संपादकीय
संपादकीय 
संपादकीय

दुष्काळात आश्वासक ॲपल बेर

विजय सुकळकर

राज्यात दुष्काळाच्या झळा वाढत आहेत. वाढत्या पाणी टंचाईमुळे सिंचनासाठीच्या पाण्यावर कर लावणे, वाढती ऊसशेती, दुष्काळी पट्ट्यातील पीकपद्धती अशा चर्चेला वेग आला आहे. ज्यांचा शेतीशी फारसा संबंध नाही, अशा वर्गाकडून शेतकऱ्यांना जलसाक्षरतेचे धडे दिले जात आहेत. पाणीवापर, पीकपद्धतीबाबत शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्यांनी २५ डिसेंबर २०१८ च्या ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या यशोगाथांवर दृष्टिक्षेप टाकायला हवा. या दोन्ही यशोगाथा सलग तीन वर्षांच्या दुष्काळात सर्वाधिक पोळलेल्या मराठवाडा विभागातील आहेत. मागील दुष्काळात मराठवाड्यातील आंबा, केळी, मोसंबीच्या बागा मोठ्या प्रमाणात वाळल्या. अनेक शेतकऱ्यांचा दीर्घ कालावधीसाठीचा आधार तुटला. त्यातून या भागातील शेतकऱ्यांनी बोध घेत आपला मोर्चा पेरू, सीताफळ, ॲबल बेर अशा दुष्काळात तग धरणाऱ्या पिकांकडे वळविला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे नाशिक, पुणे, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाड्याच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांत ॲपल बेर हे फळपीक चांगलेच रुजतेय. अत्यंत कमी पाणी, कमी खर्च, कमी देखभालीमध्ये येणारे हे उत्तम फळपीक आहे. फळांचा आकार मोठा, आकर्षक रंग, चवीला छान असलेले ॲपल बेर स्थानिक, तसेच दूरच्या शहरी बाजारपेठेतही चांगल्या दराने विकले जाते. त्यामुळे कृषी विद्यापीठे, कृषी विभाग यांच्या शिफारसीशिवाय राज्यात ॲपल बेरखालील क्षेत्र वाढताना दिसते. 

मुळात नैसर्गिकरीत्या कमी पाऊसमानात स्थिरावलेल्या मराठवाडा विभागात हवामान बदलाच्या काळात दुष्काळाचे चटके वाढत आहेत. धरण-कालव्याद्वारे सिंचनाच्या फारशी सोयीसुविधा नाहीत. भूगर्भातील पाणीही खोल खोल जात आहे. अशावेळी या भागातील शेतकऱ्यांचा कल कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे वाढतोय, ही बाब स्वागतार्हच म्हणावी लागेल. ॲपल बेर बांगलादेशातून पश्चिम बंगालमार्गे सुमारे दशकभरापूर्वी राज्यात दाखल झालेले फळपीक. राज्यात रोपं उपलब्ध नसताना, शास्त्रशुद्ध लागवडीची कोणतीही माहिती हाताशी नसताना या फळपिकाखालील क्षेत्र वाढतेय. त्यामागील दोन प्रमुख कारणे म्हणजे, सध्याच्या परिस्थितीशी हे फळपीक सुसंगत असून, ग्रामीण तसेच शहरी ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. या फळपिकाबाबत माहितीचे सध्याचे तरी स्राेत माध्यमे आणि ॲपल बेरची लागवड केलेले शेतकरी हे आहेत.

शेतकरी आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या ॲपल बेरबाबत राज्यातील कृषी संशोधन संस्थांमध्ये अभ्यास, संशोधन व्हायला हवे. त्यातून या पिकाच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांना अधिकृत आणि शास्त्रीय माहिती मिळायला हवी. सध्या काही खासगी व्यावसायिक बाहेरील राज्यांतून रोपं आणून त्याची विक्री करताहेत. अशा रोपांचे दर अधिक असून, दर्जाबाबतही काही खात्री मिळत नाही. राज्यातच दर्जेदार रोपं तयार करून ती कमीत कमी दरात शेतकऱ्यांना उपलब्ध व्हायला हवीत. सध्या ॲपल बेरची विक्री थेट शेतकऱ्यांकडून अथवा स्थानिक व्यापाऱ्यांना होते. ॲपल बेरची व्यापाऱ्यांना होणाऱ्या विक्रीत अनेक अडचणी असून, उत्पादकांना योग्य दरही मिळत नाही. पणन विभागाने ॲपल बेर विक्रीतील अडचणी दूर करून शेतकऱ्यांना साह्य करावे. राज्यात ॲपल बेरचे क्षेत्र वाढत असताना त्यावर प्रक्रिया करून काही पदार्थ तयार करता येतील का, यावरही काम व्हायला हवे. ॲपल बेरचा असा सर्वांगाने विकास झाल्यास या फळपिकाची गोडी वाढेल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

SCROLL FOR NEXT