Pomegranate Agrowon
संपादकीय

Pomegranate Farming : डॉलर अर्नरच्या दबदब्यासाठी...

Pomegranate Export : आपल्या राज्यातून डाळिंब निर्यातवृद्धीसाठी बागेच्या नोंदणीपासून ते ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादन घेण्यापर्यंत उत्पादकांमध्ये प्रबोधन वाढवावे लागेल.

विजय सुकळकर

Crop Management : महाराष्ट्र राज्यातून गेल्या नऊ महिन्यांत २२ हजार टनांहून अधिक डाळिंबाची निर्यात झाली आहे. देशाच्या तुलनेत हे डाळिंब निर्यातीचे प्रमाण ७८ टक्के आहे. डाळिंबाला सध्या दरही चांगला मिळत आहे. असे असले तरी या वर्षी निर्यातीसाठी झालेल्या बागांच्या नोंदणीच्या तुलनेत झालेली निर्यात कमीच आहे. जागतिक बाजारातही आपला डाळिंब वाटा नगण्यच आहे.

सध्या मिळत असलेला चांगला दर हा हंगाम संपत आला असतानाचा आहे. मृग बहर, लेट मृग बहरांची फळे आता संपत आली आहेत. हा चांगला दरही दर्जेदार फळांना (ज्याचे उत्पादन फार कमी असते) मिळत आहे. त्यामुळे मागील दोन-तीन बहरांच्या डाळिंबांना सरासरी प्रतिकिलो १०० रुपयांच्या आतच दर मिळाला आहे. कोरोना महामारीच्या आधीपासूनच डाळिंबाला अपेक्षित दर मिळत नाही.

आता तर गुजरात, राजस्थान या राज्यांमधून डाळिंबाची आवक देशांतर्गत बाजारात वाढत असल्याने दर दबावात राहत आहेत. कोरोना काळात डाळिंब निर्यातीचा विस्कळीत झालेला गाडा अजूनही रुळावर आलेला नाही. त्यात मागील दशकभरापासून नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. सततचे ढगाळ वातावरण, पावसाळ्यानंतरही अधूनमधून पडणारा पाऊस, गारपीट यामुळे डाळिंबाचे नुकसान वाढले आहे.

प्रतिकूल अशा हवामानामुळे बहर सेटिंग मध्ये अडचणी येत आहेत. फुलधारणा झाली तर गळी गळ वाढली आहे. त्यानंतर पीन होल बोरर, शॉट होल बोररचा प्रादुर्भाव वाढला आहे. तेलकट डाग, करपा, मर रोगाचा प्रादुर्भाव तर आधीपासून आहेच. या रोगांवर प्रभावी उपाय उत्पादकांना अजूनही मिळत नाहीत. परिणामी, उत्पादकांना कीडनाशकांच्या अधिक फवारण्या घ्याव्या लागतात. त्यामुळे निर्यातीसाठी ‘रेसिड्यू फ्री’ डाळिंब उत्पादन घेण्यात उत्पादकांना अडचणी येत आहेत.

राज्याच्या दुष्काळी पट्ट्यात डाळिंब हे फळपीक चांगले रुजले. अत्यंत कमी पाण्यात काटेकोर व्यवस्थापनातून शेतकरी डाळिंबाचे चांगले उत्पादन घेऊ लागले. डाळिंबाला देशांतर्गत बाजार आणि निर्यातीतही चांगला दर मिळत असल्याने त्याचा उल्लेख ‘डॉलर अर्नर’ म्हणून होऊ लागला. मागील दोन दशकांपासून डाळिंब हे जागतिक बाजारासाठीचे पीक म्हणून पुढे आले आहे.

डाळिंबाची अनेक आरोग्यदायी गुणवैशिष्ट्ये संशोधनातून समोर आली असल्याने त्यास देशांतर्गत बाजार तसेच निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. अशा डाळिंबाला अडचणी, आव्हानांच्या गर्तेतून बाहेर काढवेच लागणार आहे. डाळिंबाचे प्रतिएकर उत्पादन आणि त्यात दर्जेदार फळांचे प्रमाण वाढवावे लागेल. त्यासाठी जागतिक दर्जाची वाणं उत्पादकांना द्यावी लागतील.

एकाच बागेत डाळिंबाची एकसारखी फळे मिळत नाहीत, त्यामुळे एकसमान दरही मिळत नाही. अशावेळी एकसारख्या गुणवत्तापूर्ण फळ उत्पादनासाठी संशोधकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे. बदलत्या हवामानानुसार मृग, हस्त, आंबे या तिन्ही बहरात प्रचलित व्यवस्थापनात काय बदल करायचे हे संशोधकांनी शेतकऱ्यांना सांगायला हवे.

कीड आणि रोग मग तो कोणताही असो त्याचे निर्यातीसाठीच्या नियोजित फवारण्यांमध्ये (‘रेसिड्यू फ्री’साठी) प्रभावी नियंत्रणात्मक उपाय शेतकऱ्यांना द्यायला हवे. आपल्या राज्यात डाळिंब निर्यातीसाठी नोंदणीपासून ते रेसिड्यू फ्री उत्पादन घेण्यापर्यंत उत्पादकांमध्ये प्रबोधन वाढवावे लागेल. अमेरिकेने डाळिंब हे फळपीक केंद्रस्थानी ठेवून ‘पोमोवंडर’ ब्रॅण्ड विकसित केला. त्यांनी या ब्रॅण्डखाली केवळ उत्पादनच वाढविले नाही, तर ताज्या फळांच्या

विक्रीबरोबर डाळिंब फ्रेश दाणे, ज्यूस, सालीपासून होणारे वेगवेगळी कॉस्मेटिक्सची उत्पादने अशी मूल्यसाखळी विकसित करून डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत पोहोचवले. आपल्या राज्यात, देशात अशाप्रकारे डाळिंबाची संपूर्ण मूल्यसाखळी विकासावर काम व्हायला हवे. देशांतर्गत बाजारातही डाळिंबाचा खप वाढवून सुलभ विक्री व दर चांगला मिळण्यासाठी ‘इंटिग्रेटेड मार्केट’ उत्पादकांच्या पातळीवर उभे करता येईल का, यावरही विचार झाला पाहिजे. असे झाले तरच ‘डॉलर अर्नर’चा दबदबा जागतिक बाजारपेठेत वाढेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2026 : केंद्र सरकारने रब्बीचे हमीभाव केले जाहीर; हरभऱ्याच्या हमीभावात २२५ तर करडईच्या हमीभावात ६०० रुपयांची वाढ

Amravati Farmers: अमरावतीत शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Nanded Flood Rescue: एसडीआरएफकडून २१ पूरपीडितांचा बचाव 

DA Hike : दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मोठी भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, जाणून घ्या किती वाढला पगार?

Cotton Farmers: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा 

SCROLL FOR NEXT