Livestock Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : पशुधन व्यवस्थापनामध्ये डिजिटल तंत्रज्ञान

Livestock Management : दर्जेदार सेवा, शाश्वत आर्थिक संधी आणि सामाजिक स्वास्थ्य तंत्रस्नेही यंत्रणेची निकड लक्षात घेता शासनाने ‘राष्ट्रीय डिजिटल पशुधन मोहीम’ हाती घेतली आहे. ‘भारत पशुधन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रणालीत सर्व पशुधनाच्या जन्म मृत्यू, आरोग्य, मालकी हक्क वगैरे बाबींच्या नोंदी डिजिटल यंत्रणेद्वारे घेण्यात येत आहे.

Team Agrowon

डॉ. स्नेहल पाटील, डॉ. प्रवीण बनकर

National Digital Livestock Campaign : पशुधनाला गुणवत्तापूर्ण सेवा मिळण्यासाठी तसेच आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक माहितीचा लेखाजोखा उपलब्ध व्हावा यासाठी पशुपालकाला केंद्रस्थानी ठेवत, दर्जेदार सेवा, शाश्वत आर्थिक संधी आणि सामाजिक स्वास्थ्य तंत्रस्नेही यंत्रणेची निकड लक्षात घेता शासनाने “राष्ट्रीय डिजिटल पशुधन मोहीम” हाती घेतली आहे. आपल्या पशुधनाची संकलित माहितीचे पुढे काय होईल, हा प्रश्न पशुपालकांना पडणे स्वाभाविक आहे.

लाइव्हस्टॉक म्हणूनसुद्धा ओळखल्या जाणाऱ्या ‘एनडीएलएम' यंत्रणेत तांत्रिकदृष्ट्या अनेक पातळ्यांवरील माहितीचे संकलन व विश्लेषण या डिजिटल यंत्रणेद्वारे केले जाणार आहे. वापरकर्त्या पशुपालक/शेतकरी यांना माहिती आदानप्रदान, पैसे भरणा अधिक सुलभ होईल अशी संरचना; मुक्तस्रोत तंत्रज्ञान, सुलभ प्रमाणके, माहितीची गोपनीयता व साठवणूक यांसह तंत्रज्ञ व वापरकर्ता अशा दोघांनाही हाताळण्यास सुकर असा ‘डिजिटल प्लॅटफॉर्म‘ हे तांत्रिक प्रारूप आहे.

दूध व मांस उत्पादक, प्रयोगशाळा व पशुवैद्यकीय दवाखाने, लस पुरवठा यंत्रणा, पशुपैदास व पशुरोग संनियंत्रण प्रणाली या विविध घटकांकडून प्राप्त माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्ता व तत्सम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विश्लेषण करण्यात येऊन शासकीय यंत्रणेतील तंत्रज्ञ व अंतिम वापरकर्ता पशुपालक यांच्यात माहितीची देवाणघेवाण होईल.

मोबाइल अॅपच्या साह्याने पशुपालकांना पशूंची प्राथमिक माहिती आपल्या स्तरावर नोंदविणे शक्य होईल. त्यांना आवश्यक पशुवैद्यकीय सेवा, कृत्रिम रेतन, रेतमात्रा निवड, लसीकरण, पशुरोगअन्वेषण प्रयोगशाळा, रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना, औषधी विक्रेता, खरेदी विक्रीदार, बाजारपेठ, शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संघ तपशील इत्यादी माहिती ऑनलाइन पद्धतीने सहजशक्य होईल.

मोहिमेची उद्दिष्ट्ये

शेतकरी व पशुपालकांना आधुनिक माहिती पायाभूत सुविधा अखंडपणे देणारी एक सक्षम ‘शेतकरी-केंद्रित प्रणाली’ तयार करणे.

थेट लाभ हस्तांतर कार्यक्रमांसाठी यंत्रणा.

देशपातळीवर शेतकरी आणि बाजार यांना जोडून खासगी क्षेत्राचा सुधारित सहभाग सक्षम करून राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करणे.

पशुधन क्षेत्रात सशक्त पशुपैदास व प्रजनन प्रणाली, रोग संनियंत्रण कार्यक्रम तयार करणे.

शेतकऱ्यांच्या सेवेसाठी दर्जेदार वैज्ञानिक संशोधन व विकास कार्यक्रम हाती घेण्यासाठी पशुपालन व संशोधन क्षेत्राची नाळ जोडणे.

विविध राज्यांना त्यांचे स्वतःचे पशुधन कार्यक्रम तयार आणि व्यवस्थापित करण्यास सक्षम प्रणाली विकसित करणे.

पशुपालकांचा मोहिमेतील सहभाग

राज्यातील सर्व पशूंची डिजिटल नोंद करण्यासाठी कानात बारकोडयुक्त बिल्ले (इयर टॅग) मारण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हाती घेतली आहे. सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाला हे ‘बिल्ले लावून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ जून २०२४ नंतर बिल्ले असल्याशिवाय पशुधनाची आठवडी बाजारात, बाजार समितीमध्ये खरेदी विक्री करता येणार नाही. बिल्याशिवाय पशुधनाला पशुवैद्यकीय दवाखाने/ संस्था येथून पशुवैद्यकीय सेवेचा लाभ मिळू शकणार नाही. केंद्र किंवा राज्य शासनाकडून पशुपालकांना देय असलेले आर्थिक साह्य बिल्ला नसेल तर मिळणार नाहीत.

अनेकदा नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का किंवा वन्यपशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाई मिळत असते, मात्र आता बिल्ला नसेल तर अशी नुकसान भरपाई मिळणार नाही. राज्यांतर्गत किंवा परराज्यांत पशुधनाच्या वाहतुकीला बिल्याशिवाय परवानगी मिळणार नाही. बिल्ला नसलेले पशुधन तपासणी नाक्यावर आढळले तर पशुपालक आणि वाहतूकदार दोघांवरही नियमांनुसार कारवाई करण्यात येईल.

मोहिमेची वैशिष्ट्ये पशुधनाचे दस्तऐवजीकरण

आपल्या देशात पाळीव पशुधनाची संख्या सुमारे ५० कोटींच्या घरात असून गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडे, उंट, वराह अशा विविध पशूंच्या अनेक जाती-उपजाती आहेत. मात्र त्यांच्या शास्त्रोक्त ओळखीची सक्षम यंत्रणा त्यांचा उपयोग, व्यापार, संवर्धनाची दिशा इत्यादींसाठी आवश्यक ठरते. ‘एनडीएलएम’ ही मोहीम राष्ट्रीय पशुधनाच्या डिजिटल दस्तऐवजीकरणाच्या दृष्टीने एक आश्वासक पाऊल आहे.

मोबाइल ॲप्लिकेशन

समजण्यास सुलभ आणि वापरण्यास सोपे असे मोबाइल ॲप्लिकेशन (अॅप) ही आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळातील मूलभूत गरज आहे. पशुसंवर्धन क्षेत्र सुद्धा यात आघाडीवर आहे. “ई-गोपाला” (मोबाइल अॅप) या डिजिटल प्रणालीमधून पशुपालक शेतकऱ्यांना सेवा, बाजारपेठ मिळवून देण्यासह दुसऱ्या बाजूला तंत्रस्नेही पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना सेवा प्रदान करण्यास उपयुक्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यासाठी ही डिजिटल मोहीम महत्त्वाची आहे.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर

पशुधनाच्या पैदास, रोग नियंत्रण, उत्पादन अन्वेषण यांसारख्या बाबींसाठी जन आणि खासगी सेवा क्षेत्रात समतोल साधण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उपयोग सदर डिजिटल मोहिमेत करण्यात आलेला आहे, जेणेकरून परस्परसमन्वय साधता येईल.

पशुपालकांकडून पशुधनाची संकलित होणाऱ्या माहितीची गोपनीयता, प्रमाणीकरण तसेच पृथःकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, मशिन लर्निंग सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. उत्तम दर्जाच्या सेवा, रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, पशुधनाचे दर्जेदार व्यवस्थापन आणि पशूउत्पादनास उपलब्ध होणारी राष्ट्रीय बाजारपेठ अशा अनेक बाबी शक्य होणार आहेत.

डिजिटल मोहिमेद्वारे शेतकरी व पशुपालक यांना सरकारी मदत / लाभ थेट त्यांच्या खात्यात (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) देणे शक्य होईल.

राष्ट्रीय डिजिटल पशुधन मोहीम

इनाफ प्रकल्पांतर्गत भारतातील सुमारे १५ कोटी गाई-म्हशींना पशू आधार क्रमांक (१२ अंकी) असलेले कानातील टॅग लावण्यात आले आहेत.राष्ट्रीय पशुरोग रिपोर्टिंग यंत्रणा (एनएडीआरएस) गेल्या दशकांपासून कार्यान्वित असून विविध आजारांच्या प्रादुर्भाव बाबत माहिती देत आहे.

राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम (एनएआयपी) सारखे प्रमुख पैदास व्यवस्थापन कार्यक्रम यांच्या अनुभवाच्या आधारावर राष्ट्रीय पशुधन डिजिटल मोहीम आकाराला आली आहे.

प्रत्येक क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाने मुसंडी मारली असून, पशुधनाचे व्यवस्थापन करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाला दुर्लक्षित करून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने “राष्ट्रीय डिजिटल पशुधन मोहीम” हाती घेतली आहे. “भारत पशुधन” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रणालीत सर्व पशुधनाच्या जन्म मृत्यू, आरोग्य, मालकी हक्क वगैरे बाबींच्या नोंदी डिजिटल यंत्रणेद्वारे घेण्यात येत आहे.

पशुधनाच्या मूलभूत नोंदी ठेवण्यासाठी बारकोड युक्त बिल्ले जनावरांच्या कानात पशुसंवर्धन विभागातर्फे मारण्यात येत आहेत. या बिल्ल्यावरील बारकोडला संबंधित जनावरांची माहिती भारत पशुधन प्रणालीने जोडली जाणार असून त्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे पशुधनावर करण्यात येणाऱ्या औषधोपचारांची नोंद होणार आहे.

लसीकरण, प्रजनन, खरेदी विक्री अशा महत्त्वपूर्ण नोंदी या प्रणालीत होणार असल्याने विविध भागात पशुधनावर करण्यात येणाऱ्या उपचारादरम्यान वापरण्यात आलेली औषधी विचारात घेऊन सदर भागात संभाव्य साथीच्या आजाराच्या शक्यतेचा अंदाज किंवा अस्तित्वात असलेल्या आजाराच्या स्थितीबद्दल आगाऊ माहिती उपलब्ध होवू शकेल. त्यामुळे वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजने सहजशक्य होईल. जीवितहानी तसेच पशुधनापासून मिळणाऱ्या उत्पन्नावरील विपरीत परिणाम टाळणे शक्य होईल.

डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९

(डॉ. स्नेहल पाटील या अकोला पंचायत समितीमध्ये पशुधन विकास अधिकारी (विस्तार)आहेत. डॉ प्रवीण बनकर हे स्ना.प.प.संस्था, अकोला येथे पशुपैदासशास्त्र विभागामध्ये सहायक प्राध्यापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT