sampadkiya
sampadkiya 
संपादकीय

असह्य चटके व्हावेत सुसह्य

विजय सुकळकर
मागील वर्ष हे चांगल्या पावसाचे, परंतु तेवढ्याच असमान वितरणाचे ठरले. आपल्या राज्यासह देशभरातील बहुतांश जलसाठे पावसाच्या पाण्याने बऱ्यापैकी भरले. परंतु जानेवारी २०१८ पासूनच राज्याला दुष्काळाची चाहूल लागण्यास सुरवात झाली. जलस्राेतांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. अनेक गावांतील पैसेवारीही ५० पैशापेक्षा कमी आली. फेब्रुवारी, मार्चपासून अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. अशा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा चालू आहे. अशा वातावरणातच मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत सामान्य तापमानात एक अंश सेल्शिअसपेक्षा अधिक वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तापमानवाढीने हा काळ सर्वाधिक उष्ण असल्याचे संकेतही मिळत आहेत. उष्ण लाटांनी शेती, ऊर्जा आणि मानवी आरोग्य या तिन्हींवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतील, असा इशाराही मिळाला आहे. संभाव्य तापमानवाढ ही ग्लोबल वॉर्मिंगचे लक्षण असल्याचेही काही तज्ज्ञ स्पष्ट करतात. खरे तर १७५० नंतरच्या औद्योगिक क्रांतीपासून पृथ्वीभोवतीच्या तापमानात वाढ होत आहे. १९०६ ते २००५ या १०० वर्षात जागतिक सरासरी तापमान ०.७४ सेल्सिअसने वाढल्याचे दिसून आले आहे. २० व्या शतकाच्या मध्यापासून झालेली जास्तीत जास्त तापमानवाढ ही मानवनिर्मित हरितगृह वायूच्या वाढीमुळे झाल्याचे आढळते. तापमानवाढीचा हा इतिहास पाहता याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल. तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून ‘जलयुक्त’ने साठलेले पाणी आटलेले तर दिसेलच, परंतु मोठी धरणेही कोरडी पडतील. जमीन (भूगर्भ साठे) आणि पानांमधून होणाऱ्या बाष्पीभवनात वाढ होईल. त्यामुळे या काळात शेतीत असलेली उन्हाळी पिके करपतील, फळबागा वाळतील. जनावरे-पशुपक्ष्यांना पाणी मिळणार नाही. टंचाईच्या क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी माणसांना दाही दिशा भटकंती करावी लागेल. दुष्काळग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणे शासनालाही जिकिरीचे ठरेल. अत्यंत गंभीर बाब म्हणजे अतिउष्ण वर्षात कष्टकरी शेतकरी-शेतमजूर उष्माघाताचे बळी ठरतील. अशावेळी हवामान विभागाचा इशारा गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांसह इतरांनाही बसणारे चटके कमी करण्यावर शासनाला भर द्यावा लागेल. तीव्र पाणीटंचाईच्या काळात हंगामी पिके, फळबागा कशा वाचवायच्या याचे व्यवस्थापन तंत्र शेतकऱ्यांना त्वरीत मिळायला हवे. जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याचेही पुढील तीन-चार महिन्याचे नियोजन हवे. जनावरांच्या बाबतीत मागील दुष्काळातील अत्यंत वाईट अनुभव शेतकरी आणि शासनाच्या गाठीशी आहेत. तसे जनावरांचे हाल या उन्हाळ्यात होणार नाहीत, याची काळजी दोघांनीही घ्यायला हवी. दुष्काळी पट्ट्यातील सर्व गावांत आत्तापासूनच पाण्याची मोजदाद करून त्यांना जूनपर्यंत पिण्याचे पाणी कसे पुरेल अथवा कुठून उपलब्ध करता येईल, याचा विचार होऊन त्यावर त्वरीत काम सुरू करावे लागेल. गावच्या वॉटर बजेटचे हे काम गावपातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांनी लोकांच्या सहभागातून शक्य तेवढ्या लवकर सुरु करायला हवे. जागतिक तापमानवाढीवर मात करायची असेल तर कार्बन उत्सर्जन कमी करावे लागेल. तसेच शक्य असेल तिथे वृक्षलागवड करून त्यांची जोपासना करावी लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT