agrowon editorial
agrowon editorial 
संपादकीय

ऑल इज नॉट वेल

विजय सुकळकर

अमेरिकेने ३ जानेवारीला बगदाद विमानतळावर घडवून आणलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च लष्करी कमांडर जनरल कासीम सुलेमानी ठार झाले. या घटनेने आखातात अमेरिकेविरुद्ध प्रचंड रोष वाढला आहे. इराणसह या प्रदेशातील अन्य मुक्त देश कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेतील, अशी तत्काळ प्रतिक्रिया इराणचे अध्यक्ष हसन रोहानी यांच्याकडून आली. कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी जैनब सुलेमानी यांनीसुद्धा अमेरिकेचे आता वाईट दिवस सुरू झाले आहेत, अशी एकप्रकारे धमकीच दिली. सुडाने पेटलेल्या इराणने ८ जानेवारीला इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात ८० अमेरिकी अधिकारी आणि जवान ठार झाल्याचा दावा इराणने केला.  अमेरिकेला त्यांच्या लष्कराची आणखी हानी होऊ नये असे वाटत असेल, तर त्यांनी आत्ताच माघार घ्यावी, असेही इराणने बजावले आहे. या हल्ल्यामध्ये नेमके किती नुकसान वा जीवितहानी झाली, याचा आढावा घेणे चालू असतानाच ‘ऑल इज वेल’ म्हणजे सर्व काही ठिक आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. 

एकंदरीतच या घटनांमुळे आखाती देशांबरोबर जगभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत, तर या तणावाचे रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होऊ शकते आणि सध्याच्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळात ते कोणत्याही देशाला परवडणारे नाही, अशी भीती काही जाणकार व्यक्त करीत आहेत.   

मुळातच दीड-दोन वर्षांपासून चीन आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. त्यातच अमेरिका-इराणमधील सध्याचा संघर्ष अजून जास्तच पेटला; तर त्याचे अत्यंत भीषण दुष्परिणाम जगाला भोगावे लागतील. जगातील सर्वांत शक्तिशाली आणि सुसज्ज लष्कर आपल्याकडे असल्याचा अहंकार अमेरिकेला नेहमीच दाटून येत असतो. त्यात ट्रम्प तर परिणामाची तमा न बाळगता निर्णय घेण्यात माहीर मानले जातात. तेलाच्या बाबतीत अमेरिका इराण-इराकवर अवलंबून नाही. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती बळावली आहे. परंतु, अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांची १४० ठिकाणे आमच्या माऱ्याच्या टप्प्यात असल्याचे इराणने ठणकावले आहे.  हे तळ आम्ही कधीही बेचिराख करू शकतो, याचा नमुनाच इराकने क्षेपणास्त्र हल्ला करून दाखवून दिले आहे. तसेच नुकसानभरपाई दिल्याशिवाय इराकमधून आपले सैन्य बाहेर पडणार नाही, या ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे इराकसोबतही त्यांचे संबंध बिघडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ट्रम्प यांच्या आडमुठ्या भूमिकेला त्यांच्या देशातूनच तीव्र विरोध होत आहे. अशा एकंदर परिस्थितीमुळे इराणच्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतलेली दिसते. त्यांची ही भूमिका सर्व जगासाठी हितकारकच ठरणार आहे.

सध्याच्या आखातातील तणावामुळे आंतराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या भावाने प्रतिबॅरल ७० डॉलरची पातळी ओलांडली आहे. आपण बहुतांश खनिज तेल आयात करीत असल्यामुळे वाढत्या दराचा आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा केंद्रात सत्तेत आले होते, त्या वेळी कच्च्या तेलाचे दर निम्म्यावर येऊन ते पुढील बराच काळ स्थिर होते. परंतु, त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. उलट मागील पाच-सहा वर्षांपासून अर्थव्यवस्थेची घसरण सुरू आहे. आता तर इंधनाच्या दराचाही भडका उडाला आहे. देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असताना रसातळाला जात असलेली अर्थव्यवस्था सावरण्याचे फार मोठे आव्हान मोदी सरकारपुढे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT