळा करण्यासाठी वणवण हिंडणारी मानवजात आणि तिची संस्कृती कृषी क्रांतीने बदलून टाकली. ह्या क्रांतीची लाट आशियातून युरोपकडे गेली.

तर दुसरी क्रांती औद्योगिक क्रांती. ही पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरत गेली. तिसरी क्रांती उत्तर औद्योगिक क्रांती अर्थातच माहिती-तंत्रज्ञानाची क्रांती. १९५० नंतर अनेक देश उत्तर औद्योगिक समाजव्यवस्थेत प्रवेश करू लागले.

आता मोबाईल फोन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ही चौथी लाट म्हटली पाहिजे. या चौथ्या लाटेवर स्वार होऊन आज शेती आणि शेतकरी नवा अवकाश निर्माण करू पाहत आहेत.

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. राजकुमार जाधव हा लातूर जिल्ह्यातल्या भंडारवाडीचा एक तरूण शेतकरी. आधीच्या वर्षी म्हणजे २०११ ला सोयाबीनचे भाव क्विंटलला ४५०० रूपयांवर गेले, तेव्हा गावातल्या बहुतेक सगळ्या शेतक-यांनी आपला माल विकून टाकला.

पण राजकुमारच्या मोबाईलवर बातमीचा मेसेज आला की, अमेरिकेतल्या स्थितीमुळे सोयाबीनचे भाव महिन्याभरात आणखी वाढणार आहेत. सोयाबीनचा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ट्रेन्ड काय राहील याचे मेसेज त्याला दररोज मिळत होते.

त्याप्रमाणे बाजारातल्या चढ-उतारावर तो लक्ष ठेऊन होता. शेवटी भाव ५२०० वर पोहोचल्यावर त्याने माल विकला आणि लाखो रूपयांचा फायदा कमावला. केवळ अचूक माहितीच्या बळावर योग्य निर्णय घेतल्याचा हा परिणाम होता.

मोबाईलवर मेसेज वाचून त्यानुसार शेतीच्या संबंधात अचूक आणि फायदेशीर निर्णय घेणारा राजकुमार हा एकटाच शेतकरी नाही. संगमनेरचे संदीप लोढा असोत, सातारा जिल्ह्यातले दौलतराव बारकडे असोत,

नाशिकचे मधुकर क्षीरसागर असोत की, विदर्भातले यवतमाळचे सुदर्शन मोहनूर असोत... हे आणि यांच्यासारखे हजारो शेतकरी सध्या आपल्या शेतीतले रोजचे निर्णय घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर येणाऱ्या बातम्यांवर विसंबून आहेत.

अनेक कंपन्या व्यावसायिक तत्त्वावर देशभरातील शेतकऱ्यांना मोबाईलवर बाजारभाव, पिक-सल्ला, हवामान आणि बातम्या या स्वरूपाची माहिती पुरवतात. शेतीचे नेटके नियोजन आणि वेळेवर कृती करण्यासाठी तिचा उपयोग होतो.

शेतमालाच्या किंमती हा शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा विषय. शेतीची आणि आयुष्याचीही गणिते मोठ्या प्रमाणावर बदलून टाकणारी ती संवेदनशील बाब असते.

मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम करणा-या अनेक बाबी असल्याने शेतमालाच्या दरात सतत चढ-उतार होतात. शेतमालापासून तयार होणा-या पक्क्या मालाला असणारी मागणी आणि मिळणारा भाव यावर शेतमालाचे दर ठरतात.

देश आणि जागतिक पातळीवरच्या घडामोडी, धोरणे, व्यापार, आवक, मार्केट ट्रेन्ड यांचा त्यावर थेट परिणाम होतो. या सगळ्यांचे विश्लेषण करणारी माहिती शेतक-यांना त्यांच्या मोबाईलवर, त्यांच्या भाषेत नियमित मिळते.

आपल्या वावरातल्या सोयाबीनबरोबरच अर्जेन्टिना, ब्राझील, अमेरिकेत पिकाची स्थिती काय आहे, यावरही नजर ठेवली पाहिजे, हा विचार मोबाईलवरच्या बातम्यांमुळे शेतक-यांमध्ये चांगलाच झिरपला आहे.

``आम्हाला आता सोयाबीनची ग्लोबल व्हिजन मिळाली. दक्षिण अमेरिकेतले शेतकरीही आपल्यासारखंच सोयाबीनचं पीक घेतात हे मला आधी माहित नव्हतं. तिथलं उत्पादन वाढलं वा कमी झालं म्हणून आपल्या बाजारसमितीत भावात चढ-उतार होतात याची टोटल लागत नव्हती.

या बातम्यांमुळे सगळ्या गोष्टी कळायला लागल्या..., ” मध्य प्रदेशातल्या सेहोर जिल्ह्यातले शेतकरी लाखनसिंह ठाकूर सांगतात.

ढगाळ वातावरणाच्या अंदाजाचा मेसेज वाचून द्राक्षबागेवर डाऊनीसाठीचे औषध फवारल्यामुळे साडे तीन लाखांचा फायदा झाल्याचं सावळज (ता. तासगाव, जि. सांगली)चे बंडू देसाई यांनी नोंदवलं आहे.

आठवीपर्यंत शिक्षण घेऊन स्वतःला शेतीमध्ये पूर्णवेळ गुंतवून घेतलेले भास्कर शिंदे म्हणतात, ``दिवसातला बहुतेक वेळ शेतावरच जात असला तरी जगात काय चाललंय, याची माहिती मला पाहिजेच असते.

यंदा कापसाचे भाव कधी वाढणार इथपासून ते शरद पवारांनी कुठली राजकीय चाल खेळलीय, या सगळ्याची उत्सुकता मला असते. कुठंही असलो तरी माझ्या मोबाईलवर ही माहिती मिळणार याची खात्री असल्याने निश्चिंत असतो. मोबाईलवरचा मेसेज एकदम डोक्यातच घुसतो.

मी शेतीच्या कामांत गळ्यापर्यंत बुडालेलो असताना माल कुठं-कधी विकायचा, बुरशीनाशक कधी मारायचं, देशात-जगात काय घडामोडी होतायत ही सगळी माहिती मला माझ्या शेतात बसल्या-बसल्या मिळते.``

बातम्यांचे मेसेज मिळाल्याने वेळेवर खतं मिळवणं शक्य झालं...डिझेलचे भाव वाढणार असल्याची बातमी एक दिवस आधीच मिळाल्याने ट्रॅक्टरची टाकी फुल्ल करून टाकली... सरकारी अनुदानातून शेततळे बांधलेल्या शेतक-याची माहिती वाचून त्याचं अनुकरण करण्याचा निर्णय घेतला... असे अनेक अनुभव वेगवेगळ्या ठिकाणचे शेतकरी सांगतात.

लातूर जिल्ह्यात सरकारचा एकही पैसा खर्च न करता लोकसहभागातून शेतरस्त्यांचा प्रश्न सोडविल्याची बातमी मोबाईलवर वाचून शेकडो शेतक-यांनी आपल्याशी थेट संपर्क साधल्याचा अनुभव तत्कालिन जिल्हाधिकारी आणि विद्यमान कृषी सचिव एकनाथ डवले यांनी सांगितला.

वर्तमानपत्रातली माहिती वाचली जाते तर मोबाईल फोनवरील बातमी कृती करण्यास उद्युक्त करते. मोबाईलवरची माहिती सेवा वापरणा-या शेतक-यांचे प्रातिनिधिक अनुभव अनेक अर्थाने बोलके आहेत. मोबाईल फोनमुळे शेतक-यांच्या वर्तणुकीत आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत बदल होतो आहे.

गावातले चार मोठे-जाणते शेतकरी जशी शेती करतात त्याचं जमेल तसं अनुकरण करायचं, ज्याच्याकडून आधीच उचल घेतलेली आहे, तो आडत्या सांगेल त्या भावाला माल विकून टाकायचा ही गावगाड्यात रूजलेली आजवरची पध्दत.

आधीच्या वर्षी कोणत्या पिकामुळे फायदा-तोटा झाला किंवा त्यावेळी कधी माल विकल्याने नफा-नुकसान झालं या आडाख्यावर यंदाच्या वर्षीचा निर्णय घ्यायचा, या पलीकडे नवीन काही करता येत नव्हतं. कारण माहितीचे स्त्रोतच मर्यादीत होते. पण मोबाईलवरच्या बातम्यांमुळे माहितीचा परीघ वाढल्याचा अनुभव सध्या शेतक-यांना येतोय.

