Indian Agriculture Agrowon
संपादकीय

Soybean Market: पाडवा, बलिप्रतिपदा आणि सोयाबीन

Soybean Rate : पाडव्याच्या दिवशी बळिराजाचे स्मरण करत असताना शेतकऱ्यांनी बाजारव्यवस्था आपले कसे शोषण करते हे ओळखून तो डाव उधळून लावण्याचा निर्धार करणे औचित्यपूर्ण ठरेल.

Ramesh Jadhav

Indian Agriculture : आज बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. दिवाळी हा सण कृषी संस्कृतीशी निगडित आहे. पाडव्याला बळिराजाची पुजा केली जाते. ‘इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो' अशी कामना केली जाते. बळिराजा हा शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा राजा म्हणून ओळखला जातो. त्याचे आणि त्याच्या प्रजाहितदक्ष कारभाराचे, सुराज्याचे स्मरण या सणाच्या निमित्ताने केले जाते.

याच दिवशी गोवर्धनाचीही पुजा केली जाते. शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा, फुले खोचतात; कृष्ण, गोपी, गायी, वासरे यांची चित्रे काढून पुजा केली जाते. शेतकऱ्यांचा, गायीगुरांचा, बळीच्या स्मरणाचा हा पाडव्याचा दिवस गावगाड्यात पिढ्यानपिढ्या साजरा केला जातो.

यंदा मात्र दिवाळसणावर दुष्काळाचे सावट आहे. एकीकडे रब्बीच्या पेरण्यांची चिंता सतावत असताना काढणी झालेल्या खरिपाच्या पिकांना भाव मिळेल की नाही, ही काळजी शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. अलीकडच्या काळात राज्यातील बहुतांश भागात दिवाळी सणाचा सगळा आनंद सोयाबीन पिकावर अवलंबून असल्याचे दिसून येते.

सोयाबीनला चांगला भाव असेल तरच या भागातल्या सर्व वस्तुंच्या बाजारपेठा फुलून जातात. सोयाबीनने मान टाकली की बाजारपेठा आक्रसून जातात. शेतकऱ्यांच्या क्रयशक्तीवरच सगळी उलाढाल अवलंबून आहे.

यंदा राज्यात आणि देशात सोयाबीनचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. परंतु केंद्र सरकारने पामतेल व सोयातेलाची बेसुमार आयात केल्यामुळे खाद्यतेलाचे भाव पडले आणि त्याचा थेट फटका सोयाबीनला बसला. काढणी हंगामाच्या सुरूवातीलाच सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा खाली राहिले.

सोयाबीन प्रति क्विंटल साडे चार हजार रूपयांची पातळी ओलांडायला तयार नव्हते. गेल्या वर्षी भाववाढीच्या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना अखेर तोट्यात माल विकावा लागला. त्यामुळे भ्रमनिरास झालेल्या शेतकऱ्यांनी यंदा मिळेल त्या भावात सोयाबीन विकणे सुरू केले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे फावले. वास्तविक सोयाबीनच्या मागणी-पुरवठ्याचे मुलभूत घटक (फंडामेन्टल्स) आगामी काळात भाव वाढण्याचे स्पष्ट संकेत देत आहेत.

ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी सोयाबीन सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज असल्यामुळे बाजारभाव दबावात होते. परंतु तिथे पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन उत्पादनावर परिणाम होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनने उसळी घेतली असून भाव गेल्या दोन महिन्यांतील उच्चांकी पातळीवर आहेत. त्यामुळे सोयापेंड दरही वधारले.

अमेरिकेत सोयापेंड महागल्यामुळे भारताच्या सोयापेंडला मोठी मागणी आली आहे. पुढील तीन महिन्यांच्या काळात सोयापेंड निर्यातीला चांगला उठाव मिळण्याचा अंदाज आहे. सोयापेंडला देशांतर्गत पोल्ट्री उद्योगाकडूनही मोठी मागणी आहे. त्यामुळे सोयातेल दबावात असले तरी सोयापेंडचा बाजार तेजीत असल्यामुळे त्याचा भक्कम आधार सोयाबीनला मिळू शकतो.

थोडक्यात काय तर सोयाबीनबद्दलच्या बाजारगप्पा तथ्यहीन आहेत. सोयाबीनचे दर वर्षभर दबावात राहतील, आताच सोयाबीन विकले नाही तर पुढील काळात आणखी तोटा सहन करावा लागेल अशी धारणा काही घटक बाजारात निर्माण करत आहेत. त्याला बळी पडून अनेक शेतकरी ‘पॅनिक सेलिंग' करत आहेत. वास्तविक जागतिक व देशांतर्गत बाजाराची स्थिती पाहता सोयाबीन हमीभावापेक्षा खाली राहणार नाही.

पण दोन वर्षांपूर्वीसारखी खूप मोठी तेजीही येणार नाही. सोयाबीनचे भाव आगामी काळात साडे पाच हजाराचा टप्पा गाठतील, असे बाजारविश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारावर नजर ठेवत टप्प्याटप्प्याने माल विकणे फायदेशीर ठरेल. आजच्या दिवशी बळिराजाचे स्मरण करत असताना शेतकऱ्यांनी बाजारव्यवस्था आपले कसे शोषण करते हे ओळखून तो डाव उधळून लावण्याचा निर्धार करणे औचित्यपूर्ण ठरेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT