Pune News : राज्यात यंदाचा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्या फळबागांची उभारणी करण्याबरोबरच आंबा, संत्रा, मोसंबीच्या जुन्या बागांच्या पुनरुज्जीवनासाठीही अनुदान दिले जाणार आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी राज्यभर कार्यक्रम राबविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
फळबागांमधील उत्पादन आणि उत्पादकता वाढविणे अशी दोन्ही उद्दिष्टे या कार्यक्रमात ठेवण्यात आली आहेत. त्यासाठी देशी व विदेशी फळे, फुले, मसाला पिकांच्या लागवडीसाठी अनुदान मागणी अर्ज ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विदेशी फळलागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे ड्रॅगनफ्रूटसाठी प्रतिहेक्टरी चार लाख रुपये खर्च केल्यास १.६० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तयारी शासनाने ठेवली आहे.
अॅव्हॅकॅडोच्या बागेसाठी एक लाख रुपये लागवड खर्च केल्यास कृषी खात्याकडून ४० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. स्ट्रॉबेरी लागवडीसाठीदेखील शेतकरी प्रतिहेक्टरी २.८० लाख रुपये खर्च करू शकतात. या खर्चावर १.१२ लाखापर्यंत अनुदान मिळेल.
राज्यात मसाला पिकांच्या लागवडीलाही चालना दिली जात आहे. त्यासाठी बियावर्गीय मसाला पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्याने प्रतिहेक्टरी ३० हजार रुपये खर्च केल्यास १२ हजार रुपये अनुदान मिळू शकेल. बहुवार्षिक मसाला पीक लागवडीसाठी ५० हजार रुपये खर्च केल्यास शेतकऱ्याला ४० टक्क्यांपर्यंत म्हणजेच २० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळेल.
‘महाडीबीटी’वर करा अर्ज
नव्या फळबागेसाठी किंवा फुलशेती तसेच जुन्या बागांच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यांना अनुदान हवे असल्यास mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल. योजनेतील कोणत्याही अटी किंवा मुद्द्याबाबत शंका असल्यास शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन फलोत्पादन विभागाने केले आहे.
“नव्या फळबागांसाठी राज्यात अनुदान उपलब्ध आहे; मात्र जुन्या बागेच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्याने प्रतिहेक्टरी ४० हजार रुपयांपर्यंत केलेला खर्च अनुदानपात्र आहे. त्याला खर्चाच्या ५० टक्के म्हणजे २० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकेल.”- डॉ. कैलास मोते, कृषी संचालक, फलोत्पादन विभाग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.