एखाद्या शेतक-याच्या प्रयोगाची माहिती फोनवर वाचून राज्याच्या काना-कोप-यातले शेतकरी त्याला फोन करतात, अनेकदा गटा-गटाने त्या शेताला भेट देऊन माहिती घेतात. हे शेतक-यांचं एक अनौपचारिक नेटवर्किंगच आहे.

अरूण कराळे (मु.पो. अकोट, जि. अकोला) यांनी क्षारपड जमिनीच्या सुधारणेसाठी केलेल्या प्रयोगाची माहिती वाचून साडे चारशे लोकांनी त्यांना फोन केला.

राज्याचे कृषीमंत्रीही पाहणी करायला आले. मराठवाड्यात कृषी विभागाने बीडच्या साई कृषी शेतकरी मंचाची मदत घेऊन हळदीच्या समूह शेतीचा उपक्रम सुरू केला.

त्याची बातमी वाचून २००-२५० शेतक-यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यातून १२ गावांत शेतक-यांचे समूह तयार होऊन हळदीची नवी लागवड झाली, असे मंचाचे अध्यक्ष नाथराव कराड (मु.पो. इंजेगाव, जि. बीड) सांगतात.

मोबाईलवरची माहिती सेवा म्हणजे पारंपरिक माध्यमांचे साचे मोडून काढत शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून राबवलेला `न्यू मिडिया`चा एक प्रयोग आहे.

निर्णयक्षम माहिती शेतकरी पैसे मोजून विकत घेतात, हे या प्रयोगातून सिध्द झालं आहे. मोबाईलवरच्या बातम्यांमुळे शेतकरी आता जगाशी जोडले गेले आहेत. तांबडं फुटायला सुरूवात झालीय.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता इंटरनेटचा वेग प्रचंड वाढणार आहे. व्हर्चुअल रिअॅलिटी, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स यामुळे जगात नवी उलथापालथ होणार आहे.

चॅटजीपीटीसारख्या नव्या प्रयोगांची संख्या वेगाने वाढणार आहे. या सगळ्यांमुळे शेतक-यांमधील परस्परसंवाद आणि माहितीचं आदान-प्रदान अधिक सहज, सुकर आणि परिणामकारक होईल. जगभरातल्या माहितीला एक्सेस मिळेल.

शेती संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचण्यातले अनेक अडसर दूर होतील. शेतक-यांचे नेटवर्किंग करणं सहज शक्य होईल व नवीन शेतीतंत्रज्ञानाचा स्वीकार, निविष्ठांची खरेदी, मालाची विक्री या प्रत्येक टप्प्यावर त्याचा त्यांना फायदा होईल. भारतातल्या शेतक-यांसाठी नेटवर्किंग ही काही नवी गोष्ट नाही.

इथल्या शेतजमिनीचे आकारमान आणि सामाजिक-भौगोलिक-आर्थिक वास्तव असे आहे की, शेतक-यांना एकमेकांना धरून राहिल्याशिवाय व परस्परांना सहकार्य केल्याशिवाय शेती करणं शक्यच नाही. आपले शेतकरी त्यात माहीर आहेत. त्यासाठी एक ग्रामीण शहाणपण लागतं, ते त्यांच्याकडे भरपूर आहे.

साधनसंपत्तीचा तुटवडा असल्यामुळे सगळ्यांनी मिळून एकेकाच्या शेतावरची कामे करायची, त्यासाठी आपली साधनसामुग्री आणि श्रम `शेअर `करायचे हे `इर्जिक` इथला शेतकरी पिढ्यानपिढ्या घालत आहे.

सध्याची गटशेतीची पध्दतही या नेटवर्किंगचाच एक अविष्कार आहे. त्यामुळे कम्युनिकेशनचे तंत्रज्ञान आत्मसात करून नेटवर्किंग अधिक बळकट करणं आपल्या शेतक-यांना अजिबात अवघड जाणार नाही.

फेसबुकवाल्या त्या शेतक-याला गाय सापडली की नाही, ते माहीत नाही. परंतु शेतक-यांनी नव्या तंत्रज्ञानावर आरूढ होऊन नेटवर्किंगची मांड पक्की ठोकली तर त्यांना समृध्दीची वाट निश्चित सापडेल, यात मात्र शंका नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT