Ajit Gholap
Ajit Gholap 
टेक्नोवन

जमीन सुपीकता अन् तंत्रज्ञान; दर्जेदार पीक उत्पादनाचे सूत्र

Amol kutte

वडिलोपार्जित बागायती शेती असल्याने नोकरीच्या मागे न लागता रोहोकडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील अजित गंगाराम घोलप यांनी पूर्णवेळ शेती आणि पशूपालनाचा निर्णय घेतला. जमिनीची सुपीकता जपत आधुनिक तंत्राच्या वापरातून कांदा, टोमॅटो उत्पादनात त्यांनी वेगळी ओळख तयार केली आहे.

रोहोकडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे अजित गंगाराम घोलप यांची पंधरा एकर वडिलोपार्जित शेती आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अजित घोलप यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बीएससी उद्यानविद्या पदवी घेतली. बाजारपेठेचा अंदाज घेत बारा वर्षांपासून कांदा, टोमॅटो लागवडीवर भर दिला. पीक नियोजनाबाबत अजित घोलप म्हणाले की, दरवर्षी  ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये आठ एकर कांदा, एक एकर कांदा बीजोत्पादन आणि एप्रिलमध्ये आठ एकर टोमॅटो लागवड असते. दोन एकर क्षेत्रावर केळी किंवा उसाची लागवड असते. पीक फेरपालटीसाठी झेंडूची लागवड केली जाते. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जूनमध्ये ताग लागवड करतो. ऑगस्टमध्ये ताग गाडून कांद्यासाठी रान तयार केले जाते. शेती नियोजनात पत्नी सविता हिची चांगली साथ आहे. वडील गंगाराम आणि आई मंदाकिनी यांचे पीक व्यवस्थापनात मार्गदर्शन लाभते.  जमीन सुपीकता, एकात्मिक अन्नद्रव्यांवर भर  जमीन सुपीकतेबाबत अजित घोलप म्हणाले की, वर्षातून एकदा जमिनीची नांगरणी केली जाते. नांगरणीनंतर जमिनीचा इसी, सामू आणि सेंद्रिय कर्बाची तपासणी केली जाते. हिरवळीचे खत, शेणखताच्या वापरावर भर दिला आहे. सेंद्रिय कर्ब एक टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी कांदा काढणीनंतर मेंढ्या बसवितो. टोमॅटो अवशेषाचे कंपोस्ट खत केले जाते. कांदा, टोमॅटो पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्यांच्या वापरावर भर आहे. पीक वाढीच्या अवस्थेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून रहाते, अतिरिक्त खर्चात बचत होते. एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रण केले जाते. एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीमुळे पीक चांगले येते. चव, गोडी, आकारही चांगला मिळतो.  पाणी तपासणी  घोलप यांचे पीक लागवड क्षेत्र विभागलेले आहे. पाणी नियोजनासाठी विहीर आणि कूपनलिका आहे. दरवर्षी पाणी तपासणीमध्ये असे लक्षात आले की, कॅल्शिअम कार्बोनेटचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाय म्हणून त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटीक कन्व्हर्टर बसविला. त्यामुळे क्षाराचे प्रमाण कमी होऊन ठिबक सिंचनाच्या लॅटरल खराब होत नाहीत. पिकांना योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात. उन्हाळ्यात तापमान कमी करण्यासाठी पिकाला तुषार सिंचनाने पाणी दिले जाते. टोमॅटोमध्ये मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे तण नियंत्रण आणि पाण्याची बचत होते.  मोबाईलवर पाणीपुरवठा यंत्रणा  गावशिवारात वीस किलोमीटरच्या परिघामध्ये घोलप यांचे विविध ठिकाणी लागवड क्षेत्र आहे. या शेतांना पाणी देण्यासाठी विहिरी आणि कूपनलिकेवर पाणीपुरवठ्यासाठी यंत्रणा बसवली आहे. मोबाईल सॉफ्टवेअरच्या मदतीने नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे गरज असेल तेव्हा घर बसल्या कोणत्या शेतामध्ये पंप चालू आहे, बंद आहे याची माहिती मिळते. विहिरीतील पाणी संपले की, पंप आपोआप बंद होतो. येत्या काळात सर्व क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. यातून क्षेत्र आणि पिकांवरही नजर ठेवता येणार आहे.

अवजारांतून मजूर बचत 

  •  लागवड क्षेत्र मोठे असल्याने जमीन मशागत तसेच आंतरमशागतीसाठी विविध अवजारांचा वापर. घोलप यांच्याकडे एक ट्रॅक्टर तसेच एकफाळी, दोन फाळी नांगर, केणी, फणणी यंत्र, गादीवाफ्यांसाठी बेड मेकर आहे.
  • मल्चिंग पेपर पसरवणाऱ्या यंत्रामुळे कमी वेळेत, कमी मजुरात गादीवाफ्यावर पेपर अंथरून होतो. कागद फाटत नसल्याने प्रदूषण होत नाही. 
  • घोलप यांनी भाजीपाला पिकांना भर लावण्यासाठी माणसांनी ओढता येईल असे छोटे यंत्र बनविले आहे. त्यांच्याकडे देशी बनावटीचा पॉवर टीलर आहे. 
  • ठिबक सिंचन लॅटरल पसरवणारे, गुंडाळण्याचे यंत्र आहे.
  • पिकांना शेणस्लरी देण्यासाठी लहान टॅंकरसोबत स्लरी सोडणारी यंत्रणा तयार केली आहे. यामुळे पिकांना थेट पाटपाणी किंवा ठिबक सिंचनाद्वारे स्लरी देणे शक्य. 
  • पीक लागवड नियोजन

    कांदा  

  •   दरवर्षी ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये आठ एकरांवर कांदा लागवड, एक एकर कांदा बीजोत्पादन.
  •   पुणे फुरसुंगी जातीची निवड. स्वतः बियाणे तयार करून रोप पद्धतीने लागवड.
  •   माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन. सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर. पीक वाढीच्या गरजेनुसारच रासायनिक खतांचा वापर. शक्यतो अन्नद्रव्यांची फवारणी केली जाते.
  •   एकरी सरासरी १७ टन उत्पादन. यंदा मुंबई, ओतूर बाजारपेठेत २३ रुपये किलो दराने विक्री. बाजारपेठेत दरामध्ये सातत्याने चढउतार.   चार प्रकारात प्रतवारी करून विक्री. २५ टन क्षमतेच्या चार कांदा चाळी. त्यामुळे दरानुसार विक्री नियोजन शक्य.
  • बीजोत्पादन     बीजोत्पादनासाठी घरच्याच पुणे फुरसुंगी कांद्याची निवड. परागीभवन वाढविण्यासाठी बीजोत्पादन क्षेत्रात सूर्यफूल, मोहरी लागवड. सूर्यफुलाच्या उत्पादनातून घरगुती वापरासाठी खाद्यतेल मिळते.  दरवर्षी सरासरी ४०० किलो कांदा बियाणे उत्पादन. थेट शेतकऱ्यांना प्रति किलो १५०० ते २००० रुपयाने विक्री. परिरातील शेतकऱ्यांना कांदा लागवडीबाबत सातत्याने मार्गदर्शन. 

    टोमॅटो 

  •   मार्च शेवट किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आठ एकरांवर लागवड.   पाच फूट बाय सव्वा फुटावर लागवड. त्यामुळे पिकात हवा खेळती रहाते, फळांची चांगली वाढ होते.   शेणखताचा जास्तीत जास्त वापर. वाढीच्या टप्प्यानुसार रासायनिक खतांची मात्रा.   दोन तारेची बांधणी. एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर.   बाजारपेठेतील दरानुसार १५ जुलैपर्यंत पीक ठेवले जाते. सरासरी एकरी ४० टनांचे उत्पादन.   नारायणगाव बाजारपेठेत विक्री. प्रतवारीनुसार सरासरी २० ते ८० रुपये प्रति किलोस दर.
  • मजुरांचा आरोग्य विमा  घोलप यांची गावशिवारात विविध ठिकाणी शेती विभागलेली आहे. त्यामुळे  कायमस्वरूपी चार मजूर जोडपी शेती कामासाठी आहेत. अवजारे चालवणे, मजुरांची ने आण करण्यासाठी एक मजूर चालक म्हणून काम करतो. त्याचबरोबरीने दररोज किमान दहा मजूर शेतीकामामध्ये असतात. शेतामध्ये काम करताना अपघात होण्याची शक्यता असते. शेतीमध्ये साप चावणे, तसेच यंत्राचा अपघात घडू शकतो. याचा विचार करून घोलप यांनी कायमस्वरूपी मजूर कुटुंबाचा अपघात आणि आरोग्य विमा काढला आहे. 

    मिल्किंग मशिनचा वापर  अजित घोलप यांनी शेतीला पशूपालनाची जोड दिली आहे. दुग्धोत्पादनाच्या बरोबरीने शेतीला पुरेश्या प्रमाणात शेणखताची उपलब्धता होते. गोठ्यामध्ये लहान मोठी वीस जनावरे आहेत. यामध्ये एक खिलार गाय, एक म्हैस आणि बाकीच्या जर्सी,होल्स्टिन फ्रिजियन गाई आहेत. सकस हिरवा चारा, मूरघास आणि पशुखाद्य दिले जाते. जनावरांना पिण्यासाठी ‘आरओ’ यंत्रणेचे पाणी आहे. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केल्याने जनावरांना व्यायाम मिळतो. तापमान थंड रहाण्यासाठी गोठ्याकडेने झाडे लावली आहेत. गोठ्यामध्ये संगीत लावले जाते. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर केला जातो. त्यामुळे मजूर बचत झाली आहे. सध्या दररोज ७० लिटर दूध उत्पादन होते. 

    - अजित घोलप, ९८६०४५५४७६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

    Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

    Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

    Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

    Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

    SCROLL FOR NEXT