संपादकीय
संपादकीय 
संपादकीय

‘इथिलिन’ने पिकवा आंबा

विजय सुकळकर

आं ब्याचा हंगाम सुरू होऊन महिना झाला आहे. आंबे पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून आरोग्यास घातक कॅल्शियम कार्बाईडचा वाढत असलेला वापर पाहता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) इथेपॉनला नुकतीच परवानगी दिली आहे. इथेपॉन हे वनस्पती वाढ नियंत्रणक असून कॅल्शियम कार्बाईडच्या तुलनेत कमी विषारी आहे. असे असले तरी फळे पिकविताना इथेपॉनचा थेट फळांशी संपर्क आल्यास मानवी आरोग्यास घातकच ठरू शकते. त्यामुळे फळे पिकविताना इथेपॉनचा थेट फळांशी संपर्क येऊ देऊ नये, असा इशारा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्याचबरोबर फळे नैसर्गिकरित्या पिकविण्यास प्राधान्य द्यावे, अशी व्यापाऱ्यांना सूचनाही केली आहे.

खरे तर आंबा, केळी, पपई, चिकू आदी फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केल्यास कारवाई करू, असा इशारा एफडीएकडून व्यापाऱ्यांना सातत्याने दिला जातो. ‘फूड सेफ्टी ॲंड स्टॅंडर्ड ॲक्ट’नुसार फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडवर बंदीही आहे. असे असताना हे घातक रसायन फळे पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांना उपलब्ध होतेच कसे? हा खरा प्रश्न आहे. काही ठिकाणी कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेली फळे जप्त केल्याच्या बातम्या येतात. व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाल्याचे मात्र फारसे कुठे ऐकिवात नाही. कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेल्या फळांना नैसर्गिक स्वाद लाभत नाही. अशी फळे खाण्यात आली तर उलट्या, मळमळीपासून कॅन्सरपर्यंतच्या आजाराचा धोका आहे. त्यामुळे फळे पिकविण्यासाठी हे घातक रसायन व्यापाऱ्यांना उपलब्धच होता कामा नये. महत्त्वाचे म्हणजे आंबा पिकविण्यासाठी इथेपॉनला परवानगी दिली असताना त्याचा वापर एफडीएने घालून दिलेल्या नियम निकषांप्रमाणेच होईल, याची काळजीही घ्यावी लागेल.

नैसर्गिकरित्या पिकविलेल्या फळांचा रंग आणि स्वाद काही निराळाच असतो. मुख्य म्हणजे अशी फळे आरोग्यवर्धक असतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या पिकविलेलीच अधिकाधिक फळे ग्राहकांना उपलब्ध व्हायला हवीत. पूर्वी पक्व फळे काढणीनंतर बंद खोलीत भाताचे तणीस, गहू - भुईमुगाच्या काडात पिकविली जात. आंबा पिकविण्यासाठी टेंभरीसह स्थानिक उपलब्ध झाडपाला वापरला जात होता. अशा पद्धतीने फळे पिकविण्यास उशीर लागत असल्याने सध्याच्या बाजार स्पर्धेत व्यापाऱ्यांकडून या पद्धती बादच झाल्या आहेत. ग्रामीण भागात घरगुती वापरासाठीची फळे पिकविण्यासाठी मात्र या पद्धती अजूनही वापरल्या जातात.  

इथिलिन गॅसद्वारेसुद्धा फळे नैसर्गिकरित्या आणि कमी वेळात पिकविली जातात. इथिलिन वापरून फळे पिकविण्याच्या स्वस्त आणि सुरक्षित पद्धतीदेखील विकसित करण्यात आलेल्या आहेत. बाजारात लहान - मोठ्या व्यापाऱ्यांना उपयुक्त ठरतील, असे इथिलिन गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत. परंतु याबाबत अनेक व्यापाऱ्यांमध्ये प्रबोधनच झालेले दिसत नाही. कॅल्शियम कार्बाईडला बाजारातून पूर्णपणे हद्दपार केल्याशिवाय इथेपॉन असो की इथिलिन गॅस यांचा फळे पिकविण्यासाठी वापर वाढणार नाही, हेही खरे आहे. फळे पिकविण्यासाठी इथिलिन गॅस आधारित सुरक्षित रायपनिंग चेंबर्सची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बाजार समित्यांना पुढाकार घ्यायला हवा. फळांच्या व्यापारांवर दररोज चांगला पैसा कमविणाऱ्या व्यापाऱ्यांनी ५ ते १० टनापर्यंत इथिलिन गॅस चेंबर्स स्वखर्चाने उभारायला हवेत. शेतकऱ्यांचे गट, उत्पादक कंपन्या यांनीसुद्धा स्थानिक पातळीवर छोटे छोटे इथिलिन गॅस चेंबर्स उभारून नैसर्गिकरित्या पिकविलेली फळे अधिक दरात थेट ग्राहकांना विक्री करावीत. असे झाले तरच नैसर्गिक स्वादयुक्त आणि आरोग्यदायी फळांचा आनंद ग्राहकांना घेता येईल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT