agrowon editorial article 
संपादकीय

महानायकाची दूरदृष्टी

‘शेती संपन्न झाली तरच लोकशाही समृद्ध होईल, शेती मोडली तर लोकशाही मोडेल,’ हा विचार वसंतराव नाईक यांनी नाशिक येथे भरलेल्या काँग्रेसच्या शिबिरात १९७१ ला मांडला होता. हाच विचार आज ‘कोरोना’ने पुन्हा नव्याने जागविला आहे. मनरेगा ही रिकाम्या हाताला काम देणारी योजना राज्यात मूर्त स्वरुपात त्यांनीच आणली. कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्या हजारो मजुरांना या योजनेतून आज रोजगार मिळाला आहे. आज वसंतराव नाईक यांच्या ४१ व्या स्मृतीदिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन!

प्रा. दिनकर गुल्हाने

‘‘येत्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी जाहीर फाशी घेईल,’’ महाराष्ट्राचे धीरोदात्त मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे पुण्याच्या शनिवारवाड्या समोरील हे उद्‍गार आहेत. राज्यातील भयावह दुष्काळी परिस्थितीत अन्नाच्या कणास जनता मोताज झालेली असताना नाईक साहेबांनी जनतेत प्रचंड आशावाद जागवला. ग्रामीण भागात दुष्काळात झपाटल्यागत दौरे करून जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि कठीण काळात राज्याला धीर दिला. वसंतराव नाईक यांचे शनिवारवाड्याच्या सभेतील जाहीर फाशीचे वक्तव्य हे राजकीय नव्हते. अंतःकरणातील तळमळ व जनतेप्रती असलेली कळकळ या भीष्मप्रतिज्ञेत सामावलेली होती. दोनच वर्षाच्या कालावधीत संकरीत वाण व कृषी तंत्रज्ञानाच्या प्रयोगातून शेतकऱ्यांच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविले. किंबहुना, हरितक्रांतीच्या मंत्रातून त्यांनी एक तपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत राज्यासा सुजलाम-सुफलाम केले. अन्नधान्य उत्पादनातील अतिव टंचाई पाहिलेल्या महाराष्ट्रात आज धान्याची कोठारे भरलेली आहेत. ही वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टी व प्रचंड मेहनतीचे फलीत आहे.

पुरोगामी व सर्वार्थाने कृषी-उद्योगाने समृद्ध महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी वसंतराव नाईक यांनी साडे अकरा वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जिव्हाळ्याने केली. त्यांच्यावर विनोबा भावे यांच्या विचारांचा पगडा होता. ग्रामोद्धार हा राष्ट्र विकासाचा पाया असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांचे शेती आणि शेतकऱ्यांवर निस्सीम प्रेम होते. शेती ही अनेक उद्योगांची जननी आहे, हा त्यांचा प्रवाद आजच्या महामारीच्या कोरोना काळात खरा ठरला आहे. जिथे जगताची चक्रे बंद पडली, तिथे एका दाण्यापासून हजार दाणे निर्माण करण्याचे सामर्थ्य असलेला शेतीचा उद्योगधर्म मात्र चालूच होता. आज त्यांचे शेतीविषयक विचारांचे चिंतन तब्बल सहा दशकानंतरही चिरंतन आहेत, यातच त्यांच्या महानायकत्वाचे इंगित दडले आहे.

वसंतराव नाईक यांचे सृजनशील शेतीचे वैचारिक अधिष्ठान महाराष्ट्राला सदाकाळ मार्गदर्शक ठरले आहेत. त्यांनी चार कृषी विद्यापीठांची महाराष्ट्रात निर्मिती केली. शेतीविषयक तंत्रज्ञानातील उभारीने उत्पादकता वाढली आणि ''सरप्लस'' शेती उत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावर हमीभाव योजनेची उकल वसंतरावांनी दिलेली आहे. आत्ताच्या राज्यकर्त्यांनी त्यांचे विचारधन जोपासले तर आजच्या शेती विषयक प्रश्नांना नक्कीच उत्तर सापडेल. रिकाम्या हातांना काम देण्यासाठी त्यांनी रोजगार हमी योजना महाराष्ट्रात मूर्त स्वरूपात आणली. दूरदृष्टी असलेल्या या योजनेची उपयोगिता केंद्र सरकारने स्वीकारलेल्या ''मनरेगा''तून आज कोरोना संकटात पाहावयास मिळाली. कोरोनामुळे स्थलांतरित झालेल्या हजारो मजुरांना या योजनेतून आज रोजगार मिळाला आहे. वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टी, ध्येयधोरणे व वैचारिक बैठकीचा साक्षेपी पुरावा यापेक्षा आणखी कोणता हवा? ‘शेती संपन्न झाली तरच लोकशाही समृद्ध होईल, शेती मोडली तर लोकशाही मोडेल,'' शेतीविषयक विचारांची ही परखडता त्यांनी ७ जून १९७१ च्या नाशिक येथे भरलेल्या काँग्रेसच्या शिबिरात मांडली. हा विचार आज 'कोरोनाने पुन्हा नव्याने जागविला आहे.

कमाल जमीन धारणा कायदा, रोजगार हमी योजना, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत असे त्रिस्तरीय लोकशाही विकेंद्रीकरण, एकाधिकार कापूस खरेदी योजना, उद्योगधंद्यांच्या उभारणीला प्रोत्साहन, जलसमृद्धी साठी जायकवाडी, उजनी, अरुणावती, अप्पर वर्धा यासारखी महाकाय धरणे, नव्या मुंबईचे रचनाकार असे अनेक जनहितैषी निर्णय वसंतराव नाईक यांच्यातील दूरदृष्टीने अमलात आले. नवीन पिढी घडवण्यासाठी प्रगत शैक्षणिक धोरणाचे दालन त्यांनी उघडले. ते उमद्या मनाचे सुसंस्कृत नेते होते. विरोधकांचा सन्मान ते करत. हा त्यांचा 

गुण आजच्या राजकीय कार्यकर्त्यांनी अभ्यासून अंगीकारला पाहिजे. वसंतराव नाईक प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर जात. शेतातील भरघोस पीक पाहून त्यांना खूप आनंद होई. मग त्यांचा शाबासकीचा हात शेतकऱ्याच्या पाठीवरून फिरत असे. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठाने त्यांची ही  स्मृती आगळ्यावेगळ्या पद्धतीने जपली आहे. दरवर्षी १८ ऑगस्ट रोजी राज्यातील कर्तबगार व प्रयोगशील शेतकरी व शेती शास्त्रज्ञ यांचा सत्कार पुसद येथे करण्यात येतो. मात्र, यावर्षी या परंपरेला कोरोनामुळे खंड पडला आहे.  

प्रा. दिनकर गुल्हाने  ः ९८२२७६७४८९  (लेखक प्राध्यापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Fodder Cultivation Plan: पुणे जिल्ह्यात १० हजार १०० हेक्टरवर चारा लागवड; सध्याचा साठा फक्त तीन महिन्यांसाठी

Soybean Crop Damage: पाण्याअभावी सोयाबीन पीक करपले; खेड तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात

Farmer Financial Assistance: चार नोव्हेंबरपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत मिळणार

Mission Mausam: ‘मिशन मौसम’अंतर्गत हवामान निरीक्षणासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि कृषी विद्यापीठात करार

Agriculture Service Improvement: कृषी उद्योजकांच्या सेवा कार्यपद्धतीत सुधारणा; परवाने, तपासणी अहवालांचे वितरण जलद होणार

SCROLL FOR NEXT