Millipede Agrowon
संपादकीय

Dangerous Millipede: घातक ‘पैसा’

पैसा या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तत्काळ प्रभावी उपाय योजना केली नाही, तर एक-दोन दिवसांतच ही कीड पूर्ण पीक फस्त करते.

Team Agrowon

महाराष्ट्रात दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. आधीच्या पावसावर पेरण्या होऊन उगवून आलेल्या पिकांवर मिलीपीड (वाणू, पैसा, गोगलगाय) या किडीने चांगलाच हल्ला चढवून शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेलू (कोपरा) शिवारातील शेतकरी वर्षा भालेकर यांच्या शेतातील दोन एकरांत चांगले अंकुरलेले कापसाचे पीक पैसा या किडीने पूर्णपणे उध्वस्त केले आहे.

सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton), तूर (Tur), मूग, उडीद यांसह खरिपातील इतरही पिके नष्ट करण्याचे काम पैसा करीत आहे. ही कीड काही नवीन नाही. नदी-नाल्या काठच्या शेतात पूर्वीपासूनच ही कीड आढळून येत असे. पूर्वी ही कीड पिकांना नुकसानकारक देखील ठरत नव्हती. त्यामुळे दशकभरापूर्वी या किडीच्या नियंत्रणासाठी उपाय योजना कराव्या लागत नव्हत्या.

परंतु आज आपण पाहतोय विदर्भ (Vidarbh), मराठवाडाच (Marathwada) नाहीतर राज्यभर या किडीने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या वर्षी मिलीपीड वर्गातील किडीस अत्यंत पोषक असे वातावरण लाभले आहे. जूनच्या सुरुवातीला राज्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसात चांगलाच खंड पडला. त्यामुळे जमिनीत सुप्तावस्थेत असलेल्या या किडीच्या जीवनचक्रास चालना मिळाली.

कमी पावसामुळे या किडीचे प्रजनन झपाट्याने झाले तर त्यानंतरच्या उघडिपीतील जास्त आर्द्रता, उष्ण व दमट हवामानामुळे पैसा या किडीची वाढ जोमाने झाली. बीज अंकुरताना, पीक लहान असतानाच या किडीचा प्रादुर्भाव पिकांवर दिसून येतो. ही कीड रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. प्रादुर्भाव वाढलेल्या ठिकाणी पिकावर जाऊन ही कीड शेंडा खुडते. कालांतराने पीक जळून जाते. यामुळे एकरी आवश्यक किमान रोपांची संख्या घटते व उत्पादनात लक्षणीय घट येते.

पैसा या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तत्काळ प्रभावी उपाय योजना केली नाहीतर एक-दोन दिवसांतच ही कीड पूर्ण पीक फस्त करते. यावरून ही कीड किती घातक आहे, हे आपल्या लक्षात यायला हवे. यावर्षीचे पावसाळ्याच्या सुरुवातीचे वातावरण पाहता शेतकऱ्यांना पैसा या किडीचा प्रादुर्भाव आणि उपाय योजनेबाबत सजग केले असते तर अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे उद्‍ध्वस्त झालेच नसते. आणि पावसाच्या खंडाबरोबर या किडीच्या नुकसानीने दुबार पेरणीचे काही शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट टळले असते.

हवामान बदलामुळे (Climate Change) कमी नुकसानकारक अनेक किडी पिकांना आता अतिघातक ठरत आहेत. पैसा या किडीचेही तसेच झाले. मिलीपीडची एवढी उत्पत्ती कशाने होतेय, याचा नीट अभ्यास झाला पाहिजेत. परंतु सध्या तरी तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. अधिक गंभीर बाब म्हणजे वाणू, पैसा या किडीच्या नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे.

मिलीपीड (Millipede) वर्गातील शंखी गोगलगायींच्या नियंत्रणासाठी मेटाअल्डिहाइडची शिफारस करण्यात येते. परंतु पैसा ही कीड नियमित येणारी नसल्याने याकरिता लेबल क्लेम असलेली कीडनाशके अजुनही नाहीत. त्यामुळे मेटाअल्डिहाइडसह इतर कीडनाशके शेतकरी पैसा या किडीच्या नियंत्रणासाठी वापरतात.

खरे तर दिवसेंदिवस घातक बनत असलेल्या या किडीसाठी एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा (Integrated Pest Management) वापर झाला पाहिजेत. अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ शेतात असल्यास ते चांगले कुजवावेत. पावसाळ्यापूर्वी बांधावर गवत नष्ट करावे. शेतात तण होऊ देऊ नये. समूहाने राहणारी ही कीड गोळा करून नष्ट करण्याचेही सांगितले जाते.

शेताच्या चहूबाजूंनी चर खोदून त्यात राख, मोरचूद, कळीचा चुना टाकावा. रासायनिक कीडनाशकांचा (Chemical Fertilizers) वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. महत्त्वाचे म्हणजे लेबल क्लेम असलेली प्रभावी कीडनाशके पैसा या किडीच्या नियंत्रणासाठी द्यावी लागतील. शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या पैसा या किडीचे नियंत्रण केले तरच ही कीड आटोक्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goat Farming : दोन अपयशानंतर शेळीपालनाने दिली यशाची चाहूल

Manikrao Kokate News : रमी प्रकरण, पिकविमा, ढेकळाचे पंचनाम्यावर कृषिमंत्री कोकाटेंचं स्पष्टीकरण

Minister Caught Gaming: ऐसे कैसे झाले भोंदू

Desi Cow Management: आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गोशाळा हेच धोरण

Rajya Gomata Day: गोशाळा बनतील शाश्वत विकासाचे केंद्र

SCROLL FOR NEXT