agrowon editorial
agrowon editorial 
संपादकीय

इंडो-डच प्रकल्प ठरावा वरदान

विजय सुकळकर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर जवळपास तीन महिने लॉकडाउन होते. याचा चांगलाच फटका शेती क्षेत्राला बसला. धान्यपिके, फळे-भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. परंतू उघड्यावर आणि नियंत्रित फुलशेती (पॉलिहाऊस) करणारा शेतकरी पूर्णपणे उध्वस्तच झाला आहे. लॉकडाउनमध्ये बहुतांश काळ बाजार बंद असले तरी धान्ये, फळे-भाजीपाला हे अत्यावश्यक असल्याने त्यांची विक्री चालूच होती. त्याचवेळी अखाद्य असा शेतमाल फुलांना मात्र कोमेजून जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. भव्य लग्नसोहळे, मंदीरासह सर्वच धार्मिक स्थळे, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम-समारंभ हे सर्व बंदच असल्याने फुलांना मागणीच नव्हती. त्यामुळे ७० ते ८० टक्के फुलांचा खप कमी झाला आहे. आता श्रावण महिन्यापासून सण-उत्सवांचा हंगाम सुरु झाला तरी स्थानिक तसेच दुरच्या बाजारपेठांत अजूनही म्हणावी तशी मागणी फुलांना नाही. कोरोना प्रकोपाने आयात-निर्यातही विस्कळीत झाल्याने फुलांची निर्यात कमी झाली आहे. या धक्यातून फूल उत्पादकांना सावरण्यासाठी किमान दोन-तीन वर्षे लागतील. अशा एकंदरीत नकारात्मक वातावरणात फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे इंडो-डच सहकार्य प्रकल्पांतर्गत अत्याधुनिक फुलशेतीतील प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षणासाठीचा अद्वितीय प्रकल्प (सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ फ्लॉवर्स) पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील पणन मंडळाच्या राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेमध्ये साकारला जात आहे. या प्रकल्पांतर्गत डच तंत्रज्ञानावर आधारीत अत्याधुनिक पूर्णपणे स्वयंचलित पॉलिहाऊस, भारतीय तंत्रज्ञानावर आधारीत पॉलिहाऊस आणि उघड्या जमिनीवर विविध फुलपिकांची लागवड करून त्यांचा उत्पादकता आणि दर्जा यावर नेमका काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

जागतिक पातळीवर अनेक देशांच्या तुलनेत आपले पॉलिहाऊसमधील फूल उत्पादन मुळातच अप्रगत आहे. त्यातच मागील दोन दशकांपासून या तंत्रज्ञानात फारसा सुधारणाही झालेल्या नाहीत. त्यामुळे आपल्या पॉलिहाऊसमधील फुलांचे उत्पादन आणि दर्जा कमी आहे. अशावेळी देशातील फूल उत्पादकांना पॉलिहाऊस तंत्र अद्ययावत करुन उत्पादकता आणि फुलांचा दर्जा वाढविण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे आपल्याकडील पॉलिहाऊस तंत्र पूर्णपणे स्वयंचलित नाही. त्यामुळे पाणी तसेच रासायनिक निविष्ठांचा कार्यक्षम वापर त्यात होत नाही,

मनुष्यबळही अधिक लागते. अशावेळी पूर्णपणे स्वयंचलित पॉलिहाऊसद्वारे अत्यंत कमी पाण्यात आणि निविष्ठांच्या कार्यक्षम वापराद्वारे खर्च आणि कष्टात बचत करून थेट उत्पन्न वाढीस हातभार लागू शकतो. उघड्यावरील फुलशेतीतही कीडरोगांच्या वाढत्या प्रादुर्भावापासून कमी उत्पादकतेपर्यंत अनेक समस्या असून त्यांचेही समाधान या प्रकल्पाद्वारे व्हायला पाहिजेत. फुलांचे काढणीपश्चात होणारे नुकसान कमी करणे, हा देखील या प्रकल्पाचा उद्देश आहे. त्यामुळे फुलांच्या काढणीनंतरची प्रतवारी, पॅकिंग, शीत साठवणूक, वाहतूक, विक्री, निर्यात यावरही प्रकल्पांतर्गत काम होणे अपेक्षित असून त्याचा फायदा उत्पादकांना होऊ शकतो. या प्रकल्पाचा ‘फोकस’ हा प्रात्यक्षिकाबरोबर प्रशिक्षणावरही असणार आहे. शिवाय भारतीय आणि डच फूल संशोधन आणि विकासात काम करणाऱ्या संस्थाना या प्रकल्पाद्वारे प्रशिक्षणासाठी एकत्र आणण्यात येणार आहे. यातून देशात संस्थात्मक पातळीवर प्रशिक्षणाला गती मिळू शकते. याचा लाभ मात्र या देशातील पॉलिहाऊसमध्ये फूल उत्पादन करणारे शेतकरी, छोटे-मोठे उद्योजक यांच्याबरोबर नव्याने यात उतरु पाहणाऱ्या तरुणांनी घ्यायला हवा. कोरोना महामारीने देशांतर्गत तसेच जागतिक फुलांच्या मार्केटमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. प्रचलित बाजार व्यवस्थेच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या आहेत. अशावेळी या प्रकल्पांतर्गत ऑनलाइन मार्केटचे धडे मिळाले तर हा प्रकल्प फूल उत्पादकांना वरदानच ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT