sampadkiya
sampadkiya 
संपादकीय

सुरक्षित माती; सुरक्षित मानव

विजय सुकळकर

माती प्रदूषित झाल्याने मानवी व जनावरांच्या आरोग्यावर  प्रतिकूल परिणाम जाणवू लागले आहेत, असा इशारा ‘एफएओ’ने (अन्न व कृषी संघटना) नुकताच एका अहवालाद्वारे दिला आहे. खरे तर मातीचे आरोग्य बिघडत चालले असल्याबाबत एफएओने या अगोदरसुद्धा अनेक अभ्यासपूर्ण अहवाल सादर करून संपूर्ण जगाला सजग करण्याचा प्रयत्न केला. परंतू बहुतांश देश याकडे दुर्लक्ष करीत आहेत. २०११ मध्ये एफएओने जागतिक स्तरावर जमिनीचे आरोग्य २५ टक्क्यांपर्यंत बिघडले असून याच अहवालात भारतातील लागवडीखालील ४२ टक्के क्षेत्र नापिक होत असल्याचे नमूद केले होते. ‘इस्त्रो’ने सुद्धा देशातील मातीची सुपीकता घटत चालल्याबाबत इशारा देऊन यात महाराष्ट्र वरच्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट केले आहे. पिकांची वाढ होऊन अन्नधान्य उत्पादनासाठी माती अत्यंत महत्त्वाचा, मूलभूत, नैसर्गिक घटक आहे. एफएओच्या आकडेवारीनुसार आजच्या जागतिक अन्नधान्याच्या मागणीनुसार सर्वांना पुरेशे अन्न मिळवायचे असेल तर दरवर्षी ६० लाख हेक्टर एवढी नवी शेतजमीन लागवडीखाली आणावी लागेल. नवी जमीन लागवडीखाली आणणे तर शक्य नाही, उलट वाढते औद्योगिकरण, शहरीकरण तसेच रस्ते, तलाव, धरणे आदी विकास कामांसाठी दरवर्षी हजारो हेक्टर जमीन लागवडीखालील क्षेत्रातून कमी होत आहे. उपलब्ध लागवडयोग्य जमीन अनेक कारणांनी प्रदूषित होत आहे. त्यातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत असल्याने पिकाची उत्पादकता घटत चालली आहे. अशा वेळी भविष्यात पुरेशे आणि सुरक्षित अन्न हे जगापुढील मुख्य आव्हान असणार आहे.      

मातीच्या वाढत्या प्रदूषणाची कारणे स्पष्ट आहेत. त्यावरील उपायही माहित आहेत. पण याबाबत कोणीच गंभीर दिसत नाही. मागील तीन दशकांपासून शेतात सेंद्रिय घटकांचा वापर कमी कमी होत आहे. पीक पद्धतीतही मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. अन्नधान्याबरोबर फळे-भाजीपाला यांची वाढती गरज भागविण्यासाठी एकापाठोपाठ एक पिके घेतली जात आहेत. त्यात योग्य पीक फेरपालट पद्धतीचा अवलंब होताना दिसत नाही. निकस जमिनीतून उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. पीक संरक्षण तसेच तण नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशके, तणनाशके यांचाही वापर वाढत आहे. शहरी तसेच औद्योगिक टाकाऊ पदार्थ कोणत्याही प्रक्रियेविना सरळ मातीत तसेच जलस्त्रोतांमध्ये सोडले जात आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणजे मातीची उत्पादकता घटून प्रदूषण वाढले आहे. मातीचे आरोग्य सुरक्षित नसेल तर त्यातून उत्पादित शेतमाल मानवी आरोग्यासाठी सुरक्षित राहणारच नाही, माती, पाणी आणि हवा प्रदूषित झाल्यामुळे अनेक असाध्य रोग मानवाला जडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर केवळ जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वाटप करून (त्यातही अनेक त्रुटी आहेत.) काहीही साध्य होणार नाही. मातीचे आरोग्य जपण्यासाठी, प्रदूषित जमिनी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रत्येक देशाने राष्ट्रीय स्तरावर व्यापक कार्यक्रम हाती घ्यायला हवा. त्यात जमिनीची धूप थांबविण्यापासून तिची कमीत कमी मशागत, त्यात सेंद्रिय खतांचा अधिक वापर, शाश्वत पीक पद्धती ते पिकांच्या काढणीनंतर अवशेष जमिनीत कुजविण्यापर्यंतचे तंत्र शेतकऱ्यांना पुरवावे लागेल. या तंत्राचा अवलंब प्रत्येक शेतकऱ्याकडून आपल्या शेतीत हमखास होईल, हे पाहावे लागेल. हा कार्यक्रम एक मोहीम म्हणून शासनापासून ते शेतकऱ्यांपर्यंत पुढे न्यावा लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT