Mango Man
Mango Man Agrowon
संपादकीय

Mango Man : कलीमउल्लाची कलमीकरणाची कला

डॉ. नागेश टेकाळे

शेतकऱ्‍यांच्या एका संवाद बैठकीत तेथील प्रतिनिधींनी मला ‘अॅग्रोवन’मधील माझ्या विविध लेखांचा संदर्भ देत शेतकऱ्‍यांसाठी प्रेरणा देणारी एखादी तरी नावीन्यपूर्ण सत्य घटना सांगण्याचा आग्रह धरला. शेतकऱ्यांचे मन मी सहसा कधीच मोडत नाही, हे प्रतिनिधींना माहीत होतेच आणि ही आम्रवृक्षाची गोष्ट सांगताना माझा अर्धा तास कधी संपला कुणालाच कळले नाही.

Old man and his Mango Tree ही सत्य घटना आजही आपण उत्तर प्रदेशामधील लखनौजवळ असलेल्या मलिहाबाद या मोठ्या गावात पाहू शकतो. जेमतेम वीस हजार लोकसंख्या असलेले हे गाव आम्रवृक्षराजीसाठी प्रसिद्ध आहे. या गावात हजारो आंब्याची झाडे (Mango Tree) आहेत. उत्तर प्रदेशमधील १३ टक्के आंबा उत्पादन (Mango Production) एकट्या या गावात होते. यांवरून मलिहाबादची श्रीमंती कळावी. देशामधून निर्यात होणारा दशेरी आंबा (Dasheri Mango) याच गावामधून जातो.

त्याचबरोबर चौसा, लंगडा, सफेदा अशा कितीतरी आंब्याच्या मधुर जाती या गावाला जोडल्या गेल्या आहेत. पण या गावाच्या यशाचे उच्च शिखर आहे ते येथील १२० वर्षांचे एक सर्वांत जुने आंब्याचे झाड आणि या मातृवृक्षावर तब्बल ३०० विविध आंब्यांची कलमे करणारे कलीमउल्ला खान. तब्बल ८२ वर्षे वय असलेल्या या वृद्धाची या वृक्षाबरोबरच्या दाट प्रेमळ मैत्रीस नुकतेच ५० वर्षे पूर्ण झाली. एकच आम्रवृक्ष ३०० प्रकारांचे विविध चवींचे, आकारांचे, त्याचबरोबर आगळ्यावेगळ्या सुवासांची फळे देतो हे जगामधील फलोद्यान क्षेत्रामधील एकमेव आश्‍चर्य निर्माण करून या जेमतेम सातवीपर्यंत शिकलेल्या शेतकऱ्‍याने विश्‍वामधील सर्व उच्चशिक्षित कृषी शास्त्रज्ञांना चकित केले आहे.

मलिहाबाद गावाच्या जवळच भारत सरकारची Central Institute of subtropical Horticulture ही संशोधन संस्था आहे. १९७० मध्ये तिचे Mangao Research Institute असे नामांतर झाले. या संस्थेच्या परिसरातच एका प्रयोगशील शेतकऱ्‍याने केलेल्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाबद्दल या संस्थेला माहीतही नव्हते आणि जेव्हा कळले तेव्हा असे शक्यच नाही, ही सर्व संकरित वाणे आहेत, असे म्हणून त्यांची उपेक्षा पण झाली. परंतु नंतर शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष भेट देऊन याची खात्रीच केली. डॉ. नीलिमा गर्ग ज्या या संशोधन संस्थेच्या संचालक आहेत म्हणतात, ‘‘कलीमउल्ला जे करत आहेत ती एक जिवंत कला आहे.’’ खरंच किती सत्य आहे हे? एका ओबडधोबड पाषाणाची जेव्हा एक देखणी मूर्ती होते, तिला वेगवेगळे अवयव कोरले जातात तेव्हा श्रेय शिल्पकारास तर जातेच, पण त्यापेक्षा जास्त त्या पाषाणास जाते. येथेही नेमके हेच घडले आणि म्हणूनच ‘न्यू यार्क टाइम्स’ या जगविख्यात वृत्तपत्राच्या प्रतिनिधी सौम्या खंडेलवाल यांना ही जगावेगळी यशोगाथा याच जुलै महिन्यात जगाच्या पुढे मांडावी वाटली यात आश्‍चर्य ते काय?

डॉ. नार्मन बोरलॉग हरित क्रांतीचे सर्व श्रेय शास्त्रज्ञाबरोबरच त्यांच्या प्रयोग शाळेमधील प्रयोगास शेतामध्ये रूपांतरित करणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांना देतात. ते म्हणतात, ‘‘मी भारताच्या प्रेमात पडलो ते येथील शेतकऱ्‍यांच्या प्रयोगशील वृत्तीमुळे!’’ कलीमउल्ला भाईंनी त्यांच्या पणजोबांनी सांभाळलेल्या या मातृवृक्षावर केलेली सर्व कलमे आज याचीच साक्ष

देतात. देशामधील राजकीय, सामाजिक, खेळ, कला, विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींची कलमांना नावे देऊन कलीमउल्ला यांनी त्यांचे काम आम्रवृक्षावर जिवंत ठेवले आहे. २०१४ चे नमो कलम, सचिन कलम, ऐश्‍वर्या रॉय, अनारकली, अखिलेश यादव, अमित शहा, योगी आदित्यनाथ, अब्दुल कलाम, सोनिया गांधी कलन अशी किती तरी नावे या कलमांची आहेत. आता तर त्यांना ती आठवत सुद्धा नाहीत.

अनारकली आंबा कलमाबद्दल कलीमभाई म्हणतात, ‘‘या आंब्यास दोन बाजूंस दोन वेगवेगळ्या चवी आहेत. या मातृवृक्षाला मी कलम करण्यासाठी चाकूने ३०० जखमा केल्या, त्याला यातना झाल्या, पण त्या भोगूनही त्याने ३०० प्रकारची गोड फळे मला दिली. म्हणून आजही या वयात मी या वृक्षाजवळ जाऊन त्याच्या प्रत्येक जखमेस प्रेमाने स्पर्श करतो, मायेची ऊब देतो.’’ ते पुढे म्हणतात, ‘‘माझे वडील अब्दुल यांना ११ मुले, त्यांपैकी मी एक. गावामधील आंब्याची बाग हेच आमचे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन. सातवीला मी दोन वेळा नापास झालो, वडिलांनी बदडून माझी शाळा बंद करून मला २०० मैल दूर आजीकडे पाठवले. १७ दिवस माराच्या भीतीने मी तेथेच राहिलो. नंतर मलिहाबादला परत आलो आणि घराचा उंबरा ओलांडताच वडिलांनी डोक्यावर आंब्याची पेटी दिली.’’

कलीम भाई म्हणतात, ‘‘हे आंब्याचे झाड म्हणजे माझी ओळख. आज देशविदेशात लोक मला ओळखतात ते याच आम्रवृक्षामुळे. आता वयोमानानुसार मी बागेत जास्त काम करत नाही. मात्र घरात बसण्यापेक्षा याच झाडाखाली खाटेवर बसलेला असतो. आता मुलाने बाहेर घर घेतले आहे. पण माझी खोली अशी आहे जेथून मला माझ्या या प्रिय आम्रमित्राची दिवसामधून कितीतरी वेळा नजर भेट होते.’’ २००८ मध्ये पद्मश्री गौरव प्राप्त झालेले कलीमभाई राष्ट्रपती भवनामध्ये त्यांच्या एका आंब्याच्या कलमास कसे स्थान मिळाले हे आजही आठवणीने सांगतात. त्यांची आम्रवृक्ष कीर्ती राष्ट्रपतींपर्यंत पोहोचली आणि त्यांना राष्ट्रपती भवनाच्या पाठीमागे ट्युलिप आणि गुलाब फुलांच्या सुगंधासह मलिहाबादचा आम्र सुगंध दरवळण्यासाठी विनंती करण्यात आली.

कलीमभाईनी लगेच कामास सुरुवात केली आणि ५४ कलमे केलेला आम्रवृक्ष निर्माण केला. परंतु दिल्लीस राष्ट्रपती भवनापर्यंत तो नेणार कसा, हा प्रश्‍न उभा राहिला. ते म्हणतात, ‘‘तीन दिवस मला झोपच आली नाही. शेवटी आई बाळाला दूध पाजवत झोपी घालते, हळूच बाटली ओठामधून काढून घेते, बाळास ते कळतही नाही अशा पद्धतीने त्या वृक्षाला मी ऑगस्ट १९९९ मध्ये दिल्लीला नेले. त्या वेळी के. आर. नारायणन राष्ट्रपती होते. आम्रवृक्ष तेथे स्थिर झाला आणि मधूर फळेही देऊ लागला. फळांची चव घेताना राष्ट्रपती आपल्या पत्नीस म्हणाले, ‘‘कलीमभाई थोर शास्त्रज्ञ आहेत, पण शिक्षण नसलेले!’’ उत्तरादाखल भाई म्हणाले, ‘‘मी शास्त्रज्ञ नाही मी या वृक्षाचा खरा सेवेकरी म्हणजे नोकर आहे.’’

स्वतःच्या शवपेटीसाठी आम्रवृक्षाच्याच फळ्या आतापासून स्वहस्ते तयार करणारा हा वृद्ध त्याचा दफनविधी त्या आम्रवृक्षाजवळ करावा अशी आपल्या पुत्रास विनवणी करतो आणि आवर्जून प्रार्थना करतो, की ‘पुढचा जन्म मला आम्रवृक्षाचाच मिळो.’ विज्ञान सांगते की जे लोक वृक्ष सहवासात राहतात, त्यांना माया, प्रेम देतात, त्यांच्याशी बोलतात ते वृक्षाप्रमाणे दीर्घायू होतात. हा वृक्षसंत त्या आम्रवृक्षाप्रमाणेच दीर्घायू होवो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना!

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT