agrowon editorial
agrowon editorial 
संपादकीय

शेती शाश्वत अन् आश्वासकही!

विजय सुकळकर

चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता ऑगस्टपासून शिथिल करण्यात आले आहे. लॉकडाउन काळात अनेक लहान-मोठे उद्योग-व्यवसाय बंद होते, ते हळुहळु आता सुरु होत आहेत. शेती व्यवसाय मात्र लॉकडाउनमध्ये बंद नव्हता. शेतीची कामे सुरुच होती. असे असले तरी लॉकडाउनच्या फटक्यातून हा व्यवसाय सुटला नाही. खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामातील शेतमाल विक्री लॉकडाउनने प्रभावित झाली. पूरक व्यवसाय उत्पादने दूध, अंडी, मटन, चिकन आदींची मोठ्या प्रमाणात मागणी घटली. सर्व शेतमालाबरोबर पूरक व्यवसाय उत्पादनांचे दर पडले. देशभर लॉकडाउन असल्याने निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे दरही वाढलेले होते. पेरणीसाठी यंत्रे-अवजारे, मजूर यांचीही बऱ्याच ठिकाणी वेळेवर उपलब्धता झाली नाही. इंधनाचे दर वाढल्याने यांत्रिक मशागत अन् पेरणीचा खर्च वाढला. त्यातच पीककर्जाचा आधार पेरणीसाठी होईल, असे वाटत असताना अजूनही बहुतांश शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. अशाप्रकारे एकीकडे शेतकऱ्यांच्या हाती पैसा येत नसताना दुसरीकडे खर्च मात्र वाढतच चालला होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभरात सरासरी क्षेत्राच्या ८० टक्क्यांवर खरीपाचा पेरा झाला आहे. खरीपाची ८८२ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून गेल्या वर्षी याच काळात झालेल्या पेरणीच्या तुलनेत १४ टक्के अधिक क्षेत्र लागवडीखाली आले आहे. यावरुन शेतीप्रति असलेली शेतकऱ्यांची बांधिलकी आपल्या लक्षात यायला हवी.

पेरणीचे क्षेत्र वाढायला देशभर झालेला चांगला पाऊस अन् लॉकडाउनमुळे शहरांकडून गावाकडे आलेल्या तरुणांनी शेतीत घातलेले लक्ष या दोन बाबीही जबाबदार आहेत. देशात यावर्षी मॉन्सूनच्या सुरवातीपासूनच चांगला पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम भूगर्भातील पाणी पातळीत वाढीबरोबर जलाशयांतील साठ्यांवरही झाला आहे. देशातील महत्वाच्या अशा १२३ जलाशयांमध्ये जुलै शेवटपर्यंत ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हा साठा गेल्यावर्षी याच काळातील साठ्याच्या तुलनेत ४१ टक्के अधिक आहे तर मागील १० वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी जास्त आहे. असे असले तरी उत्तर तसेच मध्य विभागाच्या तुलनेत दक्षिण, पूर्व आणि पश्चिम विभागात (ज्यात महाराष्‍ट्राचा समावेश) जलसाठ्याचे प्रमाण कमी असून ही बाब थोडी चिंताजनक आहे. जून, जुलै या पावसाळ्याच्या सुरवातीच्या दोन महिन्यांत राज्यात ९७.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. कायमच दुष्काळाच्या दाढेतील मराठवाडा विभागात (१२७ टक्के) सर्वाधिक तर पश्चिम महाराष्ट्र (७१ टक्के) आणि विदर्भातील नागपूर विभागात (८२ टक्के) सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली असून या पावसाचा जोर कोकण घाटमाथ्यासह पश्चिम अन् मध्य विभागात अधिक आहे. अर्थात आता धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होईल. राज्याच्या अनेक भागात या पावसाने खरीप पिकांस चांगलेच जीवदानही दिले आहे.

देशपातळीवरील पीक पेरा पाहता यावर्षी धान्ये पिकांकडे शेतकऱ्यांचा कल दिसतो. कोरोना लॉकडाउनमुळे धान्यास अधिक मागणी आणि दर असेल या विचारातून शेतकऱ्यांनी धान्ये पिकांखालील क्षेत्र वाढविले आहे. नगदी पिकांमध्ये कापसाचे क्षेत्र वाढलेले आहे. महाराष्ट्रासह इतरही राज्यांत जिरायती शेतीत कापसाला पर्याय नसल्यामुळे पेरा वाढलेला आहे. महाराष्ट्रात कापसाबरोबर सोयाबीन क्षेत्रातही वाढ दिसून येते. देशभरातील शेतकऱ्यांनी अत्यंत अडचणीत आपले काम चोखपणे बजावले आहे. आता विक्रमी उत्पादनाची नोंद करताना शेतमालाच्या खरेदीत शेतकऱ्यांची हेळसांड होणार नाही, याची काळजी शासनाने घ्यायला हवी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT