Biochar  Agrowon
संपादकीय

Biochar Production : ‘बायोचार’चा करा झपाट्याने प्रचार

विजय सुकळकर

Indian Agriculture : शेती अनेक कारणांनी तोट्याची ठरण्याबरोबर शेतीमध्ये सध्या दोन प्रमुख समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत. एक म्हणजे गहू, भात, कापूस आदी पिकांच्या काढणीनंतर अवशेषांची विल्हेवाट लावणे हे बहुतांश शेतकऱ्यांसाठी कष्टदायक आणि खर्चिक काम ठरत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना या राज्यांत गहू तसेच भात काढणीनंतर पिकांचे अवशेष जाळल्यामुळे दिल्लीसह पूर्ण उत्तर भारतात प्रदूषण वाढते.

धूर, धुके यांचे हवेतील प्रमाण एकदाच वाढल्याने लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. महाराष्ट्रासह इतरही राज्यांत कापूस वेचणीनंतर पऱ्हाट्यांची विल्हेवाट लावणे, हे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीच असते. एकतर पऱ्हाट्या उपटून जमा करून इंधन म्हणून वापरतात, नाहीतर जमा केलेल्या पऱ्हाट्या शेतातच जाळून टाकल्या जातात.

यामुळे देखील प्रदूषण वाढतेच. शेतीची दुसरी प्रमुख समस्या म्हणजे रासायनिक खतांचा अतिवापर, त्या तुलनेत सेंद्रिय-जैविक खतांचा अत्यंत कमी वापर आणि एकाच शेतात एकानंतर एक अशी पिके घेतली जात असल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटत आहे.

मातीची सुपीकता टिकवून ठेवण्याबरोबर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे ही काळाची गरज आहे. अशावेळी कापसाच्या पऱ्हाट्यापासून बायोचार निर्मितीचे तंत्र नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने तयार केले आहे. या तंत्राने पऱ्हाट्यापासून बायोचार केल्यास ते अन्य सेंद्रिय खतांबरोबर शेतात वापरल्यास सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.२ टक्क्यांवरून ०.७५ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा निष्कर्ष या संस्थेने प्रयोगाअंती काढला आहे.

बायोचार करण्यासाठी पऱ्हाट्या जाळण्याच्या या तंत्राने वातावरणात प्रदूषण होत नाही. अर्थात बायोचार करून शेतकरी पऱ्हाट्यांची योग्य विल्हेवाट (प्रदुषणमुक्त) लावण्याबरोबर आपल्या शेतात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवू शकतात. त्यामुळे मातीची सुपीकता वाढण्यास हातभार लागेल.

अतिशय सोपे सर्वसामान्य शेतकऱ्यांना वापरता येणाऱ्या या तंत्राचा प्रसार प्रचार देशभरातील कापूस उत्पादकांमध्ये झाला पाहिजे. नागपूरच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तर या खरीप हंगामापासूनच जिल्ह्यातील प्रत्येक गावात बायोचार निर्मिती आणि वापराविषयीची मोहीम हाती घेतली ते बरेच झाले. नागपूरसह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात हे तंत्र झपाट्याने पोहोचायला हवे.

कृषी विभागाने बायोचार निर्मिती आणि वापराबाबत तोंडी मार्गदर्शन करण्याऐवजी गावोगाव प्रात्यक्षिकांवर भर द्यायला हवा. प्रात्यक्षिकानंतर बहुतांश कापूस उत्पादक हे तंत्र लवकरच वापरायला सुरुवात करतील, यासाठी पाठपुरावा देखील करायला हवा. एक एकर कपाशी क्षेत्रातून १ टन पऱ्हाटी आणि एक टन पऱ्हाटीपासून ३०० किलो बायोचार मिळतो.

महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ४५ लाख हेक्टरवर तर देशभर १२५ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. यावरून बायोचार निर्मितीत किती मोठी संधी आहे, याचा विचार व्हायला हवा. खरेतर शेतकऱ्यांनीच आपल्या शेतावर बायोचार निर्मिती करून त्याचा वापर वाढवायला पाहिजेत. परंतु ग्रामीण भागातील युवकांनी पऱ्हाट्यापासून बायोचार निर्मिती आणि विक्री केली तर त्यांना चांगला रोजगारही मिळू शकतो.

महत्त्वाचे म्हणजे स्वस्त, सोपे आणि पर्यावरणास पूरक पऱ्हाट्यांची विल्हेवाट लावून त्यापासून कांडीकोळसा, बायोब्रिकेट्स असे पर्यायी इंधन तसेच बायोडायनामिक कंपोस्ट, श्रेडरद्वारे तुकडे करून अथवा ट्रॅक्टरचलित कुट्टी यंत्राद्वारे भूसा करून तो शेतातच कुजविण्याचे तंत्र यापूर्वीही आलेले आहेत. परंतु त्याचा म्हणावा तसा प्रसार-प्रचार शेतकऱ्यांमध्ये झालेला नाही. तसे बायोचारचे होणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT