agrowon editorial
agrowon editorial 
संपादकीय

शेतकऱ्याची सेवानिवृत्ती

विजय सुकळकर

शा सकीय सेवा तसेच बहुतांश खासगी क्षेत्रातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय जवळपास ६० वर्षे ठरलेले आहे. माणसाच्या बौद्धिक तसेत शारीरिक काम करण्याच्या क्षमतेवरून निवृत्तीचे हे वय ठरविण्यात आले आहे. सेवानिवृत्तीच्या काळात वयोमानानुसारचे अनेक आजार डोकं वर काढत असतात. सेवानिवृत्तीवाल्यांना आपल्या आजारपणाकडे लक्ष देता यावे, पुरेशी विश्रांती घेता यावी, हाच सेवानिवृत्तीमागचा मुख्य उद्देश! विशेष म्हणजे जवळपास सर्वच शासकीय-अधिकारी कर्मचारी तसेच काही खासगी नोकरीवाल्यांना सेवानिवृत्तीनंतर चांगले पेन्शनही मिळते. याचा मोठा आधार सेवानिवृत्तीधारकांना, त्यांच्या कुटुंबीयांना होतो. पेन्शनसाठीची तरतूद नोकरी करतानाच केली जात असल्याने त्यांच्या पेन्शनला विरोध असण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांचे मात्र नेमके याच्या उलटे आहे.

शेतकऱ्यांचे काम हे काबाडकष्टाचे आहे. ठराविक वयोमानानंतर बहुतांश शेतकरी, शेतकरी महिला शेतीची कष्टाची कामे करू शकत नाहीत. त्यांनाही अनेक त्रासदायक आजारांनी जखडलेले असते. परंतु सेवानिवृत्ती हा शब्दच शेतीकोशात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला आयुष्यभर कष्ट आहेत. भंडारा जिल्ह्यातील मोहगाव देवी या गावी एका शेतकऱ्याचा सेवानिवृत्ती सोहळा नुकताच पार पडला आहे. गजानन काळे या शेतकऱ्याचे वय ६० वर्षे होताच कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना शेतीतून सेवानिवृत्ती दिली आहे. एका शेतकऱ्याच्या सेवानिवृत्तीला साजेसे असे सोहळ्याचे ठिकाण (ते राबलेले शेत), त्यातील भेटवस्तू (त्यांनी पिकविलेला भाजीपाला), या वेळी करण्यात आलेल्या इतर वयोवृद्ध शेतकऱ्यांचा सन्मान आणि यात सर्व गावकऱ्यांनी नोंदविलेला सहभाग हे सर्व आदर्शवतच म्हणावे लागेल.

आता कोणी म्हणेल, शेतकऱ्यांना काय करायची सेवानिवृत्ती? शेतकरी हा स्वःतच्या कुटुंबाबरोबर देशाला, संपूर्ण जगाला पोटभरण्यासाठी लागणारे अन्नधान्ये, फळे-भाजीपाला पिकवितो. अन्नधान्याची निर्मिती कोणत्याही कारखान्यात होत नाही, तर ती शेतीतच होते. एवढेच नव्हे तर साखर, कापड यासह अनेक अन्नप्रक्रिया उद्योगाला लागणारा कच्चा माल शेतीतच पिकतो. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकविलेल्या शेतमालास उत्पादन खर्च जाऊन शिल्लक उरेल असा दरही मिळत नाही. देशभरातील बहुतांश शेतकऱ्यांची जेमतेम हाता-तोंडाची मिळवणी होते. त्यामुळे आयुष्यभर काबाडकष्ट करून वृद्धावस्थेत निवांत जगता यावे, यासाठी शेतकरी कमाईच करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी गजानन काळे यांचा मुलगा प्रकाश काळे यांनी जो आदर्श दाखविला आहे, तो स्वीकारला पाहिजे. ६० वर्षांनंतर आपल्या आई-वडिलास शेतीतून निवृत्त केले पाहिजे. हे करण्यासाठी मात्र त्यांना शेतीतून विविध आर्थिक स्त्रोत निर्माण करून त्यानुसार निवृत्तीनंतरचे नियोजन करावे लागेल.

शेतकऱ्यांच्या सेवानिवृत्तीस जोडूनच केंद्र-राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांवर हप्त्याच्या भार न टाकता पेन्शन योजना सुरू करायला हवी. सध्या केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान मानधन योजना या नावाने पेन्शन योजना सुरू आहे. परंतु त्यात १८ ते ४० वयोगटांतील लहान व सिमांत शेतकऱ्यांनी ६० वर्षांपर्यंत ठराविक रक्कम (प्रतिमहिना ४० ते २१० रुपये) भरल्यावर ६० वर्षांनंतर त्यांना एक हजार ते पाच हजार रुपये पेन्शन सुरू होणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ते प्रतिमहिना हप्ता भरू शकत नाहीत. वर्तमानच सुरक्षित नसलेला शेतकरी भविष्य सुरक्षेसाठी तरतूद करणार नाही. त्यामुळे या योजनेला देशभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळतोय. या योजनेतील सहभागी बहुतांश शेतकरी हे हरियानाचे आहेत. कारण तेथील राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हप्ता भरण्याची तयारी दाखविली आहे. पेन्शन योजनेला देशभरातून व्यापक प्रतिसाद मिळण्यासाठी त्यातील हप्ता राज्य सरकारांनी भरायला हवा. तसेच सामाजिक सुरक्षेचे सरकारचे दायित्व म्हणून ज्येष्ठ शेतकऱ्यांचा आरोग्य विमाही उतरवायला पाहिजे. यांत वृद्धापकाळातील नियमित तपासण्यासह रोगनिदानानुसार उपचार, औषधं, शस्त्रक्रिया अशा सेवासुविधा असणे गरजेचे आहे. असे झाले तर सेवानिवृत्तीनंतरचे शेतकऱ्यांचे जीवन थोडेफार सुसह्य होईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT