आधुनिक तंत्रातून ब्रोकोली उत्पादनात मिळवली वाढ 
टेक्नोवन

आधुनिक तंत्रातून ब्रोकोली उत्पादनात मिळवली वाढ

टीम अॅग्रोवन

मिझोराम राज्यातील शेतकरी ब्रोकोली या पिकाचे उत्पादन घेत असले तरी त्याचे उत्पादन राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी आहे. उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने ऐझवल येथील कृषी विज्ञान केंद्राने १२० शेतकऱ्यांच्या सुमारे ४० हेक्टर क्षेत्रावर सुधारित जाती, पीक व अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सिंचनासाठी गुरुत्वाकर्षणावर आधारित मिनी स्प्रिंकलर तंत्राचा वापर केला. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पादन आणि उत्पन्नामध्ये वाढ मिळवणे शक्य झाले आहे. स्प्राउटिंग ब्रोकोली (शास्त्रीय नाव - Brassica oleracea var. Italica L.) हे मध्यपूर्वेतील पूर्वेकडील भागातील स्थानिक पीक आहे. त्याची निर्मिती हा Brassica oleracea या प्राचीन वनस्पतीपासून केली गेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये हे पीक विकसित देशांमध्येही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. या पिकाची लागवड भारतासारख्या विकसनशील देशामध्येही विशेषतः मिझोरामसारख्या राज्यात व्यावसायिक पद्धतीने होऊ लागली आहे. या पिकातील पोषक आणि औषधी मूल्यामुळे आरोग्यासाठी जागरूक लोकांकडून त्याला मागणीही वाढत आहे. मात्र मिझोराममध्ये फुलकोबी आणि ब्रोकोली या दोन्ही पिकांची उत्पादकता फारच कमी म्हणजे हेक्टरी ७.६५ टन आहे. तुलनेसाठी राष्ट्रीय पातळीवरील सरासरी १७.३४ टन प्रति हेक्टर इतकी आहे. त्यामागे प्रामुख्याने उच्च उत्पादनक्षम किंवा संकरित जातींची कमतरता, खते व पाणी यांचा असंतुलित वापर, तुलनेने आधुनिक तंत्रज्ञानाचा कमी वापर अशी काही कारणे आढळून आली. यामुळे मिझोराममधील शेतकरी उत्पादनामध्ये मागे पडत आहे. ऐझावल येथील कृषी विज्ञान केंद्राने २०१८ मध्ये या शेतकऱ्यांपर्यंत नव्या आधुनिक संकरित जाती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व अन्य तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी २०१८ ते २०२० या काळामध्ये गटांमध्ये पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन केले. १२० शेतकरी आणि सुमारे ४० हेक्टर क्षेत्रावर घेतलेल्या या पीक प्रात्यक्षिकामध्ये ब्रोकोलीच्या CLX३५१२ या जातींचा आणि तंत्रज्ञानामध्ये गुरुत्वाकर्षणावर आधारित मिनी स्प्रिंकलर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. सुधारित व्यवस्थापन सहकारी पद्धतीने व्यवस्थित ७५ ते १०० सेंमी रुंदीचे गादीवाफे तयार करून रोपवाटिका तयार करण्यात आली. यामध्ये प्रति वर्गमीटर ४ ते ५ किलो चांगले कुजलेले शेणखत वापरले. ६ ते ८ सेंमी अंतरावर दोन ओळींमध्ये ८०० ते ८५० बिया प्रति वर्गमीटर या प्रमाणात बियांची पेरणी करण्यात आली. त्यावर सेंद्रिय खतमिश्रित माती, बारीक वाळू यांचा हलका थर पसरण्यात आला. रोपांच्या वाढीच्या अवस्थेत सुरुवातीला येणाऱ्या मररोगांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचे ड्रेंचिग करण्यात आले. किडीच्या प्रतिबंधासाठी कीडनाशकांची एक फवारणी करण्यात आली. साधारणपणे २६ दिवसांनंतर तयार झालेली रोपांपैकी एक तृतीअंश रोपे स्वतःच्या शेतीसाठी ठेऊन उर्वरित रोपे गटातील अन्य शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. शेतीमध्ये ४५ बाय ५० सेंमी अंतरावर रोपांची पुनर्लागवड करण्यात आली. लागवडीनंतर त्वरित हलके पाणी देण्यात आले. त्यानंतर पुढील सिंचनासाठी गुरूत्वाकर्षणावर आधारित मिनी स्प्रिंकलरचा वापर करण्यात आला. तणनियंत्रणासाठी पुनर्लागवडीनंतर २० आणि ४० दिवसांच्या अंतराने दोन वेळी खुरपणी करण्यात आली. अन्नद्रव्य व्यवस्थापन ः एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश ७५:३८:३० किलो प्रति हेक्टर अधिक पोल्ट्री खत २.५ टन प्रति हेक्टर अधिक गांडूळ खत योग्य प्रमाणात चुन्यासह २ टन प्रति हेक्टर या प्रमाणात शिफारस करण्यात आली. संपूर्ण शिफारशीपैकी स्फुरद, पालाश यांचा संपूर्ण, तर नत्राची एक तृतीयांश मात्रा पुनर्लागवडीपूर्वी देण्यात आली. व्यवस्थित कुजलेल्या पोल्ट्री व गांडूळ खताचे मिश्रण मातीच्या वरील थरामध्ये मिसळून घेण्यात आले. उर्वरित नत्र मात्रा १५ ते २० दिवसांनी एकदा आणि ३० ते ३५ दिवसांनी विभागून देण्यात आली. सिंचनाची सुविधा ः १) सिंचनाची वेळीच पूर्तता करण्यासाठी शेतामध्ये एका बाजूला जलकुंड तयार करून घेण्यात आले. या जलकुंडाची क्षमता सुमारे २७ हजार लिटर इतकी असून, ऑक्टोबर ते जानेवारी या काळात संरक्षित सिंचनासाठी त्याचा वापर केला जातो. त्यातून गुरुत्वाकर्षणावर आधारित मिनी स्प्रिंकलरद्वारे पिकाला सिंचन करण्यात आले. २) स्क्रीन फिल्टरसारख्या योग्य गाळणयंत्रणेतून पाणी पुढे ३२ मि.मी. मेन लाइन, सबमेन आणि पुढे १६ मि.मी. लॅटरलपर्यंत पोहोचवण्यात आले. या १६ मि.मी. लॅटरलवर टी जोडाने मिनी स्प्रिंकलर १ ते १.५ मीटर उंचीच्या बांबूच्या काठ्यांवर बसवण्यात आले. मिनी स्प्रिंकलरची पाणी फेकण्याची क्षमता ५० लिटर प्रति तास इतकी आहे. ३) या पद्धतीने आठवड्यातून दोन वेळा ब्रोकोली पिकाला पाणी देण्यात आले. उत्पादन व अर्थशास्त्र ः १) या पद्धतीने संपूर्ण व्यवस्थापन केल्यामुळे प्रात्यक्षिक क्षेत्रामध्ये मोठ्या आकाराची ब्रोकोली आणि अधिक उत्पादन (२४३ क्विंटल प्रति हेक्टर) मिळाले. तुलनेसाठी पारंपरिक पद्धतीने केलेल्या क्षेत्रामध्ये केवळ १६४ क्विंटल प्रति हेक्टर इतकेच उत्पादन मिळाले. २) प्रात्यक्षिक क्षेत्रातील उत्पादन खर्च १,२१,५२५ रुपये प्रति हेक्टर, स्थानिक पारंपरिक क्षेत्रामध्ये ९६००० रुपये प्रति हेक्टर होता. पिकाच्या विक्रीतून अनुक्रमे ५, ५८,८७५ रुपये प्रति हेक्टर आणि ३,२४,५५० रुपये प्रति हेक्टर इतका निव्वळ नफा मिळाला. ३) उत्पादन व उत्पन्नातील फरक स्पष्ट असल्यामुळे पीक प्रात्यक्षिकामध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांसोबतच आजूबाजूच्या गावातील सुमारे ६४ शेतकरी आता आधुनिक पद्धतीने ब्रोकोली लागवड करू लागले आहेत. (स्रोत ः कृषी विज्ञान केंद्र, मध्यवर्ती कृषी विद्यापीठ, ऐझवल, मिझोराम)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